राहुरीत एकल महिला व बालकांच्या योजना प्रभावी राबविणार
राहुरीत एकल महिला व एकल बालकांच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण निर्णय; विविध योजनांच्या प्रभावी राबविणार
घाडगे न्यूज।प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील मिशन वात्सल्य समितीची महत्त्वपूर्ण सभा तहसीलदार डॉ. अमित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी तहसील कार्यालयात बैठक
संपन्न झाली. यात तालुक्यातील एकल महिला आणि एकल बालकांच्या विविध समस्या, त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच त्यांना न्याय, संरक्षण आणि सन्मान मिळवून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
सभेला बालविकास प्रकल्प अधिकारी जी. बी. शिंदे, गट शिक्षणाधिकारी जयश्री कार्ले, सहायक निबंधक बाळासाहेब रायकर, संजय गांधी निराधार योजनेचे संजय वाघ, महिला व बाल विकास विभागाचे एच. बी. गिरवले तसेच 'साऊ' एकल महिला समितीचे अशासकीय सदस्य आप्पासाहेब ढूस उपस्थित होते.
सभेत तालुक्यातील सर्व एकल महिलांची गावनिहाय गणना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून शासकीय योजनांपासून वंचित राहिलेल्या महिलांची अचूक माहिती उपलब्ध होणार असून त्यांना आवश्यक लाभ मिळवून देण्यासाठी नियोजन करता येणार आहे.
तसेच तालुक्यातील एकल बालकांचीही व्यापक गणना करण्यात येणार असून, बाल संगोपन योजनेसह विविध शासकीय योजनांपासून वंचित असलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. पात्र बालकांना तातडीने योजनांचा लाभ मिळावा, यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात येणार आहेत.
एकल महिलांच्या विविध प्रश्नांना महसूल, महिला व बाल विकास, शिक्षण, आरोग्य तसेच इतर सर्व शासकीय विभागांकडून प्राधान्यक्रमाने प्रतिसाद देण्याचा निर्णयही सभेत घेण्यात आला.
याशिवाय संजय गांधी निराधार योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र एकल महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असून, अर्ज प्रक्रिया सुलभ करून लाभार्थ्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.
एकल महिलांना उपचारांचा आर्थिक भार कमी व्हावा यासाठी तालुक्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांना वैद्यकीय बिलामध्ये सवलत देण्याबाबत विनंती करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक बांधिलकी जपत एकल महिलांना मोफत वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा समितीमार्फत सन्मान करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
एकल महिलांना वारसा हक्काने मिळणाऱ्या मालमत्तेबाबत उद्भवणाऱ्या कायदेशीर व प्रशासकीय अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व मदत उपलब्ध करून देण्याचा निर्णयही सभेत घेण्यात आला.
सभेच्या शेवटी 'साऊ' एकल महिला समितीचे अशासकीय सदस्य आप्पासाहेब ढूस यांनी तहसीलदार डॉ. अमित पवार यांनी तातडीने सभा आयोजित करून एकल महिला व एकल बालकांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल आभार मानले.
मिशन वात्सल्य अंतर्गत एकल महिला आणि एकल बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांना शासकीय योजनांचा लाभ, सामाजिक सुरक्षा, न्याय आणि सन्मान मिळवून देण्याच्या दृष्टीने घेण्यात आलेले हे निर्णय राहुरी तालुक्यातील हजारो गरजू कुटुंबांसाठी दिलासादायक आणि आशादायी ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment