अन्न सुरक्षा सह कृषी संशोधन म्हत्वाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा

अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्यासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची – राज्यपाल जिष्णू देव वर्मा
 घाडगे न्यूज।राहुरी 
जगातील एका भागात घडणाऱ्या युद्ध व संघर्षांचा परिणाम आज संपूर्ण जगावर होत असल्याने प्रत्येक देशाने आपली कृषी व्यवस्था अधिक सक्षम करणे आणि अन्नसुरक्षा सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. देशाच्या अन्नसुरक्षा, आर्थिक स्थैर्य आणि शाश्वत विकासासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून भारतीय कृषीचे भविष्य तंत्रज्ञानाधारित उपाययोजना, नवउद्योग (स्टार्टअप) आणि शाश्वत शेती पद्धतींवर अवलंबून आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल व महात्मा फुले कृषी विद्यापीठ  चे कुलपती जिष्णू देव वर्मा  यांनी केले.आयोजित ३९ व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. या समारंभात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यपालांच्या हस्ते ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे , राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील 
 तसेच कृषिमंत्री व विद्यापीठाचे प्रतिकुलपती दत्तात्रय भरणे  यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय नवी दिल्ली येथील आय सी आर चे 
 माजी संचालक डॉ. अशोक कुमार सिंह, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे आणि राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे उपस्थित होते.
राज्यपाल वर्मा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’ याबरोबरच ‘जय अनुसंधान’ ही घोषणा देत संशोधनाच्या महत्त्वावर भर दिला आहे. हवामान बदल, वेगाने होत असलेली तांत्रिक प्रगती आणि बदलते जागतिक परिदृश्य यामुळे कृषी क्षेत्रात दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि नवकल्पनांची गरज निर्माण झाली आहे. नैसर्गिक व शाश्वत शेतीच्या प्रसारात तसेच देशातील पहिले ‘रिमोट पायलट प्रशिक्षण केंद्र’ स्थापन करण्यासाठी विद्यापीठाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची विद्यापीठात प्रभावी अंमलबजावणी होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करताना त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, केवळ नोकरीच्या मागे न लागता कृषी नवकल्पना आणि उद्योजकतेकडे वळावे. राज्य शासन कृषी क्षेत्रातील नवउद्योग आणि ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यास कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शाश्वत शेतीसाठी व्यापक संशोधनाची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 म्हणाले की, मागील दशकात शेती क्षेत्रात मूलगामी बदल घडवून आणण्यासाठी शासनाने विविध योजना राबविल्या आहेत. कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. पावसाचा प्रत्येक थेंब साठविण्यासाठी ‘जलयुक्त शिवार’ योजना सुरू करण्यात आली असून त्यामुळे राज्यातील भूजल पातळीत वाढ झाली आहे.
‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत अहिल्यानगर जिल्हा अग्रेसर ठरला आहे. शेतकऱ्यांच्या पाणी सुरक्षेबरोबरच वीज सुरक्षेसाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना सुरू करण्यात आली आहे. चालू वर्षाच्या अखेरीस राज्यात १४ हजार मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा १२ तास मोफत वीज उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य झाला आहे. ‘अॅग्रीस्टॅक’ योजनेअंतर्गत देशात सर्वाधिक म्हणजे सुमारे १ कोटी ३० लाख शेतकऱ्यांना डिजिटल ओळख देण्यात आली आहे. या माहितीचा उपयोग करून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले जात आहेत. ‘महाविस्तार’ या अॅपद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन दिले जात असून कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे उत्पादन खर्च २५ टक्क्यांपर्यंत कमी होऊन उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
पुढील दशकात कृषी क्षेत्रात व्यापक परिवर्तन घडवून आणण्याचा शासनाचा निर्धार आहे. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देऊन रासायनिक घटकांचा वापर कमी करणे आवश्यक आहे. मातीची सुपीकता टिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन होत असून ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांचा विचार करून धोरणे राबविली तर कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल घडेल, असेही त्यांनी नमूद केले.
कृषी विद्यार्थ्यांनी नोकरी मागणारे नव्हे, नोकरी देणारे बनावे
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे  म्हणाले की, कृषी विद्यार्थ्यांकडून कुटुंब व समाजाच्या मोठ्या अपेक्षा आहेत. विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता नोकरी निर्माण करणारे कृषी उद्योजक बनावे. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे आता अत्यावश्यक झाले आहे.
कृषी क्षेत्राचा अर्थव्यवस्थेत मोठा वाटा
डॉ. अशोक कुमार सिंह यांनी सांगितले की, देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि रोजगारनिर्मितीत कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. हरितक्रांती आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने देशातील अन्नधान्य उत्पादनात अभूतपूर्व वाढ झाली आहे. शेती हा केवळ व्यवसाय नसून ती मानवतेची सेवा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान शेतकरी आणि ग्रामीण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित करावे, असे त्यांनी आवाहन केले.
विद्यापीठाचा प्रगती अहवाल सादर
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी विद्यापीठाचा अहवाल सादर करताना सांगितले की, विद्यापीठाने आतापर्यंत ३२० उच्च उत्पादनक्षम पिकांच्या जाती आणि ५६ कृषी अवजारे विकसित केली आहेत. तसेच ६ हजार २८४ वनस्पती आनुवंशिक संसाधनांचे संवर्धन करण्यात आले आहे. गेल्या पाच दशकांत विद्यापीठाने दीड लाखांहून अधिक कुशल मनुष्यबळ घडविले आहे.
४,६०२ विद्यार्थ्यांना पदव्या
या पदवीप्रदान समारंभात राज्यपालांच्या हस्ते विविध विद्याशाखांतील एकूण ४,६०२ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. त्यापैकी ४,१८२ विद्यार्थ्यांना पदवी, ३४६ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी तर ७४ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ४२ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके आणि रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास आमदार मोनिका राजळे  जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे तसेच विविध अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक आणि प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर