डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने वाचन कट्टा उभारा

देवळाली प्रवरात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचक कट्टा’ उभारा 
 नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना निवेदन
घाडगे न्यूज।प्रतिनिधी 
देवळाली प्रवरात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचक 
ज्ञान, वाचन आणि वैचारिक प्रबोधनाची चळवळ अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने देवळाली प्रवरा शहरात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचक कट्टा’ उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. युवकांमध्ये वाचन संस्कृती विकसित व्हावी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व्यापक प्रसार व्हावा तसेच विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांना अभ्यासासाठी दर्जेदार व सार्वजनिक व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील गट क्रमांक ३३७ येथे वाचक कट्टा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भातील निवेदन परिसरातील युवकांच्या वतीने नगराध्यक्ष सत्यजित दादा कदम यांना सादर करण्यात आले. सचिनभाऊ कोठुळे व सतीशभाऊ वाळुंज यांच्या माध्यमातून हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राजवाडा परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या आहे. या परिसरातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षार्थी, युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांना शांत, सुसज्ज आणि प्रेरणादायी वातावरणात अभ्यास व वाचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी आधुनिक स्वरूपाचा वाचक कट्टा उभारणे आवश्यक आहे. या माध्यमातून युवकांमध्ये वाचनाची आवड वाढेल, बौद्धिक विकासाला चालना मिळेल आणि समाजात वैचारिक परिवर्तनाची नवी दिशा निर्माण होईल, असा विश्वास निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.
यावेळी मानवाधिकार संरक्षण समितीचे राहुरी तालुका निरीक्षक प्रकाश शिवाजी पंडित म्हणाले, "युवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्यावे. त्यांच्या विचारांचे व साहित्याचे अध्ययन करून ते जीवनात उतरविणे हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल. बाबासाहेबांची ग्रंथसंपदा युवकांना सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने वाचक कट्ट्याची संकल्पना मांडण्यात आली असून हा उपक्रम समाजात वैचारिक जागृती घडविणारा ठरेल."
भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अक्षय सुरेश संसारे यांनी सांगितले की, नगराध्यक्ष सत्यजित दादा कदम यांनी या मागणीची तातडीने सकारात्मक दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना प्रस्तावित जागेची पाहणी करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे हा महत्त्वाकांक्षी उपक्रम लवकरच प्रत्यक्षात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगराध्यक्षांनी दाखविलेली संवेदनशीलता आणि तत्परता निश्चितच स्वागतार्ह असल्याचेही त्यांनी नमूद केले.
निवेदन स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष सत्यजित दादा कदम यांनी उपस्थित युवकांशी संवाद साधून त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. युवकांनी सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करत वाचक कट्टा उभारण्याच्या मागणीबाबत सकारात्मक आणि तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष तथा गटनेते प्रकाशभाऊ संसारे यांनी युवकांच्या विधायक संकल्पनेचे कौतुक करत देवळाली प्रवरा नगरपरिषद युवकांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देईल, अशी ग्वाही दिली.
यावेळी ॲड. ऋषी राजेंद्र पंडित, ॲड. विशाल संसारे, प्रकाश  पंडित, अक्षय सुरेश संसारे, ॲड. पांडुरंग जालिंदर मुसमाडे, अभिजित शिंदे, नगरपरिषदेचे स्थापत्य अभियंता दिनकर पवार, अभिषेक सुतावणे,  रोहित पंडित, शहर समन्वयक उदय इंगळे यांच्यासह परिसरातील युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन