राहुरीत कायद्याची ऐसी तैसी पोलीस कर्मचाऱ्यांला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
राहुरीत कायदा धाब्यावर : पोलीस कर्मचाऱ्यावरच जीवघेणा हल्ला
राहुरी : राहुरी शहरात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. राहुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी विकास वैराळ यांच्यावर समाजकंटकांनी निर्घृण हल्ला करून गळा दाबत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात वैराळ गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नगर–मनमाड राज्य मार्गावर कंटेनर आणि स्कॉर्पिओ वाहनाचा किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. या वादातून काही जणांनी ट्रक चालकाला बेदम मारहाण सुरू केली होती. ही घटना पाहून तेथे उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी विकास वैराळ यांनी पुढे येत चालकाची सुटका करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, कायदा हातात घेतलेल्या समाजकंटकांनी चालकाला वाचवण्यासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यालाच लक्ष्य केले. घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण केल्याचा राग मनात धरून आरोपींनी वैराळ यांच्यावर गज, काठ्या, फायटरसारख्या घातक वस्तूंनी तसेच लाथाबुक्यांनी अमानुष मारहाण केली. इतकेच नव्हे तर त्यांचा गळा दाबून जीवे ठार मारण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी विकास वैराळ यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात ११ जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, गुहा यात्रेच्या पार्श्वभूमीवर परिसर संवेदनशील असताना पोलीस कर्मचाऱ्यावरच असा जीवघेणा हल्ला होणे ही अत्यंत चिंताजनक बाब मानली जात आहे. विशेष म्हणजे, या गंभीर घटनेदरम्यान पोलीस ठाण्याचे काही कारभारी खेळ पैठणीच्या कार्यक्रमात दंग असल्याची चर्चा शहरात रंगू लागली असून पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
याचवेळी एका तालमीत वर्षा पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या अज्ञात आरोपींचा अद्याप शोध लागलेला नसल्यामुळेही नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पुतळा विटंबना प्रकरणातील आरोपींचा तातडीने शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Comments
Post a Comment