नाशकात अपक्ष गोकुळ गिते विजयी ; महायुतीच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह
नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गिते विजयी; महायुतीच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह राजरंग।शिवाजी घाडगे नाशिक येथील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण केली होती. अखेर या निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी दणदणीत विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गिते यांना सुमारे ३५७ मते मिळाली, तर शिवसेना (शिंदे गट) समर्थित महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना २४८ मतांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, या मतदारसंघात महायुतीकडे संख्याबळ अधिक असल्याचे मानले जात असतानाही त्यांच्या उमेदवाराचा झालेला पराभव राजकीयदृष्ट्या धक्कादायक मानला जात आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद, नाराजी आणि स्थानिक पातळीवरील गटबाजी पुन्हा एकदा उघड झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. नरेंद्र दराडे यांच्या पराभवामुळे महायुतीत सर्व काही सुरळीत नसल्याचे संकेत मिळाले आहेत. हा पराभव दराडे यांच्यासाठी वैयक्तिक पातळीवरही मोठा धक्का मानला जात आहे. महायुतीकडे पुरेसे संख्याबळ असताना पराभव कसा झाला, याचे आत्मपरीक्षण आता संबंधित पक्षांना क...