भोगू अशोक खरात आज काय व्हिडिओ?
श्रध्देचा बाजार।शिवाजी घाडगे
अंधश्रद्धेच्या सावटाखालील भीषण वास्तव
नाशिक जिल्ह्यातील स्वयंघोषित ‘भोगू बाबा’ उर्फ कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. गेल्या काही दिवसाहपासून सोशल मीडियावर समोर येणाऱ्या कथित व्हिडिओ क्लिप्समुळे या प्रकरणाने अधिकच गंभीर वळण घेतले असून, समाजमनात अस्वस्थता आणि रोष दोन्ही तीव्र होताना दिसत आहेत. आता प्रश्न फक्त “आणखी व्हिडिओ येणार का?” इतकाच राहिलेला नाही, तर “अशा घटना इतक्या वर्षे दडपून कशा राहिल्या?” हा अधिक महत्त्वाचा प्रश्न समोर उभा ठाकला आहे.
देश-विदेशात तणावपूर्ण परिस्थिती असताना, समाजाच्या अंतर्गत विघटनाचे असे प्रकार अधिक धक्कादायक ठरतात. विशेषतः महिलांवरील कथित अत्याचारांच्या आरोपांनी या प्रकरणाचे गांभीर्य अनेक पटींनी वाढवले आहे. गर्भवती महिलेसोबत अमानुष वर्तन झाल्याच्या आरोपांमुळे समाजमन सुन्न झाले आहे. शासनपातळीवरही या प्रकरणाची दखल घेतली गेली असली, तरी जनतेच्या मनातील संताप आणि असुरक्षिततेची भावना अद्याप कमी झालेली नाही.
दररोज समोर येणाऱ्या नव्या माहितीमुळे या प्रकरणाभोवती गूढतेचे वलय अधिक गडद होत आहे. कथित ‘भक्ती’च्या आड सुरू असलेल्या गैरकृत्यांमध्ये काही प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असल्याच्या चर्चांनी या प्रकरणाला आणखी वेगळी दिशा दिली आहे. जर या चर्चांमध्ये तथ्य असेल, तर हे केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित प्रकरण नसून, एक व्यापक सामाजिक व प्रशासकीय अपयश ठरते.
अंकशास्त्र, श्रद्धा आणि अध्यात्म यांच्या नावाखाली लोकांचा विश्वास संपादन करून त्याचा गैरवापर केल्याचे आरोप या प्रकरणात केंद्रस्थानी आहेत. ‘अंगशास्त्र’च्या नावाखाली विकृत कृत्ये घडत असल्याचे समोर येत असल्याने अंधश्रद्धेचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. विशेष तपास पथकाकडे या प्रकरणाची जबाबदारी सोपवण्यात आली असली, तरी या तपासातून नेमके काय निष्पन्न होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
आतापर्यंत अनेक पीडित महिलांनी पुढे येऊन तक्रारी दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. ‘नरबळी’सारख्या गंभीर आरोपांचीही चौकशी सुरू आहे. जर हे आरोप सिद्ध झाले, तर हा प्रकार केवळ गुन्हा नसून मानवतेलाच काळिमा फासणारा ठरेल. त्याचबरोबर, संबंधितांच्या मालमत्तेवर कारवाई होईल का, तसेच या जाळ्यातील इतर घटक उघडकीस येतील का, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
गेल्या दोन दशकांपासून शेकडो लोक दररोज त्याच्याकडे येत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. या पार्श्वभूमीवर लाखो लोक या जाळ्यात अडकले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामध्ये शासनाच्या पातळीवर झालेल्या दुर्लक्षाची किंवा अनावधानाने मिळालेल्या पाठबळाचीही चौकशी होणे आवश्यक आहे.
या सर्व घटनाक्रमातून एक मूलभूत प्रश्न पुन्हा समोर येतो—समाजात अशा भामट्यांना एवढी मोठी जागा का आणि कशी मिळते? श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा पुसट होत चालली आहे का? शिक्षण, जागरूकता आणि कायद्याची भीती असूनही लोक अशा जाळ्यात का अडकतात?
“वृक्ष तेथे छाया आणि बुवा तेथे बाया” ही म्हण या प्रकरणातून पुन्हा अधोरेखित होताना दिसते. मात्र, ही केवळ म्हण न राहता एक कटू वास्तव बनले आहे. अशोक खरातसारख्या व्यक्तींच्या कृत्यांना कोणतेही समर्थन असू शकत नाही. उलट, अशा प्रवृत्तींचा ठामपणे निषेध करून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई होणे हीच काळाची गरज आहे.
समाजाने आता केवळ प्रेक्षक बनून न राहता सजग नागरिक म्हणून पुढे येणे आवश्यक आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या प्रवृत्तींपासून दूर राहणे, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे—यातूनच अशा घटनांना आळा घालता येईल. अन्यथा, अशा “भोगू” संस्कृतीचे सावट समाजावर अधिक गडद होत राहील.
Comments
Post a Comment