राहुरीत भाजपा व राष्ट्रवादी रंगणार थेट लढत संगतीला अपक्ष

भाजपा व राष्ट्रवादीत रंगणार मुख्य लढत संगतीला अपक्ष 
घाडगे न्यूज।प्रतिनिधी 
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत सुरुवातीला माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि भाजपाचे अक्षय कर्डीले यांच्यात थेट लढत होणार, असे चित्र स्पष्ट दिसत होते. मात्र सोमवारी सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष सुनिल चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतलेल्या बैठकीनंतर राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला. बंद दाराआड झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा करण्यात आली. या घडामोडीनंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पोटनिवडणुकीतून माघार घेत उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यांच्या या निर्णयावर सध्या विविध स्तरांवर चर्चा सुरू असली, तरी त्याचे विश्लेषण करण्यासाठी अद्याप स्पष्ट राजकीय संकेत समोर आलेले नाहीत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने राहुरी मतदारसंघावरील दावा कायम ठेवत ऐनवेळी गोविंद मोकाटे यांना उमेदवारी जाहीर केली. मोकाटे यांची स्थानिक पातळीवर मजबूत ओळख असून ते पूर्वी शिवसेनेत सक्रिय होते. त्यांनी पंचायत समिती सदस्य म्हणून काम पाहिले आहे, तर त्यांच्या मुलीने जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. कर्डीले यांचे ते कट्टर विरोधक मानले जातात. विशेष म्हणजे, मोकाटे यांचे नाव काँग्रेसकडूनही चर्चेत होते. सुरुवातीपासूनच ही पोटनिवडणूक लढवण्याबाबत ते ठाम होते. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली.
याशिवाय, वंचित बहुजन आघाडीने देवळाली प्रवरा नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक संतोष चोळके यांना उमेदवारी दिली आहे. चोळके यांची लढवय्या नेते म्हणून ओळख असून ते वंचित घटकांचे प्रश्न सातत्याने मांडत असतात.
तसेच, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिंदे गटाशी संबंधित राजूभाऊ शेटे यांच्या पत्नींसह रवींद्र मोरे यांनीही उमेदवारी अर्ज भरले आहेत.
या पोटनिवडणुकीसाठी १०० हून अधिक उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयात प्राप्त झाले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर अंतिम उमेदवारांची संख्या स्पष्ट होणार असली, तरी सध्याच्या घडीला मुख्य लढत भाजपाचे अक्षय कर्डीले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गोविंद मोकाटे यांच्यातच रंगणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर