विचारांचे उत्तर विचारांनीच...

विचारांना उत्तर विचारांनीच…
एका मेका गच्चाडू अवघी फेकू शाई 
 रणसंग्राम।शिवाजी घाडगे 
लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. तो अधिकार कधी राजकीय मंचावरून व्यक्त होतो, तर कधी सामाजिक किंवा धार्मिक विषयांवर भाष्य करताना समोर येतो. मात्र, मतभेदांचा सामना करताना संयम, संवाद आणि विवेक या मूल्यांची जपणूक होणे तेवढेच आवश्यक असते. अलीकडे विकास लवांडे यांच्यावर झालेली शाईफेक  अथवा काळे वंगण फेकल्याची घटना  ही केवळ एका व्यक्तीवरील प्रतिक्रिया नसून समाजातील वाढत्या असहिष्णुतेचे प्रतीक मानावे लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शनिवारी ह भ प संग्राम भंडारे आणि त्यांच्या समर्थकांकडून शाईफेक करण्यात आल्याची घटना घडली. मात्र, ही केवळ शाईफेक नसून काळे वंगण अंगावर ओतल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेमुळे राजकीय आणि धार्मिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
विकास लवांडे यांनी काही दिवसांपूर्वी वारकरी संप्रदाय, काही कीर्तनकार आणि धार्मिक प्रवचनांच्या देवघेव पद्धतीबाबत भाष्य केले होते. काही महाराजांचे कथित “रेट कार्ड” जाहीर करत त्यांनी वारकरी संप्रदायात घुसखोरी झाल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेक वारकरी, कीर्तनकार आणि हिंदुत्ववादी संघटनांमध्ये नाराजी पसरली आहे.
याच पार्श्वभूमीवर हभप संग्राम भंडारे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. लवांडे यांनी आपल्या गुरुवर्यांविषयी आणि धार्मिक परंपरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने भावना दुखावल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. मात्र, मतभेद असले तरी प्रत्यक्ष शाईफेक किंवा काळे वंगण फेकणे ही लोकशाहीला धरून नसलेली कृती असल्याची प्रतिक्रिया अनेक स्तरांतून व्यक्त होत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच संग्राम भंडारे यांनी माजी मंत्री व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याविषयी कीर्तनातून भडक वक्तव्य केल्यानेही वाद निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यशैलीवर आधीपासूनच टीका होत होती.
या घटनेनंतर समाजमाध्यमांवर दोन गट स्पष्टपणे दिसून आले आहेत. काहींनी हभप संग्राम भंडारे यांच्या कृतीचे समर्थन करत “धर्म आणि संत परंपरेचा अपमान सहन केला जाणार नाही,” अशी भूमिका घेतली; तर दुसरीकडे अनेकांनी लोकशाहीत विचारांना विचारांनी उत्तर देणे अपेक्षित असून अशा प्रकारच्या हल्लेखोर कृती अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले.
विकास लवांडे मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेषतः गावोगावी होणारे हरिनाम सप्ताह, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रम यामध्ये मतभेदांचे पडसाद उमटू लागल्यास सामाजिक तणाव वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सध्या काही महाराज आणि कीर्तनकार पोलीस बंदोबस्तात फिरत असल्याचीही चर्चा आहे.
सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे धार्मिक, सामाजिक आणि राजकीय विषय अधिक वेगाने तापत असल्याचे चित्र आहे. काही जण प्रसिद्धीसाठी आक्रमक भूमिका घेत असल्याची टीकाही होत आहे. “आज सांगणारे मानधन घेतात, उद्या ऐकणारेही मानधन घेतील,” अशी उपरोधिक प्रतिक्रिया व्यक्त करत अनेकांनी सध्याच्या धार्मिक आणि सामाजिक वातावरणावर भाष्य केले आहे.
विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदाय, काही महाराज आणि धार्मिक मानधनाच्या व्यवस्थेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या असतील. त्यांच्या मतांशी असहमती असणे स्वाभाविक आहे. परंतु लोकशाहीत विचारांना उत्तर हे विचारांनीच द्यायचे असते, अपमान, हल्ले किंवा सार्वजनिक अवमान करून नव्हे. एखाद्याचे वक्तव्य चुकीचे वाटत असेल तर त्याचा निषेध सभ्य मार्गाने करता येतो. कायद्याचा मार्ग खुला असतो, सार्वजनिक चर्चेचे व्यासपीठ उपलब्ध असते. मात्र, थेट शाईफेक किंवा काळे वंगण फेकण्यासारख्या घटना समाजात चुकीचा संदेश देतात.
दुसरीकडे, धार्मिक परंपरा, संतसंस्था आणि वारकरी संप्रदाय यांविषयी बोलताना देखील जबाबदारीचे भान राखणे गरजेचे आहे. महाराष्ट्राची संतपरंपरा ही केवळ श्रद्धेचा विषय नाही, तर सामाजिक ऐक्य, समता आणि संस्कारांची मोठी परंपरा आहे. त्यामुळे कोणतेही भाष्य करताना शब्दांचे भान आणि परिणामांची जाणीव असणे आवश्यक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य अमर्याद नसते; त्यासोबत सामाजिक जबाबदारीही जोडलेली असते.
आज सोशल मीडियाच्या युगात प्रत्येक वाक्य क्षणार्धात हजारो लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे मतभेद लगेच संघर्षात बदलतात. “रिल” आणि प्रसिद्धीच्या स्पर्धेत अनेक जण वास्तव, संयम आणि सामाजिक परिणाम विसरत चालल्याचे चित्र दिसते. धार्मिक कार्यक्रम, हरिनाम सप्ताह, कीर्तन यांसारख्या आध्यात्मिक व्यासपीठांवरून समाजप्रबोधन व्हावे, समाज विभागला जाऊ नये ही अपेक्षा असते. मात्र, जर हेच मंच वाद, आरोप आणि राजकीय संघर्षाचे केंद्र बनले, तर त्याचे दूरगामी दुष्परिणाम होऊ शकतात.
आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की काही महाराजांना पोलीस बंदोबस्तात फिरावे लागत आहे. हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेसाठी चिंतेचे लक्षण म्हणावे लागेल. संतांच्या भूमीत संवाद हरवून संघर्ष वाढू लागला, तर समाजात कटुता वाढण्याचा धोका आहे.
मतभेद असतील, टीका होईल, प्रत्युत्तरही दिले जाईल; पण त्या सर्व प्रक्रियेत सभ्यता, सहिष्णुता आणि लोकशाही मूल्ये टिकून राहिली पाहिजेत. कारण विचारांचा पराभव शाईफेकीने होत नाही आणि श्रद्धेचा विजय आक्रमकतेने सिद्ध होत नाही.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर