उघड्यावर संसार रणरणत्या उन्हात वाट सरेना

उघड्यावर थाटलेला संसार 
रणरणत्या उन्हात ....
 बिकटवाट ।शिवाजी घाडगे 
 माता-माऊलींची अंत:करण हेलावून टाकणारी वाटचाल
आभाळातून आग बरसत आहे…
संध्याकाळचा सूर्यही जणू अंगावर निखारे फेकत आहे. तापमानाने ४३ अंशांचा टप्पा पार केला आहे. रस्त्यावरच्या डांबरालाही चटके बसत आहेत. माणूस दोन पावले चालला तरी जीव घाबरून जातो. अशा जीवघेण्या उन्हातही काही जीव मात्र थांबत नाहीत… कारण त्यांना थांबण्याची परवानगीच नसते!
गुरुवारी असेच काळजाला चिरून जाणारे दृश्य पाहायला मिळाले. दोन धनगर माता-माऊली… अंगावर उन्हाचा तडाखा, पायाखाली तापलेली जमीन आणि डोक्यावर संपूर्ण संसार! कुणाच्या शिंगरावर उघड्या प्रपंचाचा बाडाबिस्तरा बांधलेला, तर कुणाच्या घोड्याच्या पाठीवर संसाराचे गाठोडे लटकलेले… मागे लेकरांची ओढ, पुढे मेंढ्यांचा कळप आणि मधोमध जगण्यासाठी सुरू असलेली अंतहीन फरफट!
मेंढ्यांचे खांड घेऊन कुंकवाचा धनी, दिर आणि घरातील पुरुष मंडळी चराईच्या शोधात पुढे निघून गेली आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत या माता-माऊली चालत आहेत… ना डोक्यावर छप्पर, ना विसाव्यासाठी झाडाची सावली, ना थंड पाण्याचा घोट! फक्त जगण्याची जबाबदारी आणि नियतीने कपाळावर कोरलेली भटकंती!
या भगिनींच्या चेहऱ्यावर थकवा आहे, अंगावर घामाच्या धारा आहेत, पाय धुळीने माखलेले आहेत… पण डोळ्यांत मात्र जगण्याची हट्टी जिद्द दिसते. कारण त्यांना रडून थांबायचं नसतं… त्यांना चालत राहायचं असतं!
धनगर समाजाचं हे भटकं जीवन म्हणजे संघर्षाचं विद्यापीठच!
आज इथे… उद्या तिथे…
पावसाच्या शोधात, चाऱ्याच्या शोधात, जनावरांच्या पोटासाठी सुरू असलेली आयुष्यभराची वणवण!
त्यांच्या जगण्याचं वास्तव सांगणाऱ्या या ओळी आजही मनाला जखम करून जातात —
“दगडधोंडा उशाला… भाकरकोंडा पोटाला…
आज इथं, उद्या तिथं… संसार हा मांडला…!”
या ओळी फक्त कविता नाहीत… ती हजारो धनगर कुटुंबांची रक्ताने लिहिलेली जीवनकहाणी आहे!
आपण एसीच्या थंडीत उन्हाची चर्चा करतो… पण या माता-माऊली मात्र उघड्या आभाळाखाली आपल्या लेकरांसह जीवन जगत असतात. त्यांच्या आयुष्यात ‘सुट्टी’ नसते, ‘विश्रांती’ नसते… असते फक्त जगण्यासाठीची धडपड!
काळीज पिळवटून टाकणारी गोष्ट म्हणजे, या कष्टांनंतरही त्यांच्या चेहऱ्यावर नियतीविरोधात तक्रार नाही… फक्त मुक्या जनावरांसाठी आणि आपल्या संसारासाठी जिवाचं रान करणारी माणुसकी दिसते.
त्यांच्या पायाखाली जळणारी जमीन पाहिली की वाटतं…
खरंच, काही संसार घरात नसतातच…
ते उघड्या आभाळाखाली, उन्हात, वाऱ्यात आणि अश्रूंमध्येच थाटलेले असतात…!
आणि मग शब्द हरवून जातात…
उरतात फक्त डोळ्यांत दाटून आलेले अश्रू… आणि मनात सलणारा एकच प्रश्न —
या जगण्याला तरी आपण नेमकं काय नाव द्यायचं…?

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर