परित्यक्तया महिलांनी बनविलेल्या वस्तू विक्री प्रदर्शन
परितक्तया महिलांनी बनवलेल्या
टीम @घाडगे न्यूज
परितक्त्या महिलांना सामाजिक, आर्थिक व आरोग्यविषयक अनेक समस्या भेडसावत असून, या महिलांना त्यांच्या पायावर उभे करून समाजात ताठ मानेने जगण्यासाठी सर्वंकष व एकत्रित प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र सदन, नवी दिल्लीच्या निवासी आयुक्त आर. विमला यांनी केले.
आम्रपाली गार्डन येथे महिलांच्या सामर्थ्याला व स्वावलंबनाला नवी दिशा देणाऱ्या दोन दिवसीय ‘सक्षम प्रदर्शन व विक्री’ उपक्रमाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, राहुल शेळके, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी आशिष नवले, पत्रकार सुधीर लंके, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, विनायक देशमुख, नितेश बनसोडे, योगिता सत्रे, प्रवीण कदम, 'उमेद'चे जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप आदी उपस्थित होते.
आर. विमला यांनी आपल्या भाषणात परितक्त्या महिलांना भेडसावणाऱ्या प्रश्नांचा वेध घेतला. “परित्याग झाल्यानंतर महिलांना उपजीविकेचे साधन नसते. समाजाकडून त्यांना दुय्यम वागणूक मिळते. आरोग्य सेवा व मानसिक आधार मिळत नाही. अशा वेळी समाजानेच त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. या महिलांना दान नको, तर संधी व सन्मान हवा आहे. त्यांना सर्वांनी मिळून आधार दिल्यास त्या नक्कीच ताठ मानेने जगू शकतात, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महिलांनी उत्पादित केलेल्या मालाची पॅकिंग, ब्रँडिंग तसेच त्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठीही काम करण्याची आवश्यकता आहे. अहिल्यानगरमध्ये आयोजित या दोन दिवसीय प्रदर्शनातून महिलांच्या सामर्थ्याला व स्वावलंबनाला नवी दिशा मिळेल. तसेच यासारख्या कार्यक्रमातून परितक्त्या महिलांचा असलेला ज्वलंत प्रश्न सर्वदूर पोहोचेल, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
परितक्त्या महिलांना शासनाच्या विविध योजनांमध्ये समाविष्ट करून घेत त्यांना लाभ देण्यासाठी कागदपत्रांची मोठी अडचण येते. प्रशासनाने यामध्ये पुढाकार घेत त्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी म्हणाले, एकल महिलांचा सर्व्हे करणारा आपला जिल्हा हा राज्यातील पहिला जिल्हा असून विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने एकल महिलांचा सर्व्हे करत १ लाख २० हजार महिलांची संख्या नोंदविण्यात आली आहे. एकल महिलांना समाजात अभिमानाने व स्वाभिमानाने जगता यावे, तसेच त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात. यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. महिलांची उपजीविका जितकी महत्त्वाची आहे तितकेच त्यांचे आरोग्य देखील महत्त्वाचे आहे. आरोग्य चांगले असेल तरच त्या आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतील. महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे हीसुद्धा आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. प्रशासन त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करेल, असेही त्यांनी सांगितले.
एकल महिला समाजात सन्मानाने उभ्या राहतील, हे आपण सर्वांनी मिळून सुनिश्चित करायचे असून यासाठी प्रशासन नेहमी आपल्या सोबत असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
समाजातील बदलाची गरज
या कार्यक्रमातून महिलांच्या सक्षमीकरणाला चालना मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. “स्वावलंबी महिला म्हणजे सक्षम समाज. महिलांचे सामर्थ्य ओळखून त्यांना योग्य दिशा देणे आपले कर्तव्य आहे,” असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
उत्पादनांच्या स्टॉलला मान्यवरांनी भेट देऊन पाहणी
"प्रदर्शनात महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांच्या स्टॉलला मान्यवरांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रसंगी महिलांनी आपल्या हस्तकलेतून, कष्टातून आणि कल्पकतेतून साकारलेली उत्पादने प्रदर्शित केली होती. मालाची निर्मिती स्थानिक स्तरावर उपलब्ध संसाधनांचा वापर करून, पारंपरिक पद्धतींना आधुनिकतेची जोड देत करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment