संकट दारासमोर उभे उधळपट्टी थांबणार कधी
तरंग।शिवाजी घाडगे
देश संकटाच्या उंबरठ्यावर उभा असताना आपण मात्र अजूनही दिखावा, उधळपट्टी आणि राजकारणाच्या नशेत बुडालेलो आहोत. जगात युद्ध पेटले आहे, अनेक राष्ट्रांची अर्थव्यवस्था हादरत आहे, इंधन आणि अन्नधान्याच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे; पण आपल्या समाजाला अजूनही याचे गांभीर्य कळताना दिसत नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधणाऱ्या मानसिकतेमुळे परिस्थिती आणखी धोकादायक बनत चालली आहे.
आज वेळ आहे एकात्मतेची, संयमाची आणि जबाबदारीची. पण आपण काय करत आहोत? सोशल मीडियावर वाद, राजकीय टोळ्यांची बाजू घेणे, आणि वास्तवापासून पळ काढणे. देश अडचणीत असताना नागरिक म्हणून आपली भूमिका काय, याचा विचार करण्यास कोणी तयार नाही.
भारत हा जगातील सर्वात मोठ्या ग्राहक बाजारपेठांपैकी एक देश आहे. अनेक राष्ट्रे आपल्याकडे ग्राहक म्हणून पाहतात, कारण आपण प्रचंड प्रमाणात खरेदी करतो. पण कटू सत्य असे की पेट्रोल, खाद्यतेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोने यांसारख्या अनेक गोष्टींसाठी आपण परदेशांवर अवलंबून आहोत. म्हणजे दुसऱ्या देशात युद्ध झाले, तर त्याची आग आपल्या घरच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचते. महागाई वाढते, इंधन दर भडकतात आणि सामान्य माणसाचे बजेट कोसळते.
युद्ध सुरू होताच काही देशांनी लॉकडाऊनसारखी कठोर पावले उचलली, साठेबाजी रोखली, नागरिकांना सावध केले. आपल्या देशात अजून परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही, म्हणून लोक निष्काळजी झाले आहेत. “सगळं मिळतंय ना!” या मानसिकतेत आपण जगत आहोत. पण संकट आधी सूचना देत नाही.
आज जर सरकार किंवा पंतप्रधान नागरिकांना काही काळ सोने खरेदी टाळा, अनावश्यक खर्च कमी करा असे सांगत असतील, तर त्यामागे कारण आहे. आपल्या घराघरांत सोने आहे, मंदिरांत टनांनी सोने आहे, आणि तरीही आपली हाव संपत नाही. “भारत सोन्याचा देश” हे आपण अभिमानाने सांगतो; पण देशावर संकट आले की त्यागाची तयारी मात्र दिसत नाही.
खरे तर आज पुन्हा “स्वदेशी”चा विचार व्हायला हवा. पण आपण इतके परावलंबी झालो आहोत की विदेशी वस्तूंशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाही. मुक्त अर्थव्यवस्थेच्या नावाखाली आपण गरजा नव्हे तर हव्यास वाढवला. आता त्याची किंमत मोजायची वेळ आली आहे.
देश आर्थिक दबावाखाली असताना आपण कोणत्या गोष्टींवर पैसा उधळतो, याचे भान आहे का? लाखो रुपये खर्च करून धार्मिक सोहळे, बाहेरगावच्या महाराजांचे कार्यक्रम, राजकीय मेळावे, डीजे संस्कृती, वाढदिवसांचे तमाशे, स्वागताचे फलक, आणि अंधश्रद्धेच्या बाजारात भोंदू बाबांना वाहिल्या जाणाऱ्या पैशांचा हिशेब कोण देणार?
शिक्षण क्षेत्रातही परिस्थिती वेगळी नाही. नीटसारख्या परीक्षांच्या पेपरफुटीवर पैसे खर्च केले जातात, डोनेशनच्या नावाखाली लाखो रुपये उकळले जातात, आणि मग त्याच समाजाला प्रामाणिकपणाचे धडे दिले जातात. हा दांभिकपणा नाही तर काय?
दारू महाग झाली की काही जण रडतात; पण इंधन, गॅस, अन्नधान्य महाग झाले तरी त्यांना काही फरक पडत नाही. कारण समाजाने “व्यसन” आणि “गरज” यातील सीमाच पुसून टाकली आहे. उद्या एखादा तथाकथित विचारवंत उठून “ज्याच्याकडे पैसा आहे त्याने पिऊन टाकावे” असे सांगेल आणि लोक टाळ्या वाजवतील. कारण आता समाजाला विचार नको, करमणूक हवी आहे.
सगळेच लोकांना ज्ञान देतात; पण स्वतःच्या सुखसुविधा कमी करण्याची तयारी कोणाची? जनतेच्या पैशातून थाटमाट, सत्तेचा दिखावा, सरकारी पैशांची उधळपट्टी आणि कायमस्वरूपी ऐषआराम हे जर थांबले नाही, तर उद्याचा असंतोष भयंकर असेल.
आज मोटारसायकलवर फिरणारा सामान्य माणूस उद्या पेट्रोलच्या किमतीमुळे घरात बसण्याची वेळ येऊ शकते. आज उधळपट्टी करणारे लोक उद्या जीवनावश्यक वस्तूंसाठी रांगेत उभे राहू शकतात. आणि त्या दिवशी भाषणं, राजकारण आणि दिखाऊ देशभक्ती काहीही उपयोगाची ठरणार नाही.
देशाला आज भक्त नव्हे, जबाबदार नागरिकांची गरज आहे. संकटाच्या काळात संयम हा देशभक्तीचा सर्वात मोठा पुरावा असतो.
Comments
Post a Comment