कांदा व लसूण पिकांवर कृत्रिम तंत्रज्ञान संशोधन हवे-कुलगुरु विलास खर्चे

कांदा व लसुन या पिकांच्या संशोधनामध्ये आता कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर आवश्यक
- कुलगुरू डॉ. विलास खर्चे
राहुरी ।
महाराष्ट्रामध्ये कांदा पिकातील 40% क्षेत्र हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या कांद्याच्या फुले समर्थ या वाणाखाली असून रब्बी हंगामासाठी फुले स्वामी हा वाण प्रसारित करण्यात आला आहे. कांदा व लसूण या पिकांमधील निर्यातक्षम वाणासाठी रंग, साईज व टिकवणक्षमता यावर अधिक काम करण्याची गरज आहे. आपल्याला काटेकोरपणे खते व औषधांचा वापर करण्यासाठी कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. नानासाहेब पवार सभागृहात कांदा आणि लसूण पिकांवरील 17 व्या वार्षिक बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी  अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. याप्रसंगी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. ई. लवांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पुणे येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत असलेले राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्राचे माजी संचालक डॉ. विजय महाजन व नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी सहाय्यक महासंचालक व उद्यानविद्या विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विक्रमादित्य पांडे हे उपस्थित होते. याप्रसंगी राजगुरुनगर जि. पुणे येथील कांदा-लसूण संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राम दत्ता, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता कृषी डॉ. साताप्पा खरबडे आणि उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. बी. टी. पाटील उपस्थित होते.  
कुलगुरू डॉ. विलास खर्चे पुढे म्हणाले की कांदा पिकाच्या अधिक उत्पादनासाठी खतांचा अचूक वापर व जमिनीची सुपीकता वाढविणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ड्रोन तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कांदा पिकामध्ये खते व औषधे फवारणीचे तंत्र विकसित करावे लागेल. डॉ. के.ई. लवांडे आपल्या भाषणात म्हणाले की उत्पादन करताना प्रत्येक वाणांनुसार दर्जा, एकसारखा आकार व रंग यावर भर द्यायला हवा. निर्यातक्षम वाणांसाठी प्रोटोकॉल तयार करणे, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी यांत्रिकीकरणाचा वापर वाढविणे, साठवणुकीदरम्यान नुकसान कमी करणे यासाठी ए.आय.चा वापर या गोष्टींवर भर देणे गरजेचे आहे. कांद्याचे जास्त उत्पादन होणे हा काही गंभीर प्रश्न नाही परंतु जास्त उत्पादनाचे नियोजन करायला हवे की किती मालावर प्रक्रिया करायची, निर्यात किती करायची व पुढील हंगामासाठी बियाणे म्हणून वापर किती करायचा या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. डॉ. विजय महाजन आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की कांदा व लसूण यामध्ये संशोधन करताना निर्यातक्षम वाण तयार करणे, जमिनीच्या प्रकारानुसार शिफारशी देणे, सर्व वाणांचे कॅटलॉग तयार करणे, काटेकोर पद्धतीने खतांचे नियोजन व मशीन लर्निंगचा वापर या गोष्टी कांदा लसूण संशोधन केंद्राने प्रामुख्याने विचारात घ्याव्यात. मधमाश्यांच्या पुरेशा संख्येअभावी कांदा बीजोत्पादनावर मोठा परिणाम होत असल्याचे ते म्हणाले.
डॉ. विक्रमादित्य पांडे आपल्या भाषणात म्हणाले की बियाणे उत्पादन कार्यक्रम तसेच बियाणे संवर्धन कार्यक्रम यावर जास्त भर द्यायला हवा. बिजोत्पादनाचे व्यापारीकरण करण्यासाठी विविध कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करायला हवेत जेणेकरून कांदा बियाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होईल. डॉ. प्रशांत बोडके आपल्या स्वागतपर भाषणात म्हणाले की महात्मा फुले कृषि विद्यापीठाने आत्तापर्यंत विविध पिकांचे 320 वाण, 56 कृषि यंत्रे व अवजारे तसेच 2000 पेक्षा जास्त तंत्रज्ञान शिफारशी दिल्या आहेत. कांदा पिकाचे फुले समर्थ व फुले स्वामी वाणांचे दरवर्षी 15 टनांपेक्षा जास्त बिजोत्पादन घेतले आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. राम दत्ता यांनी प्रकल्प संचालकांचा अहवाल सादर केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकाशनांचे विमोचन करण्यात आले. राहुरी येथील भाजीपाला सुधार प्रकल्पाला भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा भारतातील उत्कृष्ट केंद्र पुरस्कार मिळाल्याबद्दल याप्रसंगी उद्यान विद्या विभाग प्रमुख डॉ. बी.टी. पाटील व त्यांचे टीमचे अभिनंदन करण्यात आले. या दोन दिवसीय बैठकीमध्ये अनुवंशीक संसाधने आणि पीक सुधारणा, पीक उत्पादन व पीक संरक्षण या विषयांवरील तांत्रिक चर्चासत्रे होणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांनी तर आभार डॉ. बी.टी. पाटील यांनी मानले. 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर