रावसाहेब खेवरे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार

ब्रेकिंग न्यूज
माजी शिवसेना जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांचा शिंदे गटात प्रवेश; रविवारी मुंबईत होणार पक्षप्रवेश
जिल्हाध्यक्षपद काढल्यानंतर नाराज असलेले खेवरे अखेर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला करणार ‘जय महाराष्ट्र’
घाडगे न्यूज| प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे हे रविवारी दुपारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. त्यामुळे ठाकरे गटाला जिल्ह्यात आणखी एक धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जिल्हाध्यक्षपदावरून हटविल्यानंतर रावसाहेब खेवरे हे पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याचे बोलले जात होते. गेल्या काही महिन्यांपासून ते पक्षाच्या कार्यक्रमांपासून काहीसे दूर राहिल्याचेही राजकीय निरीक्षकांचे मत आहे. अखेर त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
रावसाहेब खेवरे यांनी अलिकडेच राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक लढवून आपली राजकीय ताकद दाखवून दिली होती. राहुरी तालुक्यासह शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काही भागात त्यांचा स्वतंत्र जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांचे जाळे असल्याचे मानले जाते. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराला स्थानिक राजकारणात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी रावसाहेब खेवरे यांना शिंदे गटात आणण्यासाठी विशेष पुढाकार घेतला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तसेच पुढील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेवरे यांचे संघटन कौशल्य आणि स्थानिक प्रभाव शिंदे गटासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मानले जात आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, शिर्डी लोकसभा मतदारसंघात भविष्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेता खेवरे यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळेच त्यांच्या पक्षप्रवेशासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा आहे.
रविवारी मुंबई येथे होणाऱ्या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर रावसाहेब खेवरे यांना शिंदे शिवसेनेत कोणती जबाबदारी दिली जाते, याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यांच्या प्रवेशामुळे राहुरी आणि शिर्डी मतदारसंघातील राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन