मुलींनो घाबरु नका-डाॅ मनिषा गुजाळ
राजर्षी शाहू महाविद्यालयात ‘निर्भय कन्या अभियान कार्यशाळा’ संपन्न
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या राजर्षी शाहू महाविद्यालय येथे विद्यार्थी विकास मंडळ आयोजित निर्भय कन्या अभियान महाविद्यालयाच्या प्राचार्या स्वाती हापसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
व्याख्यात्या म्हणून योग शिक्षिका डॉ. मनिषा गुंजाळ, प्रा. डॉ. प्रियंका नालकर, प्रा. अश्विनी चागेडे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. प्रथम पुष्प गुंफताना डॉ. मनीषा गुंजाळ म्हणाल्या की, योगामुळे शारीरिक प्रतिकार क्षमता वाढविण्यास मदत होते. त्यासाठी मुलींनी रोजच्या दिनचर्येत योगसाधना करणे गरजेचे आहे. तसेच आहारा बाबत सजग राहिले पाहिजे. आहारामुळे शारीरिक आणि योग साधनेमुळे मानसिक अशा दोन्हीही पातळ्यांवर आरोग्य सुधारले गेले पाहिजे. त्यातूनच जगण्यासाठी नवी सकारात्मक उर्जा प्राप्त होते. तसेच डॉ. गुंजाळ यांनी योग प्रात्याक्षिके विद्यार्थिनींना शिकविली.
व्याख्यानाचे दुसरे पुष्प गुंफताना डॉ. नालकर यांनी महिलांच्या आर्थिक साक्षामिकार्नावर मार्गदर्शन केले. महिलांनी आपले परावलंबित्व कमी करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले पाहिजे, असे प्रतिपादन केले. आजच्या धावपळीच्या युगामध्ये महिलांनी उत्पन्नाचे विविध स्त्रोत शोधले पाहिजे. त्यासाठी कौशल्यांवर आधारित वेगवेगळे शैक्षणिक कोर्स आणि कौशल्ये आत्मसात केले पाहिजेत. येत्या काळाची ही गरज आहे, असेही त्या म्हणाल्या. तृतीय पुष्प गुंफताना प्रा. अश्विनी चंगेडे यांनी महिला सक्षमीकरणावर विचार व्यक्त केले. पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात महिलांनी पुढे आले पाहिजे. आज महिला सर्वच क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत. असे त्या म्हणाल्या. अनेक यशस्वी महिलांची उदाहरणे देऊन त्यांनी विद्यार्थिनींना प्रोत्साहित केले.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या प्राचार्या स्वाती हापसे मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, योग, आहार आणि आरोग्य ही त्रिसूत्री विद्यार्थिनींनी आपल्या जीवनात पाळली पाहिजे. सक्षम होणे म्हणजे फक्त आर्थिक सक्षम होणे नव्हे, तर चांगला आहार आणि चांगले आरोग्य राखणे हे आयुष्यात महत्वाचे आहे. त्यातूनच सर्वांगीण विकास घडून येत असतो. आर्थिक बाबी या दुय्यम मानून ‘स्व’ आरोग्य ही गोष्ट प्राधान्यक्रमावर असली पाहिजे. २१ व्या शतकाचा विचार केला तर धावपळीच्या या युगात महिलांनी सर्वच क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी सबल होणे गरजेचे आहे, मात्र सबल होण्यामध्ये प्राधान्यक्रम ठरविता आले पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान शाखा विभागप्रमुख प्रा. तबस्सुम शेख यांनी केले. प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. बापूसाहेब खिलारी यांनी केले, तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अविनाश मेहेत्रे यांनी मानले.
Comments
Post a Comment