अरोपीचे समुपदेशन गुन्हेगारी पासून प्ररावृत्त
घाडगे न्यूज। प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्हा पोलिसांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या अभिनव उपक्रमांतर्गत विविध गुन्ह्यांतील आरोपींच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्यात सकारात्मक मानसिक बदल घडवून आणण्यासाठी समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्रीरामपूर येथे झालेल्या आरोपी परेडमध्ये तब्बल १२१ आरोपींचे समुपदेशन करण्यात आले. यावेळी श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ विकचौरे यांनी उपस्थित आरोपींना मार्गदर्शन करत गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर राहण्याचे आणि जबाबदार नागरिक म्हणून नव्याने आयुष्य जगण्याचे आवाहन केले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील १७ पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्ह्यांत नोंद असलेल्या आरोपींमध्ये सकारात्मक मानसिक परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश आरोपींना त्यांच्या कृत्यांची जाणीव करून देणे, त्यांच्यामध्ये पश्चात्तापाची भावना निर्माण करणे आणि त्यांना पुन्हा गुन्हेगारीकडे वळू न देणे हा आहे.
समुपदेशनादरम्यान आरोपींना कायद्याचे पालन, सामाजिक जबाबदारी, कुटुंबाचे महत्त्व, नैतिक मूल्ये आणि प्रामाणिक जीवन जगण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. चुकीच्या मार्गावर गेल्यामुळे स्वतःबरोबरच कुटुंब आणि समाजालाही मोठी किंमत मोजावी लागते, याची जाणीव करून देत नव्याने आयुष्याची सुरुवात करण्यासाठी प्रेरित करण्यात आले.
अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाचा हा उपक्रम केवळ कायद्याची अंमलबजावणी करण्यापुरता मर्यादित नसून, गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालून आरोपींचे समाजाच्या मुख्य प्रवाहात पुनर्वसन करण्याचा एक संवेदनशील प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अशा प्रकारच्या समुपदेशनामुळे आरोपींमध्ये सकारात्मक बदल घडून येईल आणि पुनरावृत्तीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला.
Comments
Post a Comment