अण्णा एका वडिलधाऱ्या सावलीचा अंत , पण आठवणींचा अनंत प्रकाश
@शिवाजी घाडगे
“अण्णा…” ही हाक आजही कानात घुमते आहे. पण आता ती फक्त आठवणीत उरली आहे. आजच्या धावपळीच्या, बदलत्या काळात “अण्णा” अशी आपुलकीची, जिव्हाळ्याची हाक ऐकायला मिळणं दुर्मिळ झालं आहे. डोक्यावर साधी टोपी, अंगात पायजमा-शर्ट किंवा तीन गुड्याचा सदरा, चेहऱ्यावर शांतता, वागण्यात संयम, बोलण्यात मितपणा आणि मनात अपार कर्तव्यभाव ही ओळख ज्या व्यक्तिमत्त्वाची होती, ते म्हणजे आमचे आधारवड सिताराम रंगनाथ घाडगे (वय ८४).
राहुरी फॅक्टरी परिसरातील मुळा कॉलनीत वास्तव्यास असलेले अण्णा यांचे मूळ गाव कणगर. कणगर-तांभेरे रस्त्यावरील माळावर वसलेल्या साध्या मातीच्या छपरात त्यांचा जन्म झाला. वडील रंगनाथ बाबुराव घाडगे आणि आई जयाबाई यांच्या कुटुंबात नऊ अपत्यांचा मोठा परिवार रामचंद्र, सोन्याबापू, सिताराम, बन्सी, गोरक्षनाथ, मच्छिंद्र असे सहा भाऊ आणि विठ्ठाबाई, किसनबाई, लक्ष्मीबाई या तीन बहिणी.
अजून आयुष्य समजायचं बाकी असतानाच वडिलांचे छत्र हरपले आणि संसाराच्या आभाळाला भेग पडली. त्या एका घटनेने घरात अंधार दाटला. पण आई जयाबाई यांनी त्या अंधाराला घाबरून न जाता आपल्या लेकरांसाठी आशेचा दिवा पेटवला. अत्यंत हालअपेष्टा सहन करत त्यांनी मुलांना वाढवलं. १९७६साली रात्री दहा वाजता जयाबाई या आपल्या नऊ लेकरांना सोडून देवा घरी गेल्या—तो क्षण कुटुंबासाठी आयुष्यभराचा वेदनादायी ठेवा ठरला.
घरात शिक्षणाचा गंध नव्हता, परिस्थिती प्रतिकूल होती, साधनसंपत्ती नव्हती; पण जिद्द होती, चिकाटी होती. कणगरहून अनवाणी पायांनी गुहा आणि राहुरी येथे शिक्षणासाठी जाणं ही गोष्ट आज अविश्वसनीय वाटते; पण तीच त्यांची खरी ओळख होती. त्यांनी त्या काळातील जुनी अकरावी उत्तीर्ण केली—हेच त्यांच्या संघर्षाचं मोठं यश होतं.
पुढे त्यांना प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. पण कुटुंबाची जबाबदारी मोठी असल्याने त्यांनी स्वतःच्या आवडीपेक्षा कुटुंबाला प्राधान्य दिलं आणि राहुरी सहकारी साखर कारखान्यात नोकरी स्वीकारली. कामावर जाण्यासाठी सायकल हा एकमेव आधार. घरातील एक भाऊ शेती पाहत होता, तर दुसरा मेंढ्यांचा सांभाळ करत होता. जमीन असूनही ती नसल्या सारखीच पिकाला पाणी देण्यासाठी काही काळ मोटेच पाणी नंतर विदुत व्यवस्था आता तर निळवडे धरणाचे पाणी आले शेता जवळच बंधारा अण परिसरात हिरवाईने नटुन गेला याचा आनंद ही होताच
—कारण ती माळरानाची, कष्टाची.
सुरुवातीला केन सप्लाय विभागात हंगामी स्वरूपात काम केलं. ऊन-पाऊस, कष्ट—कशाचीही तमा न बाळगता त्यांनी काम केलं. पुढे सेटलमेंट ऑफिसमधील ‘ऑकआउट’ विभागात त्यांनी दीर्घकाळ सेवा बजावली. प्रामाणिकपणा, कष्ट आणि कर्तव्यनिष्ठा यावर त्यांनी आपलं आयुष्य उभारलं. ऑफ सिझनमध्ये मिळेल ते काम करून घर सांभाळलं, अगदी विहिरी खणण्यापर्यंत.
लहान भावांना शिक्षणाबरोबरच रोजगार मिळावा यासाठी त्यांनी अहमदनगर येथे पाठवलं. नागापूर येथे रस्त्याच्या कडेला सायकलचं दुकान सुरू केलं. गावातील गोरक्षनाथ नालकर यांनी या कामी मोलाचे सहकार्य केले शेतातील झाड टपरी बनवण्या साठी तोडले तर डांबराच्या बॅलर सरळ करुन पत्र्याचा उपयोग केला तसा व्यावसायतील हा पहीला श्रीगणेशा अँड रामराव चव्हाण यांची नागापूर येथील जमीन पूढे नगर मनमाड रस्त्याच्या कडेला सायकल दुकान सुरु झाले त्या साठी भाड्याने सायकल देण्या साठी जुण्या सायकल सुरुवातीला घेतल्या दुकान बरोबर रामराव चव्हाण यांनी देखील ग्रामीण भागातील पोर चांगले काम करतात म्हणून आबाला धान्य दुकान साठी जागा भाडेतत्त्वावर दिली मग त्यातच किरणा व नंतर रसवंती रसंवतीवर एम आय डी सी पोलीस ठाण्यात फोजदार बकरे यायचे त्यांनी शिकलेला पोरगा गाल्स धुतो म्हणून बीएड करण्याचा सल्ला दिला सुरुवातीला नागापूर देवळात पिपळ गाव माळवीचे शेवाळे यानी शाळा सुरु केली येथे आबा शिक्षक शिकवायला घेतले ते फोजदार बकरे याच्या सागण्यावरुन नंतर रेणुका शिक्षण संस्थेचा जन्म झाला
तिथूनच त्यांच्या भावांच्या आयुष्याला नवं वळण मिळालं. बन्सी (नाना) आयटीआय करून नागापूर एमआयडीसीत नोकरीला लागले. मच्छिंद्र (तात्या) ‘मंगल सायकल’ नावाने दुकान चालवू लागले. गोरक्षनाथ (आबा) यांनी किराणा, रसवंतीपासून सुरुवात करत पुढे ॲड. रामराव चव्हाण यांच्या प्रेरणेने ‘रेणुका शिक्षण संस्था’ स्थापन केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एका सर्वसामान्य व्यक्तीने शैक्षणिक संस्था उभारून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुरू करणं आणि शासकीय मान्यता मिळवणं—हीच अण्णांनी दिलेल्या संस्कारांची फळं होती.
अण्णांचं आयुष्य म्हणजे कष्ट, त्याग आणि जबाबदारीचं मूर्तिमंत उदाहरण होतं. स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून कुटुंबासाठी जगणं, घरातील प्रत्येकाची काळजी घेणं, शिक्षणाला प्राधान्य देणं ही त्यांची जीवनमूल्यं होती. “आपल्याकडे नसले तरी चालेल, पण घरासाठी असलं पाहिजे,” हा त्यांचा जीवनमंत्र होता. या मुळचे सर्वाना अंग भर कपडे व पोटाला भाकर खायला मिळाली
गरीबीच्या काळात नातेवाईकांनीही मदतीचा हात दिला. पढेगाव येथील आत्या लक्ष्मीबाई व त्यांचे पती साहेबराव आहेर यांनी दिवाळीत किराण्यासाठी मदत केली. चांदेगाव येथील आत्या विठ्ठाबाई व त्यांचे पती दादासाहेब भांड यांनीही साथ दिली. किसनबाई यांचे पती दत्तात्रय नालकर, कोढवडचे आजोबा पांडुरंग म्हसे नातेवाईक बरोबर कामावरील उदावत काका यांची कायम मदत राहीली गावातील किराणा वाले बाबूशेट याची उधारी वर्षभर ते कधीच मागारचे नाहीतर कपड्याची उधारी पवनशेट सेठी किती झाली तरी शेवट अंशी पैसे असायचे
आणि इतर नातेवाईकया सर्वांच्या सहकार्याने हा संघर्षमय प्रवास उभा राहिला. त्यामुळेच अण्णा केवळ कुटुंबापुरते मर्यादित न राहता समाजासाठीही आदर्श ठरले.
त्यांचं व्यक्तिमत्त्व साधं होतं, पण प्रभाव प्रचंड होता. ते मितभाषी होते, पण त्यांच्या शब्दांना वजन होतं. ते शांत होते, पण त्यांच्या निर्णयात ठामपणा होता. घरातील प्रत्येक मोठा निर्णय अण्णाच घेत असत. त्यांच्या उपस्थितीत घरात शिस्त, सुरक्षितता आणि आधार जाणवत असे. असे असले तरी राजकारणात कधी सहभाग घेतला नाही अथवा कोणतीही निवडणूक लढवली नाही तर राजकारणावर चर्चा देखील केली नाही अथवा निर्व्यसनी जीवनाचा अगिकार केला तसे ते धार्मिक वृत्तीचे नसले तरी अध्यात्माला विरोध ही नव्हता अथवा कधी मुखात शिवी देखील आली नाही
पुढे मुलं कमावती झाली, मोठा मुलगा शिवाजी माध्यम व ग्रंथ चळवळी बोरोबरच जल विषय राष्ट्र हिता बरोबर सामाजिक क्षेत्रात सक्रिय तर लहान रंगनाथ व्यावसाय आघाडीवर तसेच मुलगी मंगल प्राथमिक शिक्षक शिवाजी वारूळे यांना दिलेली तीचे मुले डाॅक्टर ईजीनर झाले
त्यामुळे जबाबदाऱ्या हलक्या झाल्या आणि अण्णांचं आयुष्य समाधानाने पुढे सरकलं. “सगळे आपल्या पायावर उभे राहिले,” याचं त्यांना प्रचंड समाधान होतं. तसा अभिमान देखील होता
पण नागापूर येथील दोन भावांच्या अकाली निधनाची खंत मात्र त्यांच्या मनात कायम होती. मोठे बंधु रामचंद्र (दादा)
आता देखील गावाकड सोन्याबापु (अप्पा) गेले अनेक दिवसा पासुन अथरुनाला खेळुन आहे तर नागापूर बन्सी (नाना) अर्धाग वायु मुळे जरजर अण्णा तसे याच्या पेक्षा बरे तीन वर्षा पुर्वी तब्येत बिघली दोन ॲटक आले नगर पुणे वैद्यकीय सेवा लगेच उपलब्ध झाली मात्र यावेळेस काळ शुक्रवारी दुपारीच आला
आता दोघे लहान भाऊ तात्या, आबा, दादा,अण्णा व आत्या विठ्ठाबाई हे सगळे हयात नसले तरी त्याचे कर्तृत्व कायम साक्षी देत असेल
खरं तर बाप जिवंत असताना त्याची किंमत कळत नाही. तो आहे, ही जाणीवच पुरेशी असते. पण तो अचानक निघून गेल्यावर आयुष्यभराची पोकळी निर्माण होते. ज्याच्या बोटाला धरून आपण उभे राहीलो चालायला शिकलो जी जी गोष्ट आपल्याला नव्हती ती त्यांनी घेतली
अण्णांच्या जाण्यानेही असंच झालं आहे. आज सगळं काही आहे, पण तरीही काहीतरी खूप मोठं हरवल्यासारखं वाटतंय.
“बापाची चप्पल जरी दारात असली, तरी त्या चपलेचा दरारा वेगळाच असतो,” असं म्हणतात आणि ते अक्षरशः खरं आहे. त्या चपला केवळ पायात घालायच्या वस्तू नव्हत्या, तर त्या घराच्या अस्तित्वाचा, शिस्तीचा आणि आधाराचा प्रतीक होत्या. आज त्या चपला आहेत, पण त्यांना जीव नाही… आणि म्हणूनच घरातली पोकळी अधिकच जाणवते.
अण्णांनी कष्ट करून केवळ आपलं आयुष्य उजळवलं नाही, तर संपूर्ण कुटुंबाला प्रकाश दिला. त्यांच्या कष्टांची सावली आजही आपल्यावर आहे. त्यांनी दिलेले संस्कार, शिकवलेली मूल्यं आणि दाखवलेला मार्ग हेच आता आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत.
आज हे अनुभवी, आदर्श आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. हा केवळ एका कुटुंबाचा नाही, तर एका पिढीचा, एका संस्कारांचा, एका जीवनशैलीचा अंत आहे.
अण्णांच्या पश्चात मुलगे शिवाजी व रंगनाथ, मुलगी मंगल, जावाई शिवाजी वारुळे, सून सीमा व संगीता, नातवंडे अनंत, वैभव,
प्रसाद, धनश्री, वेदांत, विराज तसेच जयसिंग, नितीन, प्रवीण, शुभम, सिद्धांत, सुशांत, अश्विनी, स्वाती, संगीता, गुड्डी, शकुंतला, भिकू आणि इतर आप्तस्वकीय असा मोठा परिवार आहे. तसेच असंख्य नातलग, स्नेही, ज्यांच्याशी रक्ताचं नातं नसूनही त्यांनी आपुलकीचं नातं जोडलं ते सर्व आज पोरके झाले आहेत.
Comments
Post a Comment