कृषी उत्पन्न वाढीस भारतीय स्त्री यांचे मोठे योगदान-डाॅक्टर सौम्या स्वामीनाथन

कृषी उत्पन्न वाढीस भारतीय महिलांचे मोठे योगदान : डॉ. सौम्या स्वामीनाथन 
राहुरी घाडगे न्यूज।प्रतिनिधी 
शेतीत महिलांची वाढती भूमिका; तंत्रज्ञानाची जोड आवश्यक
#*ग्रामीण भागात ८० टक्क्यांहून अधिक महिला शेतीत कार्यरत असल्याची माहिती
#*महिलांच्या श्रम कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व इंटरनेट सुविधा आवश्यक
#*स्मार्टफोनच्या मदतीने महिलांसाठी शेती अधिक सुलभ होणार
#*महात्मा फुले कृषी विद्यापीठात देशातील पहिले ‘बायोहॅपीनेस सेंटर’ सुरू
#*एकात्मिक शेती मॉडेलमुळे काही गावांचे उत्पन्न १.५ कोटींवरून ३.५ कोटींवर
#*महिला शेतकऱ्यांचा ‘शेतकरी प्रथम’ प्रकल्पांतर्गत सत्कार
-ग्रामीण भागातून शहरांकडे वाढत्या स्थलांतरामुळे शेतीत मजुरांची टंचाई निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर महिलांच्या शेतीतील श्रम कमी करणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. महिलांना साक्षरतेबरोबरच इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिल्यास त्या स्मार्टफोनच्या मदतीने अधिक सक्षमपणे शेती करू शकतील. घरामध्ये अन्न तयार करण्याबरोबरच शेतात धान्य उत्पादनामध्येही महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे प्रतिपादन चेन्नई येथील एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनच्या अध्यक्षा व भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) माजी महानिदेशक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 आणि जागतिक महिला दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्या ऑनलाइन मार्गदर्शन करत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे होते.
यावेळी एम.एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनच्या वरिष्ठ फेलो डॉ. आर. व्ही. भवानी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. विशेष अतिथी म्हणून छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्याच्या उपवनसंरक्षक सुवर्णा माने (भारतीय वनसेवा) तसेच पुणे येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी व्यवसाय व्यवस्थापन तज्ज्ञ उज्वला बाणखिले उपस्थित होत्या.
डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या की, डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या संकल्पनेनुसार पर्यावरणाचे संरक्षण करत आणि नैसर्गिक संसाधनांना धक्का न लावता सर्वांनी आनंदाने जगणे शक्य आहे. हीच ‘बायोहॅपीनेस सेंटर’ची संकल्पना असून पुढील पिढ्यांसाठी अधिक सुंदर पर्यावरण ठेवण्याची जबाबदारी आपली आहे.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. विलास खर्चे म्हणाले की, विद्यापीठाने विकसित केलेल्या एकात्मिक शेती पद्धतीच्या मॉडेलचा शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत चिंचविहिरे, कणगर, तांभेरे व कानडगाव येथील महिला शेतकऱ्यांनी यशस्वी अवलंब केला आहे. या मॉडेलमुळे संबंधित गावांचे उत्पन्न १.५ कोटींवरून ३.५ कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. ‘फुले समृद्ध व्हिलेज’ या उपक्रमांतर्गत ही संकल्पना राज्यातील १० जिल्ह्यांतील निवडक गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. तसेच एम.एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनच्या सहकार्याने देशातील पहिले ‘बायोहॅपीनेस सेंटर’ येथे सुरू करण्यात आले आहे.
डॉ. आर. व्ही. भवानी यांनी सांगितले की, २०२३-२४ च्या अहवालानुसार महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ८० टक्क्यांहून अधिक महिला शेतीत कार्यरत आहेत. महिलांना अधिक अधिकार देण्यासाठी राज्य शासन लवकरच विशेष योजना कार्यान्वित करणार आहे. पर्यावरण व मानवी कल्याणासाठी देशभरात बायोहॅपीनेस सेंटर्स सुरू करण्यात येणार असून त्याची सुरुवात करणारे महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे देशातील पहिले विद्यापीठ आहे.
कार्यक्रमात सुवर्णा माने, उज्वला बाणखिले व डॉ. शाकीर अली यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या ‘शेतकरी प्रथम’ प्रकल्पातील महिला शेतकऱ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन