दादा...हा डाव नियतीने जिंकून नेला राव
राहुरी घाडगे न्यूज। शिवाजी घाडगे
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात झालेले निधन ही केवळ एक दुर्घटना नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकीय आणि भावनिक इतिहासावर पडलेली खोल जखम आहे. “पायलटला रनवे न सापडला” हे कारण कागदावर पुरेसे असू शकते; पण जनतेच्या मनाला आजही हा अपघात पटत नाही. कारण काही व्यक्ती अपघातात जात नाहीत—त्या अचानक हिरावून घेतल्या जातात. दादा त्यातलेच होते.
दादांच्या अंत्यदर्शनासाठी उसळलेला जनसागर हा कोणत्याही सरकारी आदेशाचा परिणाम नव्हता. तो होता जनतेच्या मनातून उसळलेला आक्रोश. ग्रामीण महाराष्ट्राचा हा डॅशिंग, तडफदार आणि थेट बोलणारा नेता किती खोलवर रुजला होता, हे त्या अश्रूंनीच सांगितलं. दादा लोकप्रिय नव्हते, दादा लोकांच्या आयुष्याचा भाग होते.
ते हजरजबाबी होते, पण जखम देणारे नव्हते. कडवे होते, पण क्रूर नव्हते. सत्ता त्यांच्या हाती आली, पण अहंकार कधीच आला नाही. मिळालेल्या प्रत्येक संधीचा त्यांनी स्वतःसाठी नव्हे, तर जनतेसाठी वापर केला. दादांचा पहिला पहाटचा शपथविधी जसा अविश्वसनीय वाटला होता, तसाच आज त्यांचा अंतही अविश्वसनीय वाटतो. दोन्ही वेळा महाराष्ट्राने डोळे चोळून पाहिले—हे खरंच घडतंय का?
दादांसाठी न रडलेला माणूस शोधावा लागेल. सामान्य माणसाच्या काळजाला जर इतका चटका बसतोय, तर त्यांच्या कुटुंबाच्या वेदनांना शब्द अपुरे पडतात. गेली तीन दशके दादांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ते फटकळ होते, कारण ते खरे होते. ते प्रेमळ होते, कारण त्यांचं मन मोठं होतं.
“राजकारण लय बेकार असतं राव,” असं म्हणत त्यांनी राजकारणाच्या पोकळपणावर बोट ठेवलं. पण स्वतः मात्र माणुसकीचा कणा कधी वाकवला नाही. तरुणांना व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला देणारे, शिक्षणावर भर देणारे दादा जात–पात, धर्म आणि द्वेषाच्या पलीकडे उभे राहिले. “तुम्हीच मला निवडून दिलंत; मी इथे फक्त बटण दाबायला आलो नाही,” हे वाक्य आज त्यांच्या संपूर्ण राजकारणाचं सार सांगतं.
दादांचं आजोळ—देवळाली प्रवरा. मातीशी नातं जपलेलं गाव. बालपणी मित्रांसोबत खेळताना, त्यांच्या घरात हक्काने भाजी-भाकरी खाताना दादांना कधीच कमीपणा वाटला नाही. हीच माती त्यांना माणूस बनवत राहिली.
लहानपणी वडील आजोळी न्यायला आले, तरी दादा हट्टाने गोट्या खेळायला गेले. “सगळ्यांना हरवूनच येणार,” म्हणत त्यांनी डाव जिंकला. बनियनच्या पोटात गोट्या घेऊन घरी परतलेला तो मुलगा पुढे महाराष्ट्र जिंकत गेला. पण २८ जानेवारीचा हा डाव मात्र वेगळा ठरला. हा डाव दादांनी हरला नाही—नियतीने जिंकून नेला. आणि आम्हा सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी सोडून गेला.
काही दिवसांपूर्वी वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराच्या वेळी दादांनी माझ्या पाठीवर हात ठेवत म्हटलं, “हे माझ्या आजोळचे आहेत.” एका वाक्यात माणूस आपला करून टाकण्याची हीच दादांची ताकद होती. म्हणूनच आज दादांसाठी अख्खा महाराष्ट्र रडतो आहे.
दादा, हा डाव तुम्ही अधुरा सोडून गेलात. जिंकायचा होता. जन्माला आलेला जाणारच असतो, पण तुम्ही शेवटपर्यंत रुबाबात जगलात. वेळेचे पक्के असलेले दादा, त्या हातातील घड्याळाने अपघातानंतर तुमची ओळख पटवली; पण त्या दिवशीची वेळ तुमच्या बाजूने नव्हती.
सहा वेळा उपमुख्यमंत्री झालेल्या दादांच्या नावापुढील “उप” कधीतरी जाईल, ही ग्रामीण जनतेची आस होती. ती आस अपुरी राहिली. पण लक्षात ठेवा—
पद जातं, माणूस राहतो.
आणि दादा… तुम्ही माणूस म्हणून अमर झाला आहात.
Comments
Post a Comment