कृषी उद्योजक फोरम हिताचा कुलगुरु डॉ विलास खर्चे

कृषी उद्योजकता फोरम हा विद्यार्थ्यांसाठी आशादायक उपक्रम
– कुलगुरू डॉ. विलास खर्चे
घाडगे न्यूज।प्रतिनिधी 
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेला कृषी उद्योजकता फोरम हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि भविष्याभिमुख उपक्रम असून, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील १५ महाविद्यालयांमार्फत तो प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर आयोजित करण्यात येणाऱ्या दीक्षारंभ कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या करिअरविषयक कलाचा अभ्यास करून त्यानुसार या फोरमच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून दिल्या जातील. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा विद्यापीठाचा अत्यंत आशादायक प्रकल्प असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे ‘उद्योजकता व उच्च तंत्रज्ञान शेती’ या विषयावरील एकदिवसीय जनजागृती कार्यशाळेचे आयोजन डॉ. नानासाहेब पवार सभागृहात करण्यात आले होते. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विलास खर्चे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रीनप्लास्ट टेक इंडिया प्रा. लि., बेंगळुरूचे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राजीब कुमार रॉय तसेच सह्याद्री फार्म्स, नाशिकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. विलास शिंदे उपस्थित होते. यावेळी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, सह्याद्री फार्म्सच्या एच. स्क्वेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद राजेभोसले, इन्क्युबेशन सेंटरचे प्रमुख संदीप शिंदे, कृषिविद्या विभागप्रमुख मंगेश भास्कर तसेच कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे उपस्थित होते.
‘उच्च तंत्रज्ञानावर आधारित शेतीतील संधी’ या विषयावर मार्गदर्शन करताना राजीब कुमार रॉय म्हणाले की, शेती क्षेत्रात यशस्वी उद्योजक म्हणून उभे राहण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. मात्र, सध्याचा काळ हा युवकांसाठी संधींचा असून त्याचा योग्य उपयोग केल्यास उज्ज्वल भविष्य घडविता येऊ शकते. कृषी उद्योजकतेमध्ये अमर्याद संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती आणि स्वतःला सतत अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. काटेकोर शेती, सेन्सर-आधारित शेती, ड्रोन तंत्रज्ञान, मोबाईल फोनचा ‘डॉक्टर’ म्हणून वापर, शीतसाखळी (कोल्ड चेन), मूल्यवर्धन आणि प्रभावी बाजारव्यवस्था हे उच्च तंत्रज्ञानावर आधारित कृषी उद्योजकतेचे महत्त्वाचे आधारस्तंभ असल्याचे त्यांनी सांगितले.
‘शेतीमधील उद्योजकतेची गरज’ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. विलास शिंदे म्हणाले की, भारतातील शेतीचे उत्पन्न अपेक्षेपेक्षा कमी राहण्यामागील प्रमुख कारण म्हणजे मूल्यवर्धनाचा अभाव होय. चीन आणि नेदरलँड्ससारख्या देशांच्या तुलनेत भारतात व्हॅल्यू चेन, प्रक्रिया उद्योग आणि ब्रँडिंग या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याची गरज आहे. विकसित भारत २०४७ च्या संकल्पनेत शेतकरी-केंद्रित मजबूत व्हॅल्यू चेन उभारणी हा महत्त्वाचा घटक आहे. युवकांनी कृषी उद्योजक बनून नवकल्पना, आधुनिक तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धनाच्या माध्यमातून शेतीला नवे रूप देणे काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवकल्पना, उद्योजकता आणि सक्षम व्हॅल्यू चेन यांच्या आधारेच कृषी क्षेत्राचा शाश्वत आणि समृद्ध विकास साध्य होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यशाळेत संदीप शिंदे, प्रमोद राजेभोसले आणि मंगेश भास्कर यांनी उच्च तंत्रज्ञान शेतीतील संधी, कृषी उद्योजकतेचे महत्त्व, स्टार्टअपसाठी उपलब्ध इन्क्युबेशन सुविधा, तसेच कृषी पदवीधरांसाठी ‘ग्रोथ माइंडसेट’ विकसित करण्याची आवश्यकता आणि भविष्यातील करिअरची योग्य दिशा निवडण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे संयोजन कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. एम. नलावडे आणि उद्यानविद्या विभागप्रमुख डॉ. बी. टी. पाटील यांनी केले. समन्वयक म्हणून डॉ. विक्रम कड, डॉ. सुनील कदम, डॉ. नितीन दानवले आणि डॉ. जितेंद्र ढेमरे यांनी काम पाहिले.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन