मुस्लिम समाजातील सहारा मंगल कार्यालयात महंत रामगिरी दिंडीचा मुक्काम
तरंग । शिवाजी घाडगे
आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या महंत रामगिरी महाराज यांच्या दिंडीचा शनिवारी रात्री देवळाली प्रवरा येथील 'सहारा' मंगल कार्यालयात मुक्काम झाला. या मुक्कामासाठी मुस्लिम समाजातील युनुस भाई यांनी आपल्या मंगल कार्यालयाची व्यवस्था उपलब्ध करून दिल्याने सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक सलोख्याचा एक सकारात्मक संदेश समाजापुढे आला.
महंत गंगागिरी महाराज यांनी अनेक वर्षांपूर्वी पंढरपूर वारीची ही दिंडी सुरू केली होती. त्यांच्या पश्चात महंत नारायणगिरी महाराज यांनी ही परंपरा अखंडपणे पुढे चालू ठेवली. सध्या महंत रामगिरी महाराज या दिंडीचे नेतृत्व संध्या करत असून, ही वारकरी परंपरा सातत्याने पुढे नेत आहेत.
काही दिवसांपूर्वी महंत रामगिरी महाराज यांनी एका धार्मिक विषयावरील केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात वाद निर्माण झाले होते. त्या वक्तव्याविरोधात विविध स्तरांतून आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस संरक्षणही उपलब्ध करून देण्यात आले आहे.
अशा पार्श्वभूमीवर देवळाली प्रवरा येथे मुस्लिम समाजातील युनुस भाई यांनी आपल्या 'सहारा' मंगल कार्यालयात दिंडीच्या मुक्कामाची व्यवस्था करून दिली. या कृतीमुळे सामाजिक ऐक्य, परस्पर सन्मान आणि धार्मिक सौहार्द यांचे उदाहरण पाहायला मिळाले.
कोरोना काळात देखील अनेक कोरोना संसर्ग रुग्णांना सहाराने सहारा दिला होता हे विशेष
अनेक वारकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत, समाजात अशाच प्रकारचा परस्पर विश्वास आणि सहकार्य कायम राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
वारकरी संप्रदायाची शिकवण ही जात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन मानवतेचा संदेश देणारी आहे. पंढरीचा विठ्ठल सर्वांचा आहे, ही भावना या प्रसंगातून अधिक अधोरेखित झाली. धार्मिक आणि सामाजिक मतभेदांपेक्षा परस्पर आदर, प्रेम आणि सहकार्य यांनाच अधिक महत्त्व दिले गेले पाहिजे, असा संदेश या मुक्कामातून मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
'सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्तान हमारा' ही भावना केवळ घोषणांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरली, तरच सामाजिक सलोखा अधिक बळकट होईल. देवळाली प्रवरा येथील हा प्रसंग सर्वधर्मसमभाव, बंधुता आणि भारतीय संस्कृतीतील एकात्मतेचे प्रतीक म्हणून पाहिला जात आहे.
भारतीय संस्कृतीतील "माणुसकी" जिवंत असल्याची साक्ष आहे.
आज समाजात द्वेषाचे राजकारण अधिक वेगाने पसरते. सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे तणाव निर्माण होतो, अफवांमुळे समाजात दरी वाढते. पण त्याच समाजात धर्मापेक्षा माणुसकीला महत्त्व देणारी माणसेही आहेत. पापा शेख यांनी दाखविलेला मोठेपणा हा त्याचाच पुरावा आहे.
पंढरपूरची वारी ही केवळ धार्मिक यात्रा नाही. ती समता, बंधुता, सेवा आणि मानवतेचा उत्सव आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा, संत जनाबाई यांसारख्या संतांनी विठ्ठलभक्तीच्या माध्यमातून जात, धर्म आणि पंथ यांच्या पलीकडील समाजाची कल्पना मांडली. वारकरी संप्रदायाने कधीच द्वेष शिकवला नाही; त्याने प्रेम, सेवा आणि समतेचा मार्ग दाखवला.
दुर्दैवाने आज काही ठिकाणी धर्माच्या नावावर राजकारण केले जाते. समाजात भीती, संशय आणि विभाजनाची बीजे पेरली जातात. परंतु सामान्य नागरिकांच्या मनात अजूनही परस्पर विश्वास जिवंत आहे. देवळाली प्रवरा येथील हा प्रसंग त्याचेच उदाहरण आहे. कारण खरी ओळख धर्माची नसते, तर माणुसकीची असते.
या घटनेतून आणखी एक धडा मिळतो. धार्मिक मतभेद असू शकतात, विचार वेगळे असू शकतात; पण संकटात किंवा गरजेच्या वेळी एकमेकांना आधार देणे हीच भारतीय संस्कृतीची खरी ताकद आहे. संविधानाने दिलेले "बंधुता" हे मूल्य अशाच कृतींमधून जिवंत राहते.
आज समाजाला घोषणांची गरज नाही; गरज आहे कृतीची. "सर्वधर्मसमभाव" हे भाषणात नव्हे, तर वर्तनात दिसले पाहिजे. पापा शेख यांनी केलेली मदत आणि वारकऱ्यांनी त्याचा स्वीकार केला, ही दोन्ही बाजू तितकीच महत्त्वाची आहे. यात कुणाचा विजय किंवा पराभव नाही; विजय झाला तो भारतीयत्वाचा.
"सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा" ही ओळ आपण अनेकदा अभिमानाने म्हणतो. पण तिचा खरा अर्थ तेव्हाच साकारतो, जेव्हा एका धर्माचा माणूस दुसऱ्या धर्माच्या माणसाला कोणताही भेदभाव न करता आधार देतो. देवळाली प्रवरा येथील 'सहारा' मंगल कार्यालयात घडलेली ही घटना अशाच भारताचे दर्शन घडवणारी आहे.
आज प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात आणि प्रत्येक मनात असा "सहारा" निर्माण झाला, तर कोणत्याही समाजद्वेषाला या देशात स्थान उरणार नाही. कारण अखेरीस धर्म माणसाला जोडण्यासाठी असतो, तोडण्यासाठी नव्हे. आणि विठ्ठलाची वारीही हाच संदेश देत पिढ्यान् पिढ्या पुढे चालत आली आहे.
Comments
Post a Comment