खरीपपुर्व हंगाम कार्यशाळेचे आयोजन
महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग व राज्यातील सर्व कृषि विद्यापीठे यांच्यातील चांगला समन्वय महात्मा फुले कृषि विद्यापीठात शेतकरीभिमुख संशोधन सुरू आहे. या दोन दिवसीय खरीप हंगाम पूर्व कार्यशाळेमध्ये महत्त्वाच्या विविध 10 घटकांवर कृषि विभागाच्या अधिकार्यांसाठी प्रत्यक्ष कृतीद्वारे प्रशिक्षण आयोजित केल्यामुळे खर्या अर्थाने या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यापीठाचे तंत्रज्ञान निश्चितपणे शेतकर्यांच्या शेतावर पोहोचेल असे प्रतिपादन अकोला व राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.
राज्याचा कृषि विभाग व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने विभागस्तरीय दोन दिवसीय खरीप हंगाम पूर्व कार्यशाळा 2025-26 चे आयोजन महात्मा फुले कृषि विद्यापीठातील डॉ. नानासाहेब पवार सभागृहात करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. शरद गडाख बोलत होते. याप्रसंगी राज्याच्या कृषि विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी अधिकार्यांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर राज्याचे कृषि आयुक्त सुरज मांढरे, विस्तार व प्रशिक्षण संचालक रफिक नाईकवाडी, आत्मा संचालक अशोक किरनाळे, कृषि प्रक्रिया व नियोजन संचालक विनय आवटे, निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक सुनील बोरकर, कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, कुलसचिव डॉ. नितीन दानवले, विभागीय कृषि सहसंचालक, पुणे दत्तात्रय गवसाने, विभागीय कृषि सहसंचालक नाशिक सुभाष काटकर, विभागीय कृषि सहसंचालक, कोल्हापूर अजय कुलकर्णी, विभागीय कृषि सहसंचालक श्रीमती मेघना केळकर व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शरद गडाख आपल्या भाषणात पुढे म्हणाले की विद्यापीठातील प्रयोगशाळेमध्ये गुणवत्तापूर्ण जैविक खते, जैविक औषधे तयार केली जातात. ती राज्यातील शेतकर्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कृषि खात्याने सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. येणारा खरीप हंगाम चांगला होईल. पाऊसाचा अंदाजही चांगला असून शेतकर्यांचे उत्पन्न वाढेल व शेतकरी सुखी होईल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या उद्घाटन कार्यक्रमानंतर ऑनलाइन पद्धतीने राज्याचे कृषि सचिव विकासचंद्र रस्तोगी मार्गदर्शन करतांना म्हणाले की पुणे येथील बैठकीत ठरल्याप्रमाणे विद्यापीठाचे तंत्रज्ञान राज्यातील जास्तीत जास्त शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्यासाठीच्या अभियानाची सुरुवात ही राहुरी कृषि विद्यापीठापासून झाली आहे ही आनंदाची गोष्ट आहे. अशा प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन करणे ही खूप चांगली संकल्पना आहे. आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर व पोकरासारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी 71 लाख शेतकर्यांपैकी जास्तीत जास्त शेतकर्यांपर्यंत आपण पोहोचू शकतो. प्रत्येक गावात असणार्या गाव पातळीवरील ग्राम कृषि समित्या यांच्या माध्यमातून प्रात्यक्षिकांचा विस्तार अधिक परिणामकारक होऊ शकतो. कृषि विद्यापीठाने विकसीत केलेले तंत्रज्ञान या कार्यशाळेच्या माध्यमातून, कृत्रिम बुध्दीमत्ता, समाज माध्यमे, प्रिंट माध्यमे राज्यातील दहा हजार पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य शेतकरी व डिजिटल शेतीशाळेच्या माध्यमातून शेवटच्या शेतकर्यांपर्यत पोहचू शकते.
सुनील बोरकर यावेळी म्हणाले शेतकर्यांचे खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन खर्च कमी करणे व उत्पादन वाढविणे यासाठी कृति प्रात्यक्षिकाद्वारे तंत्रज्ञान प्रभाविपणे पोहचविण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यावेळी त्यांनी शेतीसाठी महत्त्वाच्या असणार्या बियाणे, किटकनाशके, खते, अवजारे याबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन केले. डॉ. विठ्ठल शिर्के यांनी या शेतकर्यांना खरिप हंगामासाठी बियाणे वेळेवर उपलब्ध होण्याबरोबरच या कार्यशाळेमध्ये प्रात्यक्षिकांचे केलेले आयोजन हे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. विनय आवटे यावेळी म्हणाले की या कार्यशाळेची संकल्पना ही फार महत्त्वाची असून राज्यातील शेतकर्यांना 24 हजार व्यक्तिगत कृषि प्रक्रिया प्रकल्प मंजूर केलेले असून यामुळे अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. डॉ. गोरक्ष ससाणे यावेळी म्हणाले की विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकर्यांच्या शेतावर नेण्यासाठी विविध विषयांवरील प्रशिक्षणाचे आयोजन या कार्यशाळेत केल्यामुळे या कार्यशाळेची उपलब्धी विशेष असणार आहे. आपण सर्वांनी जास्तीत जास्त शेतकर्यांपर्यंत पोहोचून त्यांना विद्यापीठाचे तंत्रज्ञान देण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय गवसाणे यांनी केले. या प्रसंगी मातीचा नमुना घेणे, बीज प्रक्रिया मोहीम, घरगुती चाचणी पद्धतीने बियाणे उगवण क्षमता तपासणी मोहीम, फळबाग लागवडीसाठी सी. आर. ए. तंत्रज्ञानाचा वापर, हुमणी कीड एकात्मिक व्यवस्थापन, ऊस लागवडीसाठी रोपे तयार करणे, भात पिकामध्ये युरिया ब्रिकेट्सची उपलब्धता व वापर वाढविणे, बोंड अळी एकात्मिक व्यवस्थापन, शेती शाळा घेणेबाबत व शेतावर जैविक खते तसेच बायोचार निर्मिती या विविध मुद्द्यांवर आधारित प्रत्यक्ष कृतीद्वारे प्रात्यक्षिकांचे आयोजन सभागृहाच्या बाहेर करण्यात आले आहे. या कार्यशाळेत विविध विषयांवर विद्यापीठातील शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेतील पुणे, नाशिक व कोल्हापूर या विभागातील सर्व उपविभागीय अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी तसेच मंडल कृषि अधिकारी, कृषि विज्ञान केंद्रातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीरामपूरचे तालुका कृषि अधिकारी उल्हास राक्षे यांनी तर आभार अहिल्यानगरचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराडे यांनी मानले.
Comments
Post a Comment