हा खाऊसाहेब तिकडे गेलाय बट्याबोळ
घाडगे न्यूज | प्रतिनिधी | शिर्डी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी येथे सोमवारी झालेल्या जाहीर सभेत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दांत टीका करताना त्यांचा उल्लेख "खाऊसाहेब" असा केला. सहा खासदारांनी पक्ष सोडल्यानंतर शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आणि संघटनात्मक बळकटीसाठी सुरू केलेल्या राज्यव्यापी दौऱ्यादरम्यान ठाकरे यांनी बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटण्याचे काम पक्षांतर्गतच सुरू आहे. महिलांच्या आरक्षणाच्या आणि सक्षमीकरणाच्या घोषणा केल्या जात असल्या तरी राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटना सातत्याने वाढत आहेत. गृहमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळूनही अशा घटना रोखण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला.
केंद्रातील राजकारणावर भाष्य करताना ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाचे स्थान मिळू नये यासाठी काहीजण खासदार फोडण्याचे काम करत आहेत. मात्र कितीही गद्दार पक्ष सोडून गेले तरी त्यांना निवडून आणणारा निष्ठावान शिवसैनिक आजही शिवसेनेसोबत खंबीरपणे उभा आहे. हाच शिवसैनिक आगामी निवडणुकांमध्ये गद्दारांना धडा शिकवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर टीका करताना ठाकरे म्हणाले, "बंडखोर खासदार म्हणतात की आम्ही उद्धव ठाकरेंबद्दल काही बोलणार नाही. पण ते बोलणार तरी काय? जनता त्यांना जोड्याने उत्तर देईल. काहीजण मला देवमाणूस म्हणतात. मग साईबाबांच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घेण्याऐवजी तुमचे लक्ष फक्त नैवेद्याकडेच होते का? हा 'खाऊसाहेब' फक्त नैवेद्य खाण्यासाठी आला होता. जनतेच्या प्रश्नांशी त्याचा कधीच संबंध नव्हता."
२०१४ आणि २०२४ च्या राजकीय घडामोडींचा संदर्भ देताना त्यांनी आत्मपरीक्षणही केले. "चूक माझीच होती. या लोकांची खरी वृत्ती मला आधी समजली नाही. खासदार गेला, त्याला पक्षात आणणारा देखील गेला; मात्र स्वतःच्या घामाने आणि पैशाने त्यांना निवडून देणारा सामान्य शिवसैनिक आणि शेतकरी आजही आमच्यासोबत उभा आहे," असे ते म्हणाले.
निधी मिळत नसल्यामुळे विकासकामे होत नसल्याचा दावा करणाऱ्यांवरही ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वाकचौरे यांना १५ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता, मात्र त्यापैकी केवळ ७६ लाख रुपये खर्च झाले. मंजूर १३५ कामांपैकी फक्त दोन कामे पूर्ण झाली. त्यामुळे निधी न मिळाल्याचा दावा दिशाभूल करणारा असल्याचा आरोप त्यांनी केला.
"ते गेले ते चांगलेच झाले," असे म्हणत ठाकरे यांनी उपरोधिक टोला लगावला. "मागील वेळी ते पक्ष सोडून गेले तेव्हा आपले सरकार आले होते. आताही तसाच शुभसंकेत मिळत आहे," असे ते म्हणाले.
देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना ठाकरे यांनी आरोप केला की, केवळ शिवसेनाच नव्हे तर इतर अनेक पक्ष फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामागे लोकशाही कमकुवत करून हुकूमशाहीची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, "जो या देशाला मानतो तो आमचा आहे, हेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व होते. हृदयात राम, हाताला काम आणि शेतमालाला दाम हे आमचे हिंदुत्व आहे. आम्ही घरे पेटवणारे नाही, तर घरातील चूल पेटती ठेवणारे आहोत."
भारतीय जनता पक्षावर निशाणा साधताना त्यांनी म्हटले की, भाजपसाठी आयुष्यभर राबणारे कार्यकर्ते आज नव्याने आलेल्या नेत्यांच्या चटया-सतरंज्या उचलण्याचे काम करत आहेत. त्यामुळे पुनर्बांधणीची गरज शिवसेनेला नसून भाजपलाच असल्याचा टोला त्यांनी लगावला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही त्यांनी प्रश्न विचारला. "संघाला मान्य असणारा पंतप्रधान भाजपमधील काही नेत्यांना नको आहे का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
देशातील शिक्षण व्यवस्थेवर टीका करताना ठाकरे म्हणाले की, नीट आणि टीईटीसारख्या परीक्षा पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. "पेपर फुटत नाही, विद्यार्थ्यांचे नशीब फुटत आहे," अशी टीका त्यांनी केली.
शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सत्ताधारी पक्ष आमदार-खासदार फोडण्यात व्यस्त असल्याचा आरोप करताना त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "आज शेतकरी संकटात आहे, विद्यार्थी त्रस्त आहेत आणि सामान्य माणूस अडचणीत आहे. एवढा अन्याय डोळ्यांसमोर होत असताना तुमच्या मनातील संतापाला वाचा का फुटत नाही?" असा सवाल उपस्थित करत त्यांनी उपस्थितांना भावनिक आवाहन केले.
सभेला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव अनिल देसाई, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अनेक नेत्यांची भाषणे झाली.
दरम्यान, शिर्डी दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी साईबाबा मंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले व आशीर्वाद घेतले.
Comments
Post a Comment