रेल्वे उड्डाण पुलासाठी भूसंपादनाचे पैसे देण्या साठी लाचेची मागणी श्रीगोदा-पारनेर प्रात कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
घाडगेन्यूज| प्रतिनिधी
रेल्वे उड्डाणपुलासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या भरपाईची रक्कम खात्यात वर्ग करण्यासाठी तब्बल 1 लाख 20 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी श्रीगोदा-पारनेर उपविभागीय कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मंगेश विजय ढुमणे (महसूल सहाय्यक) आणि अमोल काशिनाथ खामकर (कंत्राटी कामगार) यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे महसूल विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा तालुक्यातील जंगलेवाडी येथील एका शेतकऱ्याची गट क्रमांक 13 मधील 143 गुंठे जमीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548-डी अंतर्गत रेल्वे उड्डाणपूल उभारणीसाठी शासनाने भूसंपादन केली होती. या भूसंपादनाच्या बदल्यात संबंधित शेतकऱ्यास 1 कोटी 47 लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली होती.
भरपाईची रक्कम आपल्या खात्यावर वर्ग व्हावी यासाठी संबंधित शेतकरी प्रांत कार्यालयात पाठपुरावा करत होता. त्यावेळी महसूल सहाय्यक मंगेश ढुमणे व कंत्राटी कर्मचारी अमोल खामकर यांनी भरपाईची रक्कम खात्यात जमा करण्यासाठी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील, असे सांगत 1 लाख 20 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. यासंदर्भात व्हॉट्सअॅप कॉलद्वारेही मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारदाराने याबाबत अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक छाया देवरे यांनी पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून संबंधितांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सुरू असून या प्रकरणातील अन्य संबंधितांचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची भरपाई मिळवून देण्याऐवजी लाचेची मागणी झाल्याच्या आरोपामुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Comments
Post a Comment