भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला
राहुरी। शिवाजी घाडगे
प्रत्येक व्यक्तीला आपल्या मामाचं गाव जिव्हाळ्याचं असतं. कारण बालपणीच्या निरागस आठवणी, पहिल्या हशा-खेळा, मातीचा वास आणि माणसांचा ओलावा याच गावात जपलेला असतो.
देवळाली प्रवरा हेच असे एक गाव होते—जिथे भाचे अजित अनंतराव पवार यांचा जन्म झाला. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर ही त्यांची जन्मभूमीच नव्हे, तर त्यांच्या आयुष्याच्या आठवणींचं माहेरघर होतं.
“बालपणाचा काळ म्हणजे सुखाचा काळ” असे म्हणतात, आणि ते अजितदादांच्या बाबतीत अगदी खरं ठरतं. देवळालीच्या जत्रेतली भेळ, गोडीशेव, लहानपणी खेळलेले गोट्या, कोया, सुरपारंब्या, विट्टी-दांडू—या साऱ्या खेळांमध्ये त्यांचं बालपण हरवलेलं होतं. इथंच शिक्षण घेत, मातीशी नातं घट्ट करत ते मोठे झाले.
राज्याच्या राजकारणात ते “साहेब” झाले, पण देवळालीसाठी ते नेहमीच ‘दादा’ राहिले.
देवळाली प्रवरा येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी एक आठवण सांगितली होती—
“आम्ही देवळाली प्रवरातून ज्वारीच्या बैलगाडीतून काटेवाडीला जायचो.”
देवळालीत कदम कुटुंब हे दादांचे मामा होते. या गावाशी असलेलं नातं केवळ रक्ताचं नव्हतं, तर आठवणींचं, संस्कारांचं आणि प्रेमाचं होतं.
सुमारे ६६ वर्षांचं समृद्ध आयुष्य जगल्यानंतर, बुधवार, २८ जानेवारी रोजी काळाने घाला घातला… आणि एका भीषण विमान अपघाताने दादांना आपल्यातून हिरावून नेलं.
अतिशय कमी वयात ते राजकारणात सक्रिय झाले. पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली, त्यानंतर बारामतीचे आमदार झाले.
अजित अनंतराव पवार हे भारतीय राजकारणातील एक कणखर, स्पष्टवक्ते आणि प्रभावी नेतृत्व होते. जानेवारी २०२६ मध्ये निधन होईपर्यंत त्यांनी महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री म्हणून कार्य केले.
पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील विविध सरकारांमध्ये त्यांनी एकूण सहा वेळा उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली.
२०२४ मध्ये त्यांनी महाराष्ट्राचे आठवे उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला.
५ डिसेंबर २०२४ ते २८ जानेवारी २०२६ या कालावधीत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सेवा केली.
अर्थ, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण (अतिरिक्त प्रभार), अल्पसंख्याक विकास व औकाफ (अतिरिक्त प्रभार) अशी महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली.
२९ ऑगस्ट १९९१ ते २८ जानेवारी २०२६ या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते.
जेव्हा अजित पवार विमान अपघातात निधन पावल्याची बातमी देवळाली प्रवरात पोहोचली, तेव्हा संपूर्ण गावावर शोककळा पसरली. व्यावसाय बंद ठेवून, अश्रूंनी डोळे भरून, देवळाली प्रवराने आपल्या लाडक्या भाच्याला श्रद्धांजली वाहिली.
२००१ साली देवळाली प्रवरा नगरपालिकेला महाराष्ट्र शासनाचा संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान व पंडित नेहरू नागरी स्वच्छता अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळाला होता. त्या बक्षीस वितरण समारंभात दादांनी अभिमानाने म्हटले होते—
“देवळाली हे माझं आजोळ आहे, आणि मला त्याचा अभिमान आहे.”
कधी कधी खास वेळ काढून ते देवळाली प्रवरा येथे येत असत…
पण आता…
आता पुढे हा भाचा कधीच देवळालीला येणार नाही.
मात्र त्यांच्या आठवणी, त्यांचा आवाज, त्यांचं प्रेम आणि देवळालीशी असलेलं नातं—
हे सगळं या मातीमध्ये कायम जिवंत राहील.
Comments
Post a Comment