एम पी के व्हीत जल संशोधन बैठक
भारतीय कृषि संशोधन परिषद अंतर्गत असलेल्या कृषि जल कंन्सोर्टिया संशोधन प्रकल्पांची वार्षिक आढावा बैठक महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे पार पडली. या बैठकीमध्ये भारतीय कृषि संशोधन परिषद, नवी दिल्ली या संस्थेचे उपमहासंचालक डॉ. एस.के. चौधरी हे अध्यक्षस्थानी तर सहाय्यक महासंचालक डॉ. ए. वेलमुरुगन व डॉ. अदलूल इस्लाम उपस्थित होते. या प्रसंगी भारतीय जल व्यवस्थापन संस्था, भुवनेश्वर येथील संचालक डॉ. ए. सारंगी, प्रकल्प समन्वयक डॉ. एस.के. जेना व महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. एस.डी. गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. एस.ए. रणपीसे व विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी. एस. पाटील तसेच देशातील विविध संशोधन संस्थेतील कंन्सोर्टिया प्रकल्पांचे प्रमुख संशोधक उपस्थित होते. यावेळी विविध संशोधन संस्थेतील सुरु असलेल्या कंन्सोर्टिया प्रकल्पातील प्रमुख संशोधकांनी तेथील सुरु असलेल्या संशोधनांचे सादरीकरण केले. संपुर्ण कंन्सोर्टिया प्रकल्पांचे प्रकल्प समन्वयक डॉ. एस.के. जेना यांनी सर्व प्रकल्पांचे प्रास्ताविक मांडले. डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी स्मार्ट इरिगेशन प्रकल्पाचे, डॉ. आर.के. पांडा यांनी स्वयंचलीत कालवा सिंचन प्रणाली प्रकल्पाचे, डॉ. एस.के. श्रीवास्तव यांनी भुजल उर्जेचे विश्लेषण करुन भुजल पातळी सुधारणे या प्रकल्पाचे व डॉ. एस.के. जेना यांनी भुपृष्ठीय जल संसाधनांचा विकास आणि व्यवस्थापन प्रकल्पाचे संक्षिप्त सादरीकरण केले.
अध्यक्षस्थानी मार्गदर्शन करताना डॉ. एस.के. चौधरी म्हणाले, हल्लीच्या वातावरण बदलामुळे पाणी व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे व या विविध कंन्सोर्टिया प्रकल्पांमध्ये होणार्या आधुनिक संशोधनामुळे पाणी वापरा संदर्भातील बहुतांश प्रश्न सोडवता येतील. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाची युवा वर्गात जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात यावे अशी सुचना आलेल्या विविध संशोधन संस्थेतील संशोधकांना केली.
विद्यापीठातील आयओटी तंत्रज्ञान व सिंचन व्यवस्थापन प्रणालीमुळे योग्य प्रमाणात पिकास पाणी देऊन पाण्याची बचत तसेच पिकाची उत्पादकता वाढवता येईल असे भुवनेश्वर येथील भारतीय जल व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ. ए. सारंगी म्हणाले. सदर आढावा बैठकीचे आयोजन कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले. संशोधन संचालक डॉ. एस. डी. गोरंटीवार यांनी भारतीय कृषि संशोधन परिषदेच्या विविध संस्थांमधील शास्त्रज्ञांना विद्यापीठातील कास्ट प्रकल्प, पाणी व्यवस्थापन प्रकल्प या प्रकल्पांना भेटीचे आयोजन करुन सखोल माहिती दिली. तसेचअशोक तोडमल, रा. देवळाली प्रवरा या शेतकर्याच्या शेतावर ऊस पिकासाठी बसविण्यात आलेल्या स्वयंचलित सिंचन प्रणालीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
Comments
Post a Comment