टिळक नावाचा राजकीय तिलक
रिपोर्ट घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे
राज्यसभेच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवे समीकरण उभे राहताना दिसत आहे. शिवसेना (शिंदे गट)ने ‘केसरी’चे संस्थापक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पणतू डॉ. रोहित दीपक टिळक यांना उमेदवारी देत राजकीय चर्चेला नवे वळण दिले आहे. ही केवळ एक उमेदवारी नाही; तर इतिहास, परंपरा आणि आधुनिक राजकारण यांच्या संगमातून उभा राहिलेला एक प्रतीकात्मक निर्णय मानला जात आहे.
डॉ. रोहित टिळक हे शिक्षण, सामाजिक कार्य आणि माध्यम क्षेत्राशी जोडलेले व्यक्तिमत्त्व आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे उपाध्यक्ष तसेच ‘केसरी’ या ऐतिहासिक वृत्तपत्राचे महाव्यवस्थापक म्हणून ते कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे काँग्रेस पार्श्वभूमी असलेल्या टिळक वंशजाला शिवसेनेने उमेदवारी देणे हे राजकीय दृष्ट्या अनपेक्षित असले, तरी त्यामागे असलेली रणनीती स्पष्ट दिसते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेताना केवळ एक उमेदवार दिला नाही; तर राजकारणात टिळक नावाची ऐतिहासिक छाप पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न केला आहे. संसदेत टिळकांचे नाव पोहोचवण्याचा हा प्रयत्न म्हणजे एका अर्थाने राजकीय मुसंडीच म्हणावी लागेल. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याशी वैचारिक आणि राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही उमेदवारी एक प्रतीकात्मक टक्कर म्हणूनही पाहिली जात आहे. प्रश्न असा आहे की, या निवडणुकीत रोहित टिळक विजय मिळवून संसदेत खरोखरच ‘टिळक नावाचा विजय तिलक’ लावतील का?
दुसरीकडे महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चा रंगल्या होत्या. त्या चर्चांदरम्यान बरेच ‘पुलाखालून पाणी वाहून’ गेले असले, तरी पवारांना पुन्हा राज्यसभेत पाठवण्याचा मार्ग तयार झाल्याचे संकेत मिळत आहेत. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी “दादा गेले आणि विलिनीकरणाची चर्चा संपली,” असे म्हणत या राजकीय घडामोडींचा सूचक उल्लेखही केला होता.
दरम्यान, भाजपनेही आपली राजकीय गणिते मांडत विनोद तावडे यांचे राजकीय पुनर्वसन केले आहे. “खासदारकी म्हणजे विनोद नव्हे,” अशी चर्चा रंगत असतानाच विद्यमान खासदार भागवत कराड यांना बाजूला ठेवत नागपूरचे वर्चस्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. त्याचवेळी रिपब्लिकन पक्षाचे नेते खासदार रामदास आठवले यांचे राजकीय स्थान अबाधित ठेवत भाजपने आपले सामाजिक आणि राजकीय संतुलनही कायम ठेवले आहे. शिर्डीतील पराभवाची आठवण आठवले यांना पुन्हा होऊ न देण्याची राजकीय काळजीही यातून दिसून येते.
एकूणच, राज्यसभा निवडणूक ही केवळ अंकगणिताची लढत नसते; ती राजकीय संदेश, प्रतिमा आणि रणनीती यांचीही परीक्षा असते. टिळकांचे ऐतिहासिक नाव, पवारांचे राजकीय वजन आणि भाजपची गणिते—या सर्वांचा संगम या निवडणुकीत दिसत आहे. आता पाहायचे इतकेच की, या राजकीय पटावर कोणता डाव शेवटी ‘मात’ करतो.
Comments
Post a Comment