वारकऱ्यांना सुविध्दा द्या- पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

आषाढी वारीसाठी जाणाऱ्या दिंड्यातील वारकऱ्यांना
सर्व मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून द्या.
   - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील अनेक दिंड्यासह परजिल्ह्यातील दिंड्या आपल्या जिल्ह्यातून जातात. या दिंड्यातील वारकऱ्यांना पाणी, वीज,  राहण्याची व्यवस्था, फिरते स्वच्छतागृह यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुविधांचा मास्टर प्लॅन तातडीने तयार करून तो सर्व पालखी प्रमुखापर्यंत पोहोचवण्याचे निर्देश राज्याचे महसूल,पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
            आषाढी वारीच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी पालकमंत्री श्री विखे-पाटील बोलत होते.
            यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महानगर पालिकेचे आयुक्त डॉ.पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, मानाच्या पालख्यांचे प्रमुख अशोक सावंत, रघुनाथ गोसावी आदी उपस्थित होते.
            पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, पांडुरंगाच्या दर्शनासाठी जिल्ह्यातून 260 दिंड्या जातात. तसेच परजिल्ह्यातील अनेक दिंड्या आपल्या जिल्ह्यातून जातात. या दिंड्यामधील वारकऱ्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत.  दिंड्यांच्या मुक्कामाची ठिकाणे ठरलेली आहेत. ज्या गावात अथवा शहरामध्ये या दिंड्या मुक्कामी थांबणार आहेत त्या ठिकाणच्या शाळा, महाविद्यालय, मंगल कार्यालयामध्ये वारकऱ्यांची मुक्कामाची व्यवस्था करण्यात यावी. त्याठिकाणी शुद्ध पिण्याचे, पाणी, अखंडितपणे वीज, आरोग्य व्यवस्था तसेच  शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी. तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून वारकऱ्यांच्या व्यवस्थेमध्ये कुठलीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी दिले.
वारकऱ्यांना आरोग्याच्या सेवा द्या
    दिंड्यामधून हजारो वारकरी पायी चालत असतात. अश्या वेळी वारकऱ्यांचे आरोग्य चांगले राहील यादृष्टीने अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी तसेच जागोजागी आरोग्य पथके तैनात ठेवण्यात यावीत. या पथकामध्ये पुरेश्या प्रमाणात मनुष्यबळ तसेच औषधीसाठा उपलब्ध ठेवण्यात यावा. आवश्यकतेनुसार रुग्णास तातडीने उपचार मिळावेत यासाठी अधिक प्रमाणात रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात याव्यात.  प्रथमोपचार किट तयार करून ती प्रत्येक दिंड्यामध्ये देण्यात यावी.आरोग्य सुविधेमध्ये कुठलीही उणीव भासणार नाही याची काळजी घेण्याची सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी आरोग्य विभागाला दिल्या.
सुरक्षेसाठी पोलीस बंदोबत ठेवा
            वारकरी पायी चालत असलेल्या मार्गावर वाहतुकीचे नियमन करण्याबरोबरच वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी दिंड्यासोबत पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा. तसेच दिंड्या ज्या ठिकाणी मुक्कामी राहतील तेथेही पोलीस कर्मचारी उपस्थित राहतील दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
            अनेकवेळा मुक्कामाच्या ठिकाणी अशुद्ध पाणी पिल्याने अनेक वारकरी आजारी पडतात. त्यामुळे प्रत्येक दिंड्यातील वारकऱ्यांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. ज्या दिंड्याकडे स्वतःचे पाणी टँकर आहेत, त्यांच्या टँकरमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरून देण्याची व्यवस्था करण्यात यावी. जिल्ह्यातील दिंड्या ज्या मार्गावरून जातात त्या मार्गाची आवश्यकतेनुसार डागडुजी, खड्डे भरण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी. त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध दिंड्यातील वारकऱ्यांचा विमा काढण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्नशील असून यासाठी वारकऱ्यांनी त्यांची माहिती जिल्हा प्रशासनाकडे  जमा करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिंड्यातील वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधाबाबत प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती दिली. विविध पालख्यांच्या प्रमुखांनी त्यांच्या समस्या पालकमंत्र्यासमोर मांडल्या. वारकऱ्यांच्या सोयी-सुविधेमध्ये कुठलीही उणीव भासणार नसल्याची ग्वाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.
            आषाढी वारीच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचे विमोचन तसेच पालकमंत्री वॉर रूमच्या व्हाट्सअप्प क्र. 9420919077 चा शुभारंभ पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.
    बैठकीस संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच विविध पालख्यांचे प्रमुख उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद