पैलवान गायकवाड यांना सोन्याची गदा
सोन्याची गदा गायकवाड यांना
छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेतील सोन्याची गदा मिळवणारे मानकरी महेद्र गायकवाड
अहमदनगर मधील वाडिया पार्क येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता देईल. अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या भाषणात अहमदनगर येथे क्रीडा संकुल उभे रहावे. अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या स्पर्धेतील ३५ लाख रूपये किंमतीची अर्धा किलोच्या सोन्याची गदा सोलापूरचे महेंद्र गायकवाड यांनी पटकावली.
वाडीया पॉर्क माळीवाडा जिल्हा क्रीडा संकुल येथे छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ.सुजय विखे-पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार राम शिंदे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी मान्यवर तसेच कुस्ती पंच, विविध क्षेत्रातील पदाधिकारी व जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कुस्ती हा आपला प्राचीन खेळ आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम खऱ्या अर्थाने या खेळाला राजाश्रय दिला. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांनी कुस्तीला पाठबळ दिले. बंद पडलेल्या तालीम पुनरूज्जीवीत करण्याचे काम शाहू महाराजांनी केले. शाहू महाराजांनी कुस्ती विजेत्यांना चांदीची गदा देण्याची परंपरा सुरू केली. आज अहमदनगर मध्ये सोन्याची गदा देण्याच्या परंपरेला सुरूवात झाली ही आनंदाची गोष्ट आहे.
भारतासाठी पहिले ऑलिंपिक पदक पैलवान खाशाबा जाधव यांनी पटकाविले त्यानंतर पदक मिळाले नाही. पुढील ऑलिंपिक विजेता महाराष्ट्राच्या मातीतूनचं झाला पाहिजे. अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली .
फडणवीस म्हणाले की, कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पैलवानाचे मानधन ३ हजारांहून १८ हजार वाढविले. तीन वेळा महाराष्ट्र केसरी ठरलेल्या विजय चौधरी यांना थेट पोलीस उपअधीक्षक पदाची नोकरी देण्यात आली.
महसूलमंत्री विखे-पाटील म्हणाले, अहमदनगर मध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या माध्यमातून एक नवे पर्व सुरू झाले आहे. सर्व महाराष्ट्रातून एक हजाराहून अधिक मल्ल या स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. वाडिया पार्क मैदानाला ऐतिहासिक महत्त्व आहे. याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याची गरज आहे.
यावेळी स्पर्धेचे स्वागताध्यक्ष आमदार प्रा. राम शिंदे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये अंतिम सामना झाला. दोन दिवस चाललेल्या या कुस्ती स्पर्धांसाठी राज्यभरातून जवळपास एक हजार कुस्तीपटू सहभागी झाले होते.
Comments
Post a Comment