स्वतःचे ज्ञान सतत अपडेट ठेवा

माहिती व तंत्रज्ञान युगात 
 अपडेट रहा 
-  व्याख्याते जयेश देशमुख

तुम्हाला जे काही बनायचे आहे ते प्रथम कागदावर लिहा व ते पुर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करीत रहा. आपल्यातील सॉफ्ट स्किल विकसीत करण्यासाठी नेहमी स्वतःला अपग्रेड करुन अपडेट ठेवा असे प्रतिपादन यशदा संस्थेने मान्यता दिलेले प्रेरक वक्ते व प्रशिक्षक जयेश देशमुख यांनी केले.  विद्यापीठातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांचा सर्वांगीन विकास होण्याच्या दृष्टीने महिन्यातून दोन वेळा तज्ञ व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते. 
 महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील जागतिक बॅक अर्थसहाय्यीत, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र (कास्ट-कासम प्रकल्प) यांच्या सहकार्याने सॉफ्ट कौशल्य विकास या विषयावर व्याख्यानाचे आयोजन नानासाहेब पवार सभागृहात करण्यात आले होते. यावेळी तज्ञ व्याख्याते म्हणुन  जयेश देशमुख बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील होते. 
याप्रसंगी या कार्यक्रमासाठी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, कुलगुरुंचे विशेष कार्याधिकारी तथा आंतरविद्या जलसिंचन विभागाचे प्रमुख डॉ. महानंद माने उपस्थित होते. 
जयेश देशमुख आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की नेहमी स्पर्धा स्वतःशी करा. या जगात पदाला किंमत आहे. स्वतःला कधीही कमी लेखू नका. जे काही करायचे आहे ते मनापासून व जीव लावून करा. यश तुमचेच आहे. याप्रसंगी विविध उदाहरणे देवून तसेच शायरीद्वारेही त्यांनी उपस्थितांना सॉफ्ट कौशल्य विकासाविषयी मार्गदर्शन करुन मंत्रमुग्ध केले. यावेळी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. सी.एस. पाटील म्हणाले की यश मिळविण्यासाठी सतत प्रयत्न केले तरच आपण यशाचे शिखर गाठू शकतो. भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी, जीवनाला अर्थपूर्ण बनविण्यासाठी सर्वांनी सातत्याने प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख डॉ. महानंद माने यांनी करुन दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शुभांगी घाडगे यांनी तर आभार डॉ. महानंद माने यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व पदव्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद