जिद्दीला आत्मविश्वासाची जोड द्या:कुलगुरु डॉ पी जी पाटील
जिद्द, संवेदना व धाडस असेल तर तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल
राहुरी
कृषि क्षेत्रामध्ये खूप सार्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत. तुम्ही नोकरीच्या मागे न लागता त्या अमर्याद संधींचा फायदा घ्या. स्वतःमध्ये नेहमी कृतीशीलता बाळगा त्याचबरोबर काहीतरी नवीन साध्य करण्यासाठी प्रयोगशीलताही जपा. तंत्रज्ञान दिवसेंदिवस बदलत आहे, ते तंत्रज्ञान आत्मसात करण्याची तयारी ठेवा. तुमच्यामध्ये जिद्द, संवेदना व धाडस असेल तरच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठात डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटना व नाहेप प्रकल्पाच्या सहयोगाने महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलनाचे आयोजन नानासाहेब पवार सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेचे सदस्य व प्रसिद्ध व्याख्याते श्री. गणेश शिंदे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर संशोधन संचालक तथा कास्ट कासम प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, कास्ट प्रकल्पाचे संशोधक व माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ. मुकुंद शिंदे, माजी अध्यक्ष डॉ. हरिभाऊ मोरे, सचिव डॉ. विक्रम कड व डॉ. सुनील कदम उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील आपल्या भाषणात पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांबरोबर आदराचे नाते जपले पाहिजे. माजी विद्यार्थ्यांनी संघटनेकडे लक्ष द्यावे कारण माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेकडून विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला या संघटनेच्या माध्यमातून मोठी मदत होणार आहे. जीवनात यशस्वीपणे कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी फक्त आपल्या व्यवसायामध्ये न रमता नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी, नाविन्याचा ध्यास धरण्यासाठी व त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याचबरोबर संघटनेकडेही त्यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे यावेळी ते म्हणाले.
गणेश शिंदे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की विद्यापीठ शेतकर्यांसाठी संशोधनाचे त्याचबरोबर विस्ताराचे महत्त्वाचे काम करत आहे. विद्यापीठाने तयार केलेले तंत्रज्ञान फक्त विद्यापीठापुरते मर्यादित न राहता त्याचा उपयोग शेतकर्यांची परिस्थिती बदलण्यासाठी त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिकता रुजविण्यासाठी व्हायला हवा. तंत्रज्ञान बदलत असून सध्याच्या डिजीटल तंत्रज्ञानाला आपल्याला स्वीकारावे लागणार आहे. या डिजिटल तंत्रज्ञानाला आत्मसात करण्याबरोबरच हे बदलते तंत्रज्ञान शिकण्यासाठी, त्याचा आपल्या समाजाला होणारा फायदा याचबरोबर अध्यात्मिकतेशी सांगड घालायला हवी. ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्याची गरज आहे तरच ग्रामीण भागातील तरुणांचे शहराकडे होणारे स्थलांतर आपण थांबवू शकतो. शहरात उपलब्ध असलेले व्यवसाय जर आपण ग्रामीण भागात आणू शकलो तर ग्रामीण भागातील तरुण गावातच थांबून आपला उत्कर्ष साध्य करू शकतो. यासाठी कृषि अभियंत्यांची, त्यांच्या शिक्षणाची मोठी गरज आहे. विद्यार्थ्यांनी फक्त परिक्षा डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करू नका तर जीवनात यशस्वी होण्यासाठी विक्रीचे कौशल्य आत्मसात करा. तुम्ही नोकरीच्या मागे न लागता उद्योग, व्यवसाय, व्यापार काहीही करा या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यामध्ये जीवनात यशस्वी उद्योग करत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा अनुभव त्यांचा प्रवास जाणून घ्या. त्यांच्याशी संवाद साधा, त्यांचा अनुभव तुम्हाला बाहेर कुठेही वाचावयास किंवा अनुभवायला मिळणार नाही. आपण भारतात जन्माला आलो याचा अभिमान बाळगा. जे क्षण वाट्याला आले ते आनंदाने जगा. कितीही मोठ्या पदावर गेले तरी आपले पाय जमिनीवर असू द्या. एकमेकांना हात द्या, एकमेकांना मदत करा. यातूनच उद्याचा विकसित भारत तयार होईल. यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी दहा शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारा. दहा मुलांना जर तुम्ही घडवले तर ही फार मोठी गोष्ट ठरेल असे यावेळी ते म्हणाले.
यावेळी डॉ. सुनील गोरंटीवार यांनी माजी विद्यार्थी संघटनेच्या कार्याविषयीचा आढावा घेताना सांगितले की सध्याची शेती ही आपल्याला आधुनिकतेकडे न्यावी लागणार आहे. त्याशिवाय आपल्याला कुठलाही पर्याय नाही. शेतीमध्ये यांत्रिकीकरण गरजेचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली तरच भविष्यातील शेतीचा विकास होऊन विकसित भारत तयार होईल असे ते यावेळी म्हणाले. डॉ. दिलीप पवार यांनी कृषि महाविद्यालयासंबंधी तसेच माजी विद्यार्थी संघटने विषयीची माहिती दिली. डॉ. मुकुंद शिंदे यांनी माजी विद्यार्थी संघटना स्थापन झाल्यापासून तर ती स्थापन करण्यामागे असलेला उद्देश, तिची गरज याविषयी सांगितले. यावेळी पुढील वर्षी निवृत्त होणार्या प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. दिलीप पवार, डॉ. अतुल अत्रे, डॉ. मुकुंद शिंदे व डॉ. दिलीप गायकवाड यांचा समावेश होता. यावेळी मान्यवरांच्या हस्ते माजी विद्यार्थी कै. उमेश लगड यांच्या जीवनावर आधारित उमंग या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी उमेश लगड यांचे कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील कदम यांनी तर आभार डॉ. विक्रम कड यांनी मानले
Comments
Post a Comment