जंतर-मंतरवर तरुणाईचा हुंकार

जंतर-मंतरवर पुन्हा तरुणाईचा हुंकार?
  तरंग।शिवाजी घाडगे 
देशाच्या राजकारणात अनेक आंदोलने झाली, अनेक नेते आले-गेले; पण जेव्हा तरुणाई रस्त्यावर उतरते, तेव्हा सत्ताधाऱ्यांना त्याची दखल घ्यावीच लागते. सध्या नीट  परीक्षा, विद्यार्थ्यांचे भविष्य, वाढता मानसिक ताण आणि आत्महत्यांच्या घटनांमुळे देशातील युवकांमध्ये अस्वस्थता वाढलेली दिसत आहे. या पार्श्वभूमीवर काॅकोरज पार्टीचे अभिजीत दीपके यांनी जंतर-मंतरवरून केंद्र सरकारविरोधात उघडलेला मोर्चा चर्चेचा विषय ठरला आहे.
अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर अभिजीत दीपके यांनी थेट विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना हात घालत शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर आवाज उठविला. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर तरुणांचा पाठिंबा मिळाल्याचा दावा केला जात असला, तरी या पाठिंब्याचे प्रत्यक्ष आंदोलनात किती रूपांतर होते, हा खरा प्रश्न आहे. कारण सोशल मीडियावरील लोकप्रियता आणि जनआंदोलनातील ताकद यामध्ये मोठा फरक असतो.
आज देशातील लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. गावाकडील पालक कर्ज काढून मुलांना शहरात शिकवतात. मुलांच्या यशस्वी भवितव्याची स्वप्ने पाहतात. मात्र परीक्षा व्यवस्थेतील गोंधळ, निकालांबाबतचे वाद, वाढती स्पर्धा आणि मानसिक तणाव यामुळे अनेक कुटुंबांचे आयुष्य हादरून जाते. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटना ही केवळ आकडेवारी नसून ती व्यवस्थेला विचार करायला भाग पाडणारी शोकांतिका आहे.
अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारणे चुकीचे नाही. लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र आंदोलन करताना भावनिक वातावरण निर्माण करण्यापेक्षा ठोस उपाययोजना आणि धोरणात्मक मागण्या पुढे येणे अधिक महत्त्वाचे असते. अन्यथा आंदोलन केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांपुरते मर्यादित राहते.
अभिजीत दीपके यांनी हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक आणि तिरंगा घेऊन दिलेला संदेश प्रतीकात्मक असला, तरी त्यामागील आशय महत्त्वाचा आहे. जात, धर्म आणि ध्रुवीकरणाच्या राजकारणापेक्षा शिक्षण, रोजगार आणि तरुणांच्या भवितव्यावर चर्चा व्हावी, ही अपेक्षा देशातील युवकांचीही आहे.
आता १३ जून रोजी जंतर-मंतरवर काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे आंदोलन तरुणांच्या प्रश्नांना राष्ट्रीय व्यासपीठ देणार की आणखी एका राजकीय संघर्षाचे रूप धारण करणार, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र एक गोष्ट निश्चित आहे—देशातील तरुणाई आता केवळ प्रेक्षक राहण्याच्या मनःस्थितीत नाही. तिच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर उत्तरांची अपेक्षा आहे आणि ती उत्तरं मिळाली नाहीत, तर जंतर-मंतरवरील हा आवाज आणखी बुलंद होऊ शकतो.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन