आधुनिक बाबा कडुन अध्यात्माला उद्योगाचे स्वरुप

आधुनिक "बाबा"आणि संपत्तीचा साम्राज्य अध्यात्म की उद्योग?
श्रध्देचा बाजार।शिवाजी घाडगे 
हल्लीच्या काळात आधुनिक बाबा  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक व्यक्तींनी कोट्यवधी-करोडो रुपयांची अफाट संपत्ती उभी केली आहे. ही संपत्ती केवळ भक्तांच्या श्रद्धेवर आधारित असून, स्वतःचे महात्म्य निर्माण करून ती गोळा करण्यात आली आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. या बाबांची संपत्ती किती असेल, याचा विचार केला तरी सामान्य माणसाला अक्षरशः आध्यात्मिक भोवळ आल्या शिवाय राहत नाही.
काही बाबा बाह्य स्वरूपात साधेपणा दाखवतात अंगावर कमी वस्त्र, साधी जीवनशैली परंतु लोभाचा त्याग केला आहे का, हा खरा प्रश्न आहे. वस्त्रांचा त्याग सहज शक्य आहे; पण लोभाचा त्याग कितीजण करतात?
सध्या गाजत असलेले भोगू कॅप्टन अशोक खरात यांचे प्रकरण हे याच प्रवृत्तीचे ताजे उदाहरण आहे. काही दिवस हे प्रकरण चर्चेत राहील, नंतर विस्मरणात जाईल आणि पुन्हा एखादा ‘नवा बुवा’ जन्माला येईल हीच  वस्तुस्थिती आहे.
मागे वळून पाहीले तर अनेक मोठ्या आध्यात्मिक संस्थांच्या संपत्तीचे आकडे चकित करणारे आहेत.  सत्य साईबाबांच्या मालमत्तेची मोजदाद झाली तेव्हा सुमारे ७५ हजार कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे उघड झाले. याच संदर्भात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांना वाटते 
“धन मिळवूनी कोटी, सवे नये रे लंगोटी”
 कितीही संपत्ती मिळवली तरी शेवटी माणूस रिकाम्या हातानेच जातो.
 साधा सायकलचे पंचर काढणारे आसाराम बापू यांच्या संस्थांचा विस्तार जगभर शेकडो आश्रम, हजारो बालसंस्कार केंद्रे आणि कोट्यवधींची उलाढाल. तसेच स्वामी नित्यानंद यांच्या ध्यानपीठाची संपत्ती हजारो कोटींमध्ये असल्याचे मानले जाते.
योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी पतंजलीच्या माध्यमातून आयुर्वेद आणि उद्योग क्षेत्रात मोठे साम्राज्य उभे केले. त्यांची संपत्ती आणि वार्षिक उलाढालही हजारो कोटींच्या घरात पोहोचली आहे.
संत नामदेव म्हणतात
“संपत्तीच्या बळे एक जाले आंधळे...”
संपत्तीचा अतिरेक माणसाला विवेकहीन बनवतो, हे त्यांनी स्पष्ट केले आहे.
श्री श्री रविशंकर यांच्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेचे जाळे १५० हून अधिक देशांत पसरलेले आहे. माता अमृतानंदमयी, सद्गुरू जग्गी वासुदेव, शिवयोगचे संस्थापक, तसेच इतर अनेक धार्मिक नेत्यांनीही मोठ्या प्रमाणावर संपत्ती उभी केली आहे. काहींच्या कार्यात सामाजिक उपक्रम असले तरी संपत्तीचे प्रमाण आणि त्यातील पारदर्शकता हा नेहमीच चर्चेचा विषय राहतो.
संत भानुदास म्हणतात
“माझे माझे म्हणती, कोण हे कोणासी कामासी आले...”
माणूस ‘माझे’पणात इतका अडकतो की शेवटी सत्य ओळखायलाही उशीर होतो.
गुरमीत राम रहीम, पॉल धिनकरन यांसारख्या विविध धर्मातील आध्यात्मिक नेत्यांच्या संपत्तीचे आकडेही कोट्यवधींमध्ये आहेत. या सर्व उदाहरणांमधून एकच गोष्ट स्पष्ट होते श्रध्देच्या नावाखाली संपत्तीचा मोठा प्रवाह निर्माण झाला आहे.
संत एकनाथ म्हणतात—
“घालुनियां काखे धन, सदा मागे कोरान्न...”
म्हणजे संपत्ती असूनही माणूस अंतर्मनाने गरीब राहतो.
पूर्वीचे संत मात्र यापेक्षा पूर्णतः भिन्न होते. त्यांची संपत्ती म्हणजे आत्मज्ञान, समाजसेवा आणि अध्यात्मिक उंची. त्यांच्या जीवनात पारदर्शकता आणि त्याग होता. त्यामुळे त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याचा प्रश्नच निर्माण होत नव्हता.
आज परिस्थिती बदलली आहे. हजारो बाबा, बुवा, महाराज, पाद्री, मौलवी अनेक जण संपत्तीच्या सागरात लोळताना दिसतात. तरीही त्यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी होत नाही. कारण अशा व्यक्तींना राजकीय पाठबळ असते, आणि त्यांच्यावर कारवाई केल्यास सत्तेवर परिणाम होऊ शकतो.
भक्तांचा अखंड ओघ आणि आंधळी श्रद्धा यामुळे या ‘दरबारां’चा झगमगाट कायम राहतो. भक्त स्वतःहून सर्व काही अर्पण करतात. अर्थात, सर्वच संत वाईट आहेत असे नाही; पण लोकांच्या भीतीचा, अंधश्रद्धेचा आणि मानसिक अस्थिरतेचा फायदा घेणारेही कमी नाहीत.
आजच्या धावपळीच्या जीवनात मनःशांती हरवत चालली आहे. अधिकाधिक कमावण्याच्या हव्यासात जीवन जगणेच विसरले जात आहे. अशा परिस्थितीत लोक आध्यात्मिक आधार शोधतात, आणि याच ठिकाणी काही जण त्याचा गैरफायदा घेतात.
म्हणूनच आता एक गंभीर प्रश्न उभा राहतो
अध्यात्मिक संस्थांचे आर्थिक ऑडिट होणे गरजेचे नाही का?
जर या संस्थांमध्ये पारदर्शकता आली, तर खरे संत आणि ढोंगी यांच्यातील फरक स्पष्ट होईल. अन्यथा, श्रद्धेच्या नावाखाली संपत्तीचे साम्राज्य वाढतच राहील आणि सामान्य माणूस फसतच राहील.
देता घेता नरका जाती असे म्हणतात येथे देणारा व घेणारा दोघे ही आहेत समाज जागृती साठी अनेकांन
 आपले आयुष्य खर्ची घातले आहे 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर