स्वतःचे घर उभे करुन संसार थाटणारा "दादा" आता फक्त आठवणीत
राहुरी | घाडगे न्यूज
✍️ शिवाजी घाडगे
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात झालेले अकाली निधन म्हणजे केवळ एका नेत्याचा अंत नाही; तो लाखो कुटुंबांच्या काळजावर उमटलेला खोल घाव आहे. कणखर निर्णय, रोखठोक शब्द, मिश्किल स्वभाव आणि सर्वसामान्यांशी घट्ट नातं जपणारा हा नेता आज प्रत्यक्षात नाही… उरल्या आहेत त्या केवळ आठवणी, अश्रू आणि न संपणारी हुरहूर.
आज ‘दादा’ हे नाव घेताच डोळ्यांसमोर सत्ता, पद, राजकारण उभं राहतं. पण या सगळ्या यशाच्या झगमगाटामागे एक अतिशय साधं, कष्टकरी, मातीशी नाळ जोडलेलं आणि संवेदनशील मन दडलेलं होतं—जे आयुष्यभर आपल्या माणसांना, आपल्या गावाला आणि आपल्या मुळांना विसरलं नाही.
दादांचं बालपण देवळाली प्रवऱ्याच्या मातीत घडलं. आजोळचा तो वाडा, मामाकडची शेती-वाडी, एकत्र कुटुंबाची ऊब, पाटपाण्याखालची हिरवीगार बागायत… त्या काळात देवळाली प्रवरा हे परिसरातील समृद्ध, गजबजलेलं आणि बोलकं गाव होतं. राहुरी सहकारी साखर कारखान्याच्या वैभवामुळे गावाला एक वेगळीच ओळख मिळाली होती. ऊस फवारणीसाठी उडणारी छोटी हेलिकॉप्टर्स पाहून दादांच्या बालमनात आकाशाचं एक वेगळंच आकर्षण निर्माण झालं होतं—जणू आयुष्याला उंच भरारी घ्यायची स्वप्नं तेव्हाच आकार घेत होती.
आजूबाजूच्या गावांतील लोक बाजारहाटेसाठी देवळालीला यायचे. गावाचं नावच ओळख बनलं होतं—इतकी ती माती जिवंत होती, बोलकी होती.
दादांचं आजोळावर अपार प्रेम होतं. त्या मातीत त्यांच्या बालपणीचे हशे, अश्रू, खेळ, स्वप्नं सगळं काही पुरलेलं होतं. देवळाली प्रवऱ्याचा हा भाचा आयुष्यभर त्या मातीशी भावनिक नातं जपून राहिला.
मूडमध्ये असताना दादा एक किस्सा हमखास सांगायचे—तो त्यांच्या लग्नाचा.
हसत हसत ते म्हणायचे,
“माझं लग्न ठरलं तेव्हा मी सहकारी साखर कारखान्याचा संचालक होतो. त्या काळात डायरेक्टर पद फार मोठं वाटायचं. डायरेक्टर झालो म्हणूनच लग्न जुळलं… आणि डायरेक्टर असल्यामुळे डायरेक्ट लग्नगाठ जुळून आली!”
या हसऱ्या वाक्यांमागे त्यांचा साधेपणा आणि माणुसकी लपलेली असायची.
पण या किस्स्यामागे दादांचा एक ठाम, स्वाभिमानी निर्णय दडलेला होता.
सुनेत्रा पवार यांच्याशी लग्न करण्याआधी त्यांनी स्वतःचं घर बांधायचं ठरवलं होतं.
ते ठामपणे म्हणाले होते—
“घर बांधल्याशिवाय लग्न करायचं नाही. बायकोला पत्र्याच्या घरात आणून काय करू?”
या एका वाक्यातून त्यांच्या जबाबदारीची जाणीव, आत्मसन्मान आणि कुटुंबाविषयीचं प्रेम स्पष्ट दिसतं.
१९८० साली सिमेंटचा मोठा तुटवडा असतानाही दादांनी हार मानली नाही. निंबाळकर साहेबांकडे जाऊन त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं,
“साहेब, मी माझ्या काटेवाडीत घर बांधायला काढलं आहे.”
मिळालेल्या एक हजार पोत्यांच्या सिमेंटवर उभं राहिलेलं ते घर केवळ चार भिंती नव्हत्या—तो त्यांच्या संसाराचा, स्वप्नांचा आणि कष्टाचा मजबूत पाया होता. घर उभं राहिलं… आणि मग दादांनी लग्न केलं. हा किस्सा सांगताना त्यांच्या डोळ्यांत अभिमान तर असायचाच, पण कष्टाची झलकही असायची.
पवार कुटुंबीय आणि बारामतीकरांचं नातं रक्तापेक्षाही घट्ट आहे. ३८ वर्षांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार यांच्याकडे बारामतीची जबाबदारी सोपवली. त्या दिवसापासून दादांनी मागे वळून पाहिलं नाही. बारामतीकरांनी एकदा खासदार आणि सात वेळा आमदारकी देत त्यांच्यावर अपार प्रेम केलं.
आणि दादांनीही त्या प्रेमाचं सोनं केलं. पहाटे सहापासून लोककल्याणासाठी झटणारा हा नेता, सामान्य माणसाच्या दुःखात धावून जाणारा हा ‘दादा’, अखेरचा श्वासही बारामतीच्याच पवित्र मातीत घेऊन गेला… आणि कायमचा त्या मातीत मिसळून गेला.
आज दादा आपल्यात नाहीत…
पण त्यांच्या आठवणी, संघर्ष, कष्ट, मातीवरचं प्रेम आणि माणसांवरचा जीव—हे सगळं बारामतीच्या प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक घरात आणि प्रत्येक मनात कायमचं कोरलं गेलं आहे.
दादा गेले…
पण ‘दादा’ मनातून कधीच जाणार नाहीत.
आज दहा हून अधिक साखर कारखान्यांचे नेतृत्व करणारे दादा, संचालक झाल्यावर ज्यांचं लग्न झालं—त्या दादांच्या अकाली जाण्याने गोड साखर कडू झाली असली, तरी साखरेहून गोड असलेले ‘दादा’ आजोळाच्या, आणि महाराष्ट्राच्या मनावर कायमचं अधिराज्य गाजवत राहतील.
कारण दादा…
हे फक्त नाव नव्हतं,
ते सगळ्यांचं कौतुक आणि भूषण होतं.
Comments
Post a Comment