श्रध्देच्या आड उभे केले भोगू कॅप्टन अशोक खरात ने साम्राज्य
श्रध्देचा बाजार।शिवाजी घाडगे
सध्या नाशिकमध्ये स्वयंघोषित ‘भोगू बाबा’ उर्फ कॅप्टन अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. सुरुवातीला साधा जमीन व्यवहार करणारा एजंट म्हणून ओळख असलेला अशोक खरात, पुढे ज्योतिष आणि तथाकथित अध्यात्माच्या आडून मोठे साम्राज्य उभे करत गेला, ही बाब समाजासाठी चिंतेची ठरली आहे.
कॅनडा कॉर्नर परिसरातील एका छोट्याशा 10×12 च्या खोलीतून त्याच्या ‘कारकिर्दी’ची सुरुवात झाली. सुरुवातीला तो जमीन खरेदी-विक्रीत मध्यस्थी करत होता. मात्र, पुढे त्याने ज्योतिष आणि भविष्यकथनाचा आधार घेत संबंधित व्यक्तींना ‘होरे’ सांगत जमीन व्यवहारात हस्तक्षेप करायला सुरुवात केली. हळूहळू त्याची प्रतिमा ‘ज्योतिषी’ म्हणून निर्माण झाली आणि त्यातूनच त्याला प्रसिद्धी मिळू लागली.
या प्रसिद्धीमुळे अनेक उच्चशिक्षित व्यक्ती, अधिकारी, राजकीय नेते आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकही त्याच्या जाळ्यात अडकले. जमीन व्यवहारासोबतच त्याने विविध ‘खडे’, अंगठ्या आणि अन्य तथाकथित उपाय विकण्याचा व्यवसाय सुरू केला. विशेष म्हणजे, या सगळ्या प्रक्रियेत महिलांना लक्ष्य करत त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचे प्रकारही समोर आले असून, काही प्रकरणांत अत्याचार झाल्याचे आरोपही पुढे आले आहेत.
इशान्येश्वर परिसरात असलेल्या विहिरीशी संबंधित काही संशयास्पद घडामोडींचाही उल्लेख होत आहे. या ठिकाणी नेमके काय घडत होते, कोणत्या प्रकारचे अंधश्रद्धेचे किंवा भानामतीचे प्रकार चालत होते, याचा सखोल तपास होणे अत्यंत गरजेचे आहे.
खरातने उभे केलेले हे प्रचंड आर्थिक साम्राज्य पाहता, त्यामागील आर्थिक स्रोत आणि व्यवहारांची चौकशी होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. शासन या संपत्तीवर कारवाई करणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. याचवेळी काही स्वयंघोषित समाजसेवक आता पुढे येत समाजाची काळजी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, ही बाबही तितकीच विचार करण्यासारखी आहे.
या प्रकरणात अशोक खरात एकटाच होता की त्यामागे आणखी कोणी सामील होते, याचा शोध घेणे अत्यावश्यक आहे. अनेक फसवणूक झालेल्या लोकांच्या मते, बनावट ‘खडे’ आणि उपाय देऊन त्याने अनेकांना आर्थिक व मानसिक फटका दिला. इतकेच नव्हे, तर तो अटकेत आला नसता तर लोकांनी त्याच्या सांगण्यावरून ‘खड्यांची घरे’सुद्धा बांधली असती, अशी उपरोधिक प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली आहे.
महिलांच्या बाबतीतही समाजाने संवेदनशीलतेने विचार करणे आवश्यक आहे. अनेक महिला स्वतःहून त्याच्याकडे गेल्या, असे वरवर दिसत असले तरी त्यांच्या अडचणी, मानसिक स्थिती आणि परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे. संकटात असलेल्या व्यक्तीला आधाराची गरज असते आणि अशा वेळी काही भोंदू लोक त्याचा गैरफायदा घेतात, हे वास्तव आहे.
विज्ञानयुगात जगताना अंधश्रद्धेपेक्षा विवेकपूर्ण श्रद्धा आवश्यक आहे. संत ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे, भगवंताला साधेपणा प्रिय आहे; मात्र आज काही तथाकथित ‘महाराजां’च्या आचरणाकडे पाहिले असता आश्चर्य वाटते. दिवसा भक्तीचा आव आणणारे आणि रात्री गैरकृत्य करणारे असे प्रकार समाजासाठी धोकादायक आहेत.
या प्रकरणातून समाजाने जागे होण्याची गरज आहे. शासनाने फक्त आवाहन करून थांबण्याऐवजी अशा भोंदू प्रवृत्तींचा कठोर बंदोबस्त करणे गरजेचे आहे. प्रत्येक गल्लीत अशा प्रकारचे फसवे ‘बाबा’ निर्माण होऊ नयेत, यासाठी ठोस कारवाई आवश्यक आहे.
तसेच, या कारवाईत खऱ्या अर्थाने समाजसेवा करणाऱ्या आणि प्रामाणिकपणे अध्यात्मिक मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींवर अन्याय होणार नाही, याचीही काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
श्रद्धा की अंधश्रद्धा?
प्रकरणातून समाजाने काय शिकावे
नाशिकमध्ये उघडकीस आलेले स्वयंघोषित ‘भोगू उर्फ कॅप्टन अशोक खरात प्रकरण हे केवळ एका व्यक्तीच्या कृत्यांपुरते मर्यादित नसून, संपूर्ण समाजव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. या प्रकरणातून उघड झालेली माहिती पाहता, अंधश्रद्धा, लोभ, भीती आणि मानसिक असुरक्षितता यांच्या संगमातून कसे एक भ्रामक साम्राज्य उभे राहू शकते, याचे हे जिवंत उदाहरण अंधविश्वासाचा.
जमीन व्यवहारात ‘होरे’ सांगणे, खडे-अंगठ्यांच्या माध्यमातून भविष्य बदलण्याचे आश्वासन देणे, आणि त्यातून आर्थिक साम्राज्य उभारणे हे सर्व प्रकार समाजातील असुरक्षिततेचा गैरफायदा घेणारे आहेत. विशेषतः महिलांना लक्ष्य करून त्यांच्यावर प्रभाव टाकणे आणि अत्याचाराचे आरोप समोर येणे, ही बाब अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे.
या प्रकरणात इशान्येश्वर परिसरातील संशयास्पद घडामोडी असोत किंवा मोठ्या प्रमाणावर उभे राहिलेले आर्थिक व्यवहार याचा सखोल आणि निष्पक्ष तपास होणे अत्यावश्यक आहे. खरात एकटाच होता की त्यामागे प्रभावशाली लोकांचा हात होता, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.
मात्र, या सर्व घटनांमधून एक मोठा प्रश्न पुढे येतो अशा भोंदू प्रवृत्ती वाढतात तरी कशा? याचे उत्तर समाजातच दडलेले आहे. अडचणीत सापडलेला माणूस आधार शोधतो, आणि तेथेच अशा लोकांना संधी मिळते. ‘बुडत्याला काडीचा आधार’ या मानसिकतेचा गैरफायदा घेत, हे तथाकथित बाबा लोकांच्या आयुष्याशी खेळ करतात.
आज विज्ञानयुगातही आपण अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकत असू, तर ही केवळ शोकांतिका आहे. संत परंपरेने दिलेला विवेक, साधेपणा आणि प्रामाणिक श्रद्धा आपण विसरत चाललो आहोत. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेल्या भक्तीच्या मार्गात दिखावा नव्हता, तर आजच्या काही ‘महाराजां’च्या आचरणात दांभिकता आणि विकृती स्पष्ट दिसते.
शासनाची भूमिका देखील येथे अत्यंत महत्त्वाची ठरते. केवळ आवाहन करून चालणार नाही; अशा भोंदूगिरीवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. बेकायदेशीर ‘दरबार’, फसवणूक करणारे ज्योतिषी आणि अंधश्रद्धा पसरवणाऱ्या प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस यंत्रणा उभी राहिली पाहिजे.
त्याचबरोबर, समाजानेही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. कोणत्याही चमत्काराच्या मागे धावण्यापेक्षा विवेकाने विचार करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे आणि संकटात योग्य मार्ग शोधणे—ही काळाची गरज आहे.
‘भोगू बाबा’ प्रकरण हे एका व्यक्तीच्या पतनाची कथा नसून, समाजाला दिलेला इशारा आहे. जर आजही आपण जागे झालो नाही, तर अशा ‘बाबा’ंची संख्या कमी होणार नाही—उलट वाढतच जाईल.
आता निर्णय समाजाने घ्यायचा आहे—श्रद्धेचा मार्ग निवडायचा की अंधश्रद्धेचा?
तेव्हा दिवसा अगरबत्ती व रात्री जबरदस्ती करणारा पासून सावध राहयला हवे
ऐसे कैसे झाले साधू डोळे झाकून करती पाप मला होवून दे बाप
भविष्य पहाणरे खरे असते तर
त्याच्या बायका विधवा झाल्या असत्या का?
Comments
Post a Comment