भोगू कॅप्टन अशोक खरात पोलीस कोठडीत वाढ मोबाईल डेटा तपास वेगात
श्रद्धेचा बाजार।शिवाजी घाडगे
नाशिक जिल्ह्यातील स्वयंघोषित ‘भोगू कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असून, न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.
मोबाईल मधील डेटा तपास सुरु असुन यातून बरेच काही हाती लागेल असा अशा वाद असून
महिला अत्याचार, आर्थिक फसवणूक आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालून सामाजिक वातावरण कलुषित केल्याच्या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.
विशेष तपास पथक या प्रकरणाचा अत्यंत सखोल तपास करत असून, आतापर्यंत नऊ महिलांनी पुढे येत तक्रारी नोंदवल्या आहेत. याशिवाय आर्थिक फसवणुकीचे किमान दोन गुन्हे नोंद झाले असून, इतर अनेक बाबींचा तपास सुरू आहे. पीडित महिलांची ओळख उघड होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.
तपासाचा आवाका वाढत असून, खरातशी संबंधित असलेल्या विश्वस्तांनाही चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात काही उच्चपदस्थ व्यक्ती आणि प्रतिष्ठित कुटुंबांशी संबंधित नावे पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तपास अधिक संवेदनशील बनला आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे यांनी महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर संबंधित अध्यक्षा यांना पदाचा राजीनामा द्यावा लागल्याची माहिती आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणावर भूमिका स्पष्ट करत, “महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत कोणालाही पाठीशी घालणार नाही,” असे ठामपणे सांगितले. खरातचे कृत्य हे मानवतेला काळिमा फासणारे असल्याचेही त्यांनी नमूद केले. याशिवाय,
सध्या अशोक खरात तुरुंगात असून, त्याच्याकडून विविध प्रकारची दिशाभूल करणारी वर्तनशैली दिसून येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पूर्वी त्याच्या कार्यालय आणि बंगल्याभोवती असणारी वाहनांची वर्दळ आता पूर्णपणे थांबली असून, केवळ तपासासाठी येणाऱ्या पोलीस पथकांचीच ये-जा सुरू आहे. इशान्येश्वर मंदिर परिसरही ओस पडला असून, काही दिवसांपूर्वी गजबजलेला हा परिसर आता सुनसान झाला आहे.
अवघ्या पंधरा दिवसांत परिस्थिती पूर्णतः बदलली असून, ‘कॅप्टन’चा पोशाख परिधान करून लोकांचे भविष्य सांगणारा अशोक खरात आज आरोपी म्हणून चौकशीला सामोरा जात आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते, या प्रकरणातील गुंतागुंत आणि गंभीरता लक्षात घेता, न्यायालयीन प्रक्रिया दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, वैद्यकीय कारणांवरून जामीन मिळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी चर्चा त्याच्या समर्थकांमध्ये आहे. मात्र, अनेकांच्या मनात भीती आणि संतापही दिसून येत असून, “अशा प्रकारच्या कृत्यांना आळा बसावा, यासाठी कठोर कारवाई होणे आवश्यक आहे,” अशी भावना व्यक्त होत आहे. काहींनी तर “बेल नव्हे, जेलच योग्य” अशी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे.
एकूणच, अशोक खरात प्रकरण हे केवळ गुन्हेगारी चौकशीपुरते मर्यादित न राहता सामाजिक, राजकीय आणि कायदेशीर पातळीवर मोठे परिणाम घडवणारे ठरत आहे.
अंधश्रद्धेच्या सावटाखालील समाजाला जाग येणार का?
स्वयंघोषित ‘भोगू कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणाने राज्यातील सामाजिक वास्तव पुन्हा एकदा उघड केले आहे. विज्ञानयुगात जगत असल्याचा अभिमान बाळगणाऱ्या समाजाच्या एका मोठ्या घटकाला आजही अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवले जाऊ शकते, ही बाब चिंताजनक आहे. खरातसारख्या व्यक्तींनी ‘दैवी शक्ती’ आणि ‘भविष्यकथन’ यांच्या आडून केवळ आर्थिक फसवणूकच केली नाही, तर महिलांचे शोषण करून मानवी मूल्यांनाच तडा दिला आहे.
या प्रकरणात नऊ महिलांनी पुढे येत तक्रारी नोंदवणे, हे धाडसाचे पाऊल आहे. मात्र, ही संख्या केवळ हिमनगाचे टोक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. समाजातील भीती, दबाव आणि बदनामीच्या धास्तीमुळे अनेक पीडित महिला अजूनही गप्प राहिल्या असाव्यात. त्यामुळे तपास यंत्रणांनी केवळ नोंदवलेल्या गुन्ह्यांपुरते मर्यादित न राहता, अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे संपूर्ण जाळे उघड करणे आवश्यक आहे.
या प्रकरणाची दुसरी गंभीर बाजू म्हणजे, अशा स्वयंघोषित ‘बाबा’ किंवा ‘कॅप्टन’ यांना मिळणारे राजकीय आणि सामाजिक आश्रय. काही प्रभावशाली व्यक्ती, अधिकारी आणि प्रतिष्ठित कुटुंबांशी असलेले संबंध तपासात पुढे येत असल्याच्या चर्चांमुळे प्रश्न अधिकच गंभीर बनतो. जर सत्ताधारी यंत्रणांच्या सावलीत अशा प्रवृत्ती वाढत असतील, तर तो लोकशाहीसाठी धोक्याचा
याचबरोबर, सोशल मीडियावर व्हिडिओ क्लिप्स व्हायरल करणाऱ्या ७५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई कायद्याच्या चौकटीत योग्य असली, तरी यामुळे मूळ प्रश्न झाकला जाऊ नये. गुन्हेगाराला शिक्षा देणे हेच केंद्रस्थानी राहिले पाहिजे, अन्यथा ‘दोषी सुटतो आणि संदेश देणारा अडकतो’ अशी भावना समाजात निर्माण होण्याचा धोका आहे.
अशोक खरातच्या अटकेनंतर त्याच्या कार्यालय आणि इशान्येश्वर मंदिर परिसरातील अचानक आलेली शांतता, ही समाजातील अंधश्रद्धेची पोकळी दाखवणारी आहे. कालपर्यंत जिथे गर्दी उसळत होती, तिथे आज ओसाडपणा दिसतो. हा बदल केवळ एका व्यक्तीच्या अटकेमुळे झाला असेल, तर प्रश्न असा उरतो—आपण व्यक्तींवर विश्वास ठेवतो की तत्त्वांवर?
या संपूर्ण प्रकरणातून समाजाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी मानसिकता बदलली नाही, तर अशोक खरात जाईल, पण त्याच्या जागी दुसरा ‘भोगू कॅप्टन’ निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक जागृती यावरच या समस्येचे दीर्घकालीन उत्तर अवलंबून आहे.
शेवटी, या प्रकरणात केवळ आरोपीला शिक्षा होणे पुरेसे नाही, तर अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी ठोस यंत्रणा उभी राहणे आवश्यक आहे. अन्यथा, “बेल नव्हे, जेलच योग्य” ही भावना व्यक्त करणारा समाज, उद्या पुन्हा त्याच चक्रात अडकलेला दिसेल.
Comments
Post a Comment