दादा गेले पण प्रश्नाचे वादळ थांबेना
घाडगे न्यूज। शिवाजी घाडगे
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, दिवंगत नेते अजित पवार यांच्या आकस्मिक आणि दुर्दैवी निधनानंतर राज्याच्या राजकारणात शोककळा कायमअसताना. मात्र या दुःखद घटनेनंतर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून, काही चर्चांमागे त्यांच्या निधनानंतर उसळलेल्या प्रचंड सहानुभूती आणि लोकप्रियतेची धार बोथट करण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे.
दादा आज आपल्यात नाहीत; पण त्यांच्या जाण्यानंतर प्रत्येकजण स्वतःला अधिक शहाणा ठरविण्याच्या स्पर्धेत उतरल्याचे चित्र दिसते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शपथविधी कधी घ्यायला हवा होता, दहावा-तेरावा झाल्यानंतर घ्यायला हवा होता का, यावरही चर्चा रंगवली जात आहे. दादांच्या जाण्यानंतर घरातील नेतृत्व कोण स्वीकारणार, हा प्रश्नही उपस्थित केला जातो. मात्र अशा चर्चांमधून नेमके काय साध्य होणार, याचाही विचार व्हायला हवा.
दादांच्या आकस्मिक निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एका नेत्याचा अंत झाला नाही, तर एका शैलीचे, एका कार्यपद्धतीचे आणि निर्णयक्षम नेतृत्वाचे पर्व संपल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आणि जनमानसात उमटली आहे.
मात्र अशा दुःखद प्रसंगानंतरही राजकारण थांबत नाही. उलट नेतृत्वाची पोकळी, वारसदाराचा प्रश्न, संघटनात्मक समतोल आणि सत्तेतील भूमिका याबाबत चर्चा अधिक तीव्र होतात. दादांच्या निधनानंतरही हेच चित्र पाहायला मिळाले. काहींनी त्यांच्या लोकप्रियतेच्या लाटेकडे राजकीय भिंगातून पाहिले, तर काहींनी सहानुभूतीच्या राजकारणाची शक्यता मांडली. अशा चर्चा अपरिहार्य असल्या, तरी त्या संवेदनशीलतेच्या मर्यादेत राहणे आवश्यक आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदाची शपथ कधी घ्यावी, हा मुद्दाही चर्चेत आला. अशा प्रसंगी भावनिक अपेक्षा आणि राजकीय गरज यामध्ये तणाव निर्माण होतो. शासनकारभार अखंड चालू ठेवणे ही घटनात्मक जबाबदारी असते, तर दुसरीकडे सामाजिक आणि कौटुंबिक परंपरांचाही विचार असतो. त्यामुळे या निर्णयाकडे केवळ भावनिक किंवा केवळ राजकीय नजरेतून पाहणे योग्य ठरणार नाही.
दादांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांवर परिणाम झाला आहे, हे वास्तव आहे. ते पक्षातील प्रभावी, निर्णयक्षम आणि संघटनात्मक पकड असलेले नेतृत्व होते. त्यांची कार्यशैली स्पष्ट, वेगवान आणि अनेकदा धाडसी निर्णयांची साक्ष देणारी होती. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची नवी रचना कशी उभी राहील, हा प्रश्न स्वाभाविक आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दादांना पुढे आणले, घडवले आणि संधी दिली, हे सर्वश्रुत आहे. या नात्याला केवळ राजकीय समीकरण म्हणून पाहता येणार नाही. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर उमटलेली भावनिक प्रतिक्रिया ही राजकीयपेक्षा वैयक्तिक नात्याची जास्त होती, असे म्हणता येईल.
आता महत्त्वाचा मुद्दा असा की, दादांच्या जाण्यानंतर निर्माण झालेल्या भावनिक लाटेचा वापर कोणत्या दिशेने होतो. केवळ सहानुभूतीच्या आधारावर नेतृत्व उभे राहत नाही; त्यासाठी कार्य, संघटन कौशल्य आणि जनविश्वास यांची सातत्यपूर्ण जपणूक आवश्यक असते. त्यांच्या सहकाऱ्यांना कमी लेखणे किंवा वारसदाराच्या चर्चेत अडकून पडणे याने राजकीय स्थैर्य मिळणार नाही.
दादांची लोकप्रियता आणि त्यांच्यावरील विश्वास हे त्यांच्या कामातून निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांच्या स्मृती जिवंत ठेवायच्या असतील, तर त्याच कार्यक्षमतेने आणि लोकाभिमुख दृष्टिकोनातून पुढील वाटचाल करावी लागेल. भावना महत्त्वाच्या असतात; पण दीर्घकालीन राजकारणात कृती आणि विश्वास अधिक महत्त्वाचे ठरतात.
दादा आज आपल्यात नाहीत; मात्र त्यांच्या जाण्याने उपस्थित झालेले प्रश्न आणि निर्माण झालेली पोकळी राज्याच्या राजकारणासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. या टप्प्यावर भावनांपेक्षा विवेक आणि स्पर्धेपेक्षा संघटनात्मक स्थैर्य यांना प्राधान्य देणे, हेच खरे नेतृत्वाचे लक्षण ठरेल.
Comments
Post a Comment