शेळीला झाले पाच करडे
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे अ. भा. समन्वित शेळी सुधार प्रकल्पाद्वारे संगमनेरी शेळ्यांचे जतन, संवर्धन व गुणवत्ता वाढीसाठी जातिवंत संगमनेरी बोकड शेळी पालकांना पैदासीसाठी दिले जातात. याअंतर्गत संगमनेर केंद्रातील हिवरगाव पावसा येथील शेतकरी अनिल दशरथ गोफणे यांच्या संगमनेरी शेळयांच्या कळपातील शेळ्यांनी विद्यापीठाने दिलेला नर एस.एम.-410 द्वारे प्रजनन केलेल्या दोन शेळ्यांना प्रत्येकी चार करडे व एका शेळीने पाच करड़े देण्याचा विक्रम केला आहे अशी माहिती महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी दिली. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या संगमनेरी शेळी सुधार प्रकल्पाने भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या सहाय्याने नामशेष होत असलेल्या संगमनेरी जातीच्या शेळ्यांची संख्या 3000 वरून 50000 पर्यंत नेण्यात यश मिळविले आहे. हा प्रकल्प कार्यक्षमरित्या राबविण्यासाठी कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार व पशुसंवर्धन विभागप्रमुख डॉ. दिनकर कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले असे संगमनेरी शेळी सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विष्णू नरवडे यांनी सांगितले. सदर करडांची शास्त्रोक्त पद्धतीने जोपासना व संगोपन करण्यासंबधीचे मार्गदर्शन संगमनेर केंद्रातील प्रक्षेत्र गणक प्रवीण फटांगरे करत आहेत.
Comments
Post a Comment