शेती शाश्वत करणा साठी सर्वाचे प्रयत्न हवे

शेती शाश्वत साठी सर्वांनीचे प्रयत्न हवे – कुलगुरू डॉ. विलास खर्चे
घाडगे न्यूज| प्रतिनिधी
शेतीची उत्पादकता वाढवायची असेल तर संतुलित खतांचा वापर आवश्यक आहे. अनेक शेतकरी अजूनही माती परीक्षण न करता रासायनिक खतांचा वापर करतात. पिकांना दिलेले सर्व रासायनिक खत पिकांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे जैविक व जिवाणू खतांचा वापर करणे गरजेचे आहे. जमिनीची उत्पादकता, पिकांचे उत्पादन आणि सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी जिवाणू खते, सेंद्रिय खते तसेच हिरवळीच्या खतांचा वापर करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी पीक विविधतेवर भर देऊन भरडधान्य पिकांचा समावेश करावा. मानवी आरोग्य आणि शेती यांची सांगड अत्यंत महत्त्वाची आहे. कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि शासनाचे विविध विभाग सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत. शेती शाश्वत होण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करूया, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या भाकृअप शेतकरी प्रथम प्रकल्प व कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खेत बचाओ अभियान’ आणि ‘संतुलित खत वापर जनजागृती अभियान’ अंतर्गत राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे ‘बाजरी व नाचणी उत्पादन तंत्रज्ञान’ या विषयावरील एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. खर्चे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, कानडगावच्या सरपंच सौ. निशा गागरे, समाजकार्यकर्ते नानासाहेब गागरे, विभागप्रमुख डॉ. प्रकाश लोखंडे, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. पंडित खर्डे, माती परीक्षण व पीक प्रतिसाद प्रकल्पाचे मृदा रसायनशास्त्रज्ञ डॉ. आनंद जाधव, राहुरी तालुका कृषी अधिकारी बापुसाहेब शिंदे, ज्वारी कृषी विद्यावेत्ता डॉ. दत्तात्रय पाचारणे, फुले कृषी वाहिनीचे प्रभारी अधिकारी डॉ. आनंद चवई, प्रसारण केंद्र प्रमुख तथा शेतकरी प्रथम प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. सचिन सदाफळ, नाचणी व पौष्टिक तृणधान्य संशोधन प्रकल्पाचे प्रमुख व कनिष्ठ पैदासकार डॉ. योगेश बन तसेच कृषी सखी सीमा गागरे उपस्थित होत्या.
यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. प्रशांत बोडके म्हणाले की, कृषी विद्यापीठाने पौष्टिक आणि अधिक उत्पादन देणारे अनेक वाण विकसित केले आहेत. यामध्ये बाजरीच्या ‘आदिशक्ती’ या वाणामध्ये लोहाचे प्रमाण अधिक आहे. शेतकऱ्यांनी बाजरी आणि नाचणीची लागवड करून पौष्टिक धान्याचा आपल्या आहारात समावेश करावा. त्यामुळे चांगले उत्पादन मिळण्याबरोबरच आरोग्यही सुदृढ राहील. अहिल्यानगर जिल्हा दुग्ध उत्पादनासाठी अग्रेसर असून नाचणीचे पीक घेतल्यास धान्यासोबत जनावरांसाठी पौष्टिक चारा देखील उपलब्ध होईल. शेतकऱ्यांनी विद्यापीठाने विकसित केलेले वाण, जैविक व जिवाणू खते तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करून उत्पादन वाढवावे.
यावेळी सरपंच सौ. निशा गागरे म्हणाल्या की, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल शेतकरी प्रथम प्रकल्पाच्या माध्यमातून गावात राबविण्यात आले आहे. त्यामुळे शेती उत्पादन आणि उत्पन्नामध्ये शाश्वतता निर्माण झाली आहे. या प्रकल्पामुळे सोयाबीन पिकाखालील क्षेत्र वाढले असून कडधान्ये, तृणधान्ये आणि फळपिकांची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड होत आहे. तसेच पशुपालन क्षेत्रातही गाव प्रगती करत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. सचिन सदाफळ यांनी केले. तांत्रिक सत्रात डॉ. आनंद जाधव यांनी रासायनिक खतांचा संतुलित व कार्यक्षम वापर तसेच जैविक, जिवाणू आणि हिरवळीच्या खतांचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. दत्तात्रय पाचारणे यांनी बाजरी उत्पादन तंत्रज्ञान, डॉ. योगेश बन यांनी नाचणीचे पौष्टिक महत्त्व व सुधारित लागवड तंत्रज्ञान, तर बापुसाहेब शिंदे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी नाचणी उत्पादक कुणाल पवार व भास्कर पंडित यांनी आपल्या अनुभवांचे कथन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते ‘खेत बचाओ अभियान व संतुलित खत वापर जनजागृती अभियान–२०२६’ या माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना बाजरी व नाचणीचे बियाणे आणि माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पौष्टिक भरडधान्यांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. पंडित खर्डे यांनी मानले.
कार्यक्रमास कानडगाव येथील मधुकर गागरे, राधाकृष्ण गागरे, हैशीराम गागरे, ज्ञानेश्वर गागरे, कृषी सखी कु. जयश्री गागरे, तांभेरे येथील ऋत्विक गागरे, महेश गागरे, जालिंदर मुसमाडे, मंडळ कृषी अधिकारी भारत कातोरे, बाळासाहेब सोनवणे तसेच सहाय्यक कृषी अधिकारी प्रभात आंत्रे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन