संशोधन कार्यात नैसर्गिक शेतीला महत्व-कुलगुरु विलास खर्चे

संशोधन कार्यात नैसर्गिक शेतीला प्राधान्य द्यावे लागणार
- कुलगुरू डॉ. विलास खर्चे
घाडगे न्यूज |प्रतिनिथी 
हरित क्रांतीनंतर हायब्रीड बियाणे व रासायनिक खते आल्यानंतर उत्पादन वाढले असले तरी या काळात जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाले. त्यानंतर पाण्याचे दुर्भिक्ष्य, शेणखताचा कमी वापर, सेंद्रीय खताचा जास्त वापर न करणे यामुळे नैसर्गिक शेतीकडे वळावे लागत आहे. या पुढील काळात जमिनीच्या आरोग्याच्या संवर्धनासाठी नैसर्गिक शेतीला अधिक प्राधान्य द्यावे लागणार आहे, असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी व्यक्त केले.  
महात्मा फुले कृषि विद्यापीठाअंतर्गत पुणे कृषि महाविद्यालयातील मृद विज्ञान विभागाच्या वतीने निरोगी शहरांसाठी निरोगी माती या संकल्पनेवर आधारित 12 वा जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला. यावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या मृद विज्ञान विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. जालंदर पाटील, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या मृद विज्ञान विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. सुभाष ढाणे, महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या मृद विज्ञान विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. अजितकुमार देशपांडे, डॉ. अर्जुन बांगर, डॉ. अशोक पाटील, भारतीय किसान संघाचे संघटन मंत्री चंदन पाटील, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी प्राध्यापक डॉ. अशोक पाटील, जेष्ठ मृदा शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद जगताप, आय.सी.आय.सी.आय.फाऊंडेशनचे पश्चिम विभाग प्रमुख दिपक पाटील, पुणे येथील मिटकॉनचे  विशाल डावखर उपस्थित होते. 
विकास खर्चे म्हणाले की, जमिनीचा विषय हा सर्वाच्या जिव्हाळ्याचा आहे. मागील काही वर्षात जमीनीचा आरोग्य हे निश्चितच खालवले असून त्यातील कर्बाचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्याचे परिणाम पिक उत्पादन आणि मानवी आरोग्यावर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवरून विविध कार्यक्रम घेतले जात आहे. गेल्या पंधरा वर्षापासून आपण सेंद्रीय शेतीवर काम करत आहे. परंतु आता 2025 मध्ये सेंद्रीय शेतीखाली किती क्षेत्र आले आहे हा प्रश्न आहे. 
सेंद्रीय शेती ही अलीकडच्या काळातील  संकल्पना असली तरी तशी ती जुनी आहे. त्याचे अवलंबन व त्याखालील क्षेत्र फारसे वाढलेले दिसत नाही. त्यामुळे शेतकरी संभ्रमाअवस्थेत असून त्यांना बाहेर काढण्याची गरज आहे. त्यासाठी नैसर्गिक शेतीचे संशोधन करावे लागणार आहे. त्यासंबधी शासन स्तरावरून अभ्यासक्रम तयार करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. चारही कृषी विद्यापीठात नैसर्गिक शेती करावी लागणार आहे. त्यामुळे नैसर्गिक शेतीमध्ये नवीन संशोधन करून शास्त्रीय पुरावे लोकांपुढे आणावे लागणार आहे. त्यासाठी शास्त्रज्ञांनी पुढाकार घ्यावा. यासोबत हवामान बदलाशी सुसंगत असे नवे तंत्रज्ञान, नवीन बियाणे हे विकसित करण्यावर भर द्यावा लागणार आहे. 
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या मृद विज्ञान विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. जालंदर पाटील म्हणाले की, शेतीत ए आय चे तंत्रज्ञान आले आहे. त्याचा वापर विद्यार्थ्यांनी करून शेतकर्यांपर्यत पोहचले पाहिजे. परंतु अनेक अडचणी आपल्यासमोर असल्या तरी विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत संशोधनाचे काम खरंच पुढे जाऊ शकते का अशीही खंतही त्यांनी व्यक्त केली. 
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठच्या मृद विज्ञान विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. सुभाष ढाणे म्हणाले की, जमिनीत वेगवेगळे घटक संतुलित प्रमाणात राहिले तरच ही माती टिकणार आहे. त्यासाठी वेळोवेळी माती परिक्षण करणे गरजेचे आहे. परंतु आपण रासायनिक खते जमिनीत टाकत असलो तरी त्याचा फारसा परिणाम होतो, असे म्हणता येणार आहे. कारण परदेशात आपल्यापेक्षा अधिक प्रमाणात रासायनिक खताचा वापर होत आहे. तरीही आपल्याकडे शेतकरी घेत असलेल्या विविध पिकांमुळे मातीतील अन्नद्रव्य शोषून घेत असल्यामुळे मातीचे आरोग्य टिकवणे हे आपल्यापुढे मोठे आव्हान आहे.  
कार्यक्रमाची सुरवात शंखनादाच्या गजरात दीपप्रज्वलन व भूमाता पूजन या अनोख्या उपक्रमाने झाली. कृषि महाविद्यालयातील मृद विज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ. अविनाश गोसावी यांनी प्रास्तविक केले. सहयोगी प्राध्यापक  डॉ. धर्मेंद्र फाळके यांनी संशोधन व विस्तार कार्याचा आढावा घेतला तर सहाय्यक प्राध्यापक डॉ. वृषाली घोरपडे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. दिप्ती वाघदरे यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन