कृषी दिनाचे औचित्य साधून कुलगुरु डॉ विलास खर्चे यांनी केली पेरणी
कृषी दिनाचे औचित्य साधून कुलगुरु विलास खर्चे यांनी
घाडगे न्यूज।प्रतिनिधी
शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे कमी करणे सध्या शक्य नसले, तरी रासायनिक खतांचा संतुलित वापर, हिरवळीच्या खतांसह जैविक खतांचा अधिक वापर आणि शेतीला यांत्रिकीकरणाची जोड दिल्यास शेती अधिक फायदेशीर ठरू शकते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या एकात्मिक शेती पद्धतीच्या मॉडेलचा प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात अवलंब करावा. विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी कृषी दिन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर साजरा करणे हे महत्त्वाचे पाऊल असून, या कृषी दिनापासून ‘विद्यापीठ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात येत असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या भाकृअप शेतकरी प्रथम प्रकल्प आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना डॉ. खर्चे बोलत होते. यावेळी दिवंगत वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, नियंत्रक डॉ. सचिन नांदगुडे, तांभेरे गावचे सरपंच उमेश मुसमाडे, कृषी तंत्रज्ञान शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजू अमोलीक, उद्यानविद्या विभागप्रमुख डॉ. भरत पाटील, कृषी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. भीमराव कांबळे, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. विक्रम कड, जीव रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रकाश लोखंडे, आंतरविद्याशाखीय जलसिंचन व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. विजय पाटील, कृषी अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजेंद्र हिले, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुरेश दोडके, कापूस पैदासकार डॉ. पवन कुलवाल, अ.भा.स. कृषी अवजारे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. तुळशीदास बास्टेवाड, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. पंडित खर्डे, ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेचे प्रमुख डॉ. रवि आंधळे, फुले कृषी वाहिनीचे प्रभारी अधिकारी डॉ. आनंद चवई, प्रसारण केंद्र प्रमुख तथा शेतकरी प्रथम प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. सचिन सदाफळ, सहसमन्वयक डॉ. भगवान देशमुख तसेच मेजर ताराचंद गागरे उपस्थित होते.
यावेळी डॉ. गोरक्ष ससाणे म्हणाले की, शेतकरी प्रथम प्रकल्पामुळे विद्यापीठाचे तंत्रज्ञान तांभेरे गावापर्यंत पोहोचविण्यास मदत झाली आहे. ‘फुले कृषी तंत्रज्ञान घरोघरी, समृद्धी येईल गावोगावी’ या संकल्पनेतून विद्यापीठाचे तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
डॉ. प्रशांत बोडके यांनी सांगितले की, सध्या एल निनोच्या परिस्थितीमुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज असून, या पार्श्वभूमीवर बी.बी.एफ. तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
डॉ. साताप्पा खरबडे यांनी सांगितले की, विद्यापीठाने आतापर्यंत ३२० हून अधिक सुधारित वाण विकसित केले असून २,००० पेक्षा अधिक तंत्रज्ञान शिफारशी शेतकऱ्यांसाठी प्रसारित केल्या आहेत. तसेच कृषी शिक्षणासंदर्भात २,००० हून अधिक सामंजस्य करार करण्यात आले आहेत. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील १० जिल्ह्यांमध्ये १५ शासकीय आणि ६३ खासगी कृषी महाविद्यालये व कृषी तंत्र विद्यालयांमार्फत कृषी शिक्षणाचे कार्य सुरू आहे.
सरपंच उमेश मुसमाडे यांनी सांगितले की, शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत गावात विविध प्रात्यक्षिकांसह अभ्यासदौऱ्यांचे आयोजन करण्यात आले. एकात्मिक शेती पद्धतीच्या मॉडेलमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे.
यावेळी डाळिंब उत्पादक कल्याण गाडे, प्रगतशील शेतकरी मेजर ताराचंद गागरे, संगमनेरी शेळीपालक कीर्ती गागरे, शेतकरी महिला रेश्मा गागरे व सुषमा मुसमाडे तसेच देशातील प्रसिद्ध युट्युबर आदित्य डेरे यांचा कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. सचिन सदाफळ यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी महेश मुसमाडे यांच्या शेतावर कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या हस्ते बी.बी.एफ. यंत्राद्वारे सोयाबीन पेरणी करण्यात आली. या प्रात्यक्षिकाचे आयोजन अ.भा.स. कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पातर्फे करण्यात आले होते.
याप्रसंगी कणगर येथील राजेंद्र वरघुडे यांच्या मुक्त गोठा, शेळीपालन व परसबागेतील कुक्कुटपालन प्रकल्पाला, कल्याण गाडे यांच्या डाळिंब बागेला तसेच तांभेरे येथील ऋतिक गागरे यांच्या गांडूळखत व जैविक निविष्ठा निर्मिती प्रकल्पाला मान्यवरांनी भेटी देऊन पाहणी केली.
Comments
Post a Comment