पुणे कृषि महाविद्यालयांच्या वतीने वसुबारस उत्साहात
पुणे कृषी महाविद्यालयाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रात वसुबारसेचा सण उत्साहात
बदलत्या हवामान परिस्थितीत देशी गायींचे महत्व अनन्यसाधारण
देशी गोपालनाच्या माध्यमातून शेतकर्यांना शाश्वत व फायदेशीर उत्पादनाचा स्त्रोत आहे. सध्याच्या बदलत्या हवामानाच्या परिस्थितीमध्ये देशी गाईंना अनन्य साधारण महत्व असून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत त्यांचे संगोपन, संवर्धन करून उत्पादनात भरीव वाढ घडविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
पुणे कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये वसुबारसेचा सण पारंपारिक पद्धतीने अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी उपस्थितांसह सवत्स धेनूचे पूजन केले. या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी कामधेनू विद्यापीठ, गांधीनगर, गुजरात तथा आणंद, गुजरात येथील आणंद कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एम.सी. वार्ष्णेय, डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. शंकरराव मगर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकटराव मायंदे, माजी कुलगुरू डॉ. विलास भाले, डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय सावंत, पुणे येथील फुलोत्पादन संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. के.व्ही. प्रसाद, पुणेचे सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद पाटील, माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने व तांत्रिक प्रमुख डॉ. धीरज कंखरे उपस्थित होते.
यावेळी सर्व उपस्थितांनी गायींचे गोठे, गोपरिक्रमा, स्वयंचलित वातावरण नियंत्रित गोठा, फुले स्मार्ट हवामान केंद्र, सौर ऊर्जा प्रकल्प, गोबर गॅस संयंत्र व दुग्ध प्रक्रिया प्रयोगशाळा या ठिकाणी भेट दिली व शाश्वत देशी गोपालनाच्या मॉडेलची पाहणी करून या केंद्रावर सुरू असलेल्या देशी गाईंच्या संशोधनाबद्दल कौतुक व समाधान व्यक्त केले. या प्रसंगी देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment