कांद्याचे ठोस धोरणा साठी सरकारला शिफारस करु-पाशा पटेल
कांद्याचे सरकारी धोरण निश्चित करताना शासनाला ठोस शिफारसी करणार
राहुरी - प्रतिनिधी @घाडगे न्यूज
कांदा हे महाराष्ट्रातील महत्वाचे पीक असून, कांद्याचा उत्पादन खर्च हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कांद्याबाबत सरकारी धोरण निश्चित करताना शास्त्रीय पद्धतीने नेमका उत्पादन खर्च निश्चित करून शासनाला ठोस शिफारसी करण्यात येतील, असे कांदा धोरण समिती आणि राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले.
कांदा पिकाचे जटिल प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या पाशा पटेल यांच्या समितीची चौथी बैठक महात्मा फुले कृषि विद्यापीठात पार पडली. यावेळी मार्गदर्शन करतांना पाशा पटेल बोलत होते. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, समितीचे सदस्य तथा कृषि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र हीले, उद्यानविद्या विभाग प्रमुख तथा कांदा पैदासकर डॉ. बी.टी पाटील, राजगुरुनगर येथील कांदा लसूण संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. थंगा स्वामी, पुणे येथील महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे व्यवस्थापक सुहास काळे व पीक उत्पादन खर्च योजनेचे प्रमुख डॉ. रोहित निरगुडे उपस्थित होते.
यावेळी समितीचे अध्यक्ष श्री. पाशा पटेल यांनी कांदा धोरण समितीच्या स्थापने मागील पार्श्वभूमी उपस्थितांना स्पष्ट केली. याप्रसंगी डॉ. बी.टी. पाटील यांनी कांदा पिकाच्या उत्पादकता वाढीबाबत महात्मा फुले कृषि विद्यापीठाने तसेच इतर कृषि संशोधन संस्थांनी केलेले संशोधन याबाबत माहिती दिली. यावेळी बैठकीला उपस्थित शेतकर्यांनी प्रतिहेक्टरी कांदा उत्पादनासाठी येणार्या खर्चाबाबत माहिती दिली. त्यानंतर डॉ. रोहित निरगुडे यांनी उपस्थित समिती सदस्य आणि शेतकर्यांना सादरीकरण केले. शेतकर्यांनी मांडलेल्या उत्पादन खर्च आणि शासनाच्या योजनेअंतर्गत विविध प्रक्षेत्रावर नमुना पद्धतीने नोंदी केलेला कांदा उत्पादन खर्च यावर यावेळी तुलनात्मक चर्चा झाली. शेतकर्यांचा वाढीव उत्पादन खर्च हा दुबार पेरणीसाठी बियाण्याचा जास्तीचा वापर, अतिरिक्त खते आणि कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे होत असल्याचे डॉ. थंगा स्वामी यांनी उपस्थित शेतकर्यांना सहप्रमाण दाखवून दिले. यावेळी समितीचे अध्यक्ष पाशा पटेल यांनीही यावर सहमती दाखवत कृषि विद्यापीठाच्या उत्पादन खर्चाची माहिती योग्य असल्याचा दाखला दिला.
या बैठकीला प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पद्धतीने सहभागी झालेल्या अनेक तज्ञांनी यावेळी झालेल्या चर्चेत सहभागी होत उत्पादन खर्च कमी करणे तसेच नेमका उत्पादन खर्च काढण्यासाठी आवश्यक बाबींवर योग्य शिफारसी कराव्यात अशी मागणी केली. कांदा पीक उत्पादन खर्चामध्ये मजुरीचा खर्च हा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे उत्पादन खर्च कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर सविस्तर चर्चा झाली व यामध्ये प्रामुख्याने कांदा लागवडीसाठी लागवड यंत्राची गरज असल्याचे नमूद करण्यात आले. या बैठकीचे सूत्रसंचालन सुहास काळे यांनी तर आभार डॉ. दत्तात्रय सानप यांनी मानले.
Comments
Post a Comment