शहाबाज ही लोकसेवा कोण करेल यार
शहाबाजशहाबाज मित्रा… आता ही लोकसेवा कोण करेल यार…
निशब्द घाडगे न्यूज @शिवाजी घाडगे
काही व्यक्ती असतात…
ती मोठ्या पदावर नसतात, मोठी जाहिरातही करत नाहीत,
पण त्यांच्या जाण्याने संपूर्ण परिसर हळ हळतो .
राहुरी फॅक्टरी परिसरातील कामगार गाळ्यातील लोकसेवा केंद्र म्हणजे शहाबाज रफिक सय्यद. संगणकासमोर शांत बसून, कोणाचं केवायसी, कोणाचा प्रॉव्हिडंट फंड, पॅन कार्ड, बांधकाम कामगार नोंदणी, कोणाचा नोकरी अर्ज, तर कोणाच्या खात्यात बाहेरगावी पैसे पाठवायचे—अशी असंख्य कामं तो काही कामे दुसर्याकडे पाठवून पुर्ण करुन घ्यायचा आपुलकीने करत असे. तो इंजिनिअर होता, पण “काम मिळालं नाही तरी माणसांची कामं थांबू नयेत,” या भावनेने तो रोज बसायचा.
वय अवघं ३५ च्या आत…
नव्या २०२६ वर्षातला पहिलाच शनिवार मात्र त्याच्यासाठी शेवटचा ठरला.
सायंकाळी साधारण सहाच्या सुमारास, नेहमीसारखाच दुकानात असताना, अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला… आणि शहाबाज कायमचा शांत झाला.
आताही विश्वास बसत नाही.
कारण मी रोज सायंकाळी फिरून आलो की आपसूकच पावलं त्याच्या दुकानाकडे वळायची.
“काय राव… काय चाललंय?”
“प्रसाद कसा आहे?”
असं आवर्जून विचारायचा.
माझी आणि त्याचे वडील रफिक भाई यांची मैत्री होती. पण शहाबाज कधी इतका जवळचा झाला, हे कळलंच नाही. तो कधी मित्र झाला… समजले नाही
तीन वर्षांपूर्वी ते राहुरीला राहायला गेले. सुरुवातीला कामगार कॉलनीतल्या चाळीत राहत होता. चार पाच दिवसांपूर्वीच मित्रांसोबत धार्मिक यात्रेला जाऊन आला . चार महिन्यांपूर्वी त्याला मुलगा झाला. आधी एक मुलगी होती. मुलगा झाल्याच्या आनंदात त्याने पेढे दिले. आयुष्य नव्यानं उभं राहत होतं… आणि नियतीनं एका क्षणात सगळं संपवलं.
“नगर–मनमाड रोडवर कधी पुर्ण होणार राव… काही तरी लिहा चला यु टुबर व्हिडिओ बनवा टाका लई खतरनाक बोलता राव घाबरत नाही
तुम्ही आमच्या वडिलांसारखेच आहात.
घाबरत नाही, तत्वनिष्ठ पत्रकार आहात.
काहीतरी चालू करा… मी आहे ना राव.”
हे शब्द आज कानात घुमतायत.
“जिल्हा परिषदेचं ऑनलाईन टेंडर भरायचं आहे.”
स्वतःच्या भविष्याची स्वप्नं पाहत, दुसऱ्यांचं आयुष्य सोपं करणारा हा शहाबाज आज नाही.
“चला, आठ वाजले.
घरी जावं लागेल.
घाडगे साहेब, पानपुरी खायची का?
जेवायचं आहे तुम्हाला …”
शनिवारी मात्र मी सायंकाळी फिरायला गेलोच नाही. सावित्रीबाई फुले जयंतीचा कार्यक्रम होते. चारनंतर डुलकी लागली . साडेसातच्या सुमारास लहान भाऊ आला… आणि म्हणाला
“शहाबाज दुकानात पडला… हॉस्पिटलला नेलंय.”
सूर्य हॉस्पिटलमध्ये गर्दी होती.
शहाबाज तिथे पडलेला होता…
न बोलणारा…
न हलणारा…
सगळं काही थांबल्यासारखं.
डोळे भरून आले.
तरुण बाळा गेला…
खूप लवकर… खूप अचानक…
रफिक भाईंचा आक्रोश कानात घुमतो आहे
“अरे राजे… आता मी काय करू”
“आजच पाच वाजता कानडगावहून दर्शन घेऊन आलो.
दुकान पाहिलं… पण थांबलो नाही.
थांबलो असतो तर…”
कदाचित वेळ थांबली असती…
पण वेळ कुणासाठीच थांबत नाही.
शहाबाजचं पार्थिव प्रवरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदना साठी नेल आहे. त्याच्या बायकोला आजुन माहीत नाही बहीण, भाऊ पुण्यातुन निघाले
रविवारी कब्रस्तानात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पण प्रश्न तोच राहतो…
शहाबाज मित्रा…
आता ही लोकसेवा कोण करेल यार… तु आचानक असा जग सोडून कायमचा निघून गेला यावर विश्वास बसत नाही तुझा तो चार महिन्याचा छकुला....मुलगी, पत्नी, आई, वडील याच्या साठी ही नाही थांबला..
Comments
Post a Comment