टाळ्या वाजवणाऱ्या हातांनी केली टाळ वाजवणाऱ्या हाताची सेवा !
तरंग।शिवाजी घाडगे
आषाढी वारी म्हणजे श्रद्धा, समता, सेवा आणि मानवतेचा अखंड उत्सव. पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनासाठी श्रीरामपूरसह परिसरातील हजारो वारकरी दरवर्षी टाळ-मृदंगाच्या गजरात, मुखी हरिनामाचा जप करत पायी दिंडीतून पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या भक्तिमय वातावरणात श्रीरामपूरातील तृतीयपंथीय समाजाने केलेल्या सेवाभावी कार्याने अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे केले.
स्वतः टाळ्या वाजवून उपजीविका करणाऱ्या किन्नर (तृतीयपंथीय) समाजाने वारकऱ्यांचे प्रेमाने स्वागत करत त्यांना फळे, बिस्किटे आणि पिण्याचे पाणी वाटप केले. कोणताही गाजावाजा न करता, केवळ सेवाभाव आणि विठ्ठलभक्तीच्या प्रेरणेने त्यांनी केलेली ही सेवा उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेली.
"आम्ही टाळ्या वाजवून उदरनिर्वाह करतो; पण वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभावे, हीच आमची इच्छा आहे," अशी भावना तृतीयपंथीय समाजातील सदस्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या कृतीतून समाजाला माणुसकीचा आणि समतेचा अमूल्य संदेश मिळेल.
ही घटना केवळ मदतीची नव्हे, तर सामाजिक समरसतेची होती. टाळ्या वाजवणाऱ्या हातांनी टाळ वाजवत विठ्ठलनामात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढे येत, "देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत घेत देण्याचेही शिकावे," हा सदविचार प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला.
आषाढी वारी हा केवळ धार्मिक सोहळा नाही, तर तो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, समतेचा, सेवाभावाचा आणि माणुसकीचा अखंड प्रवाह आहे. लाखो वारकरी गळ्यात तुळशीची माळ, हातात टाळ, मुखी "राम कृष्ण हरी"चा अखंड गजर आणि अंतःकरणात विठ्ठलावरील नितांत श्रद्धा घेऊन पंढरपूरच्या दिशेने चालत असतात. या वारीत श्रीमंत-गरीब, उच्च-नीच, जात-पात, स्त्री-पुरुष, शिक्षित-अशिक्षित असा कोणताही भेद राहत नाही. वारी सर्वांना समानतेने कवेत घेते. म्हणूनच वारी हा महाराष्ट्राच्या सामाजिक संस्कृतीचा सर्वात मोठा लोकशिक्षणाचा उत्सव आहे.
याच वारीदरम्यान श्रीरामपूरमध्ये घडलेली घटना मनाला स्पर्श करून जाते. समाजाकडून अनेकदा उपेक्षित, दुर्लक्षित आणि गैरसमजांच्या छायेत जगणाऱ्या तृतीयपंथीय समाजाने पायी चालणाऱ्या वारकऱ्यांचे फळे, बिस्किटे आणि पिण्याच्या पाण्याने स्वागत केले. ही मदत आर्थिकदृष्ट्या मोठी नव्हती; पण तिच्यामागील भावना अमूल्य होती. स्वतः टाळ्या वाजवून उदरनिर्वाह करणाऱ्या हातांनी, टाळ वाजवत विठ्ठलनामात दंग असलेल्या वारकऱ्यांची सेवा केली. हा क्षण केवळ भावनिक नव्हता, तर समाजाला अंतर्मुख करणारा होता.
तृतीयपंथीय समाजाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अजूनही पूर्णपणे बदललेला नाही. अनेक ठिकाणी त्यांना उपेक्षा, अवहेलना आणि भेदभाव सहन करावा लागतो. त्यांच्या टाळ्या ऐकल्या जातात; पण त्यांच्या मनातील वेदना ऐकून घेणारे फारच कमी असतात. त्यांच्याकडे पाहण्यापेक्षा त्यांच्याकडे टक लावून पाहिले जाते. त्यांना माणूस म्हणून स्वीकारण्याऐवजी वेगळे समजले जाते. अशा परिस्थितीत त्यांनी दाखवलेला सेवाभाव समाजासाठी आरशासारखा आहे.
आपण अनेकदा मदत करण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीची जात, धर्म, प्रतिष्ठा किंवा आर्थिक स्थिती पाहतो. परंतु संतांनी शिकवलेली सेवा कोणताही भेद करत नाही. विठ्ठलाच्या दारी सर्व समान आहेत. वारीही हेच शिकवते. म्हणूनच तृतीयपंथीय समाजाने केलेली सेवा ही केवळ वारकऱ्यांना दिलेली मदत नसून, समाजाला दिलेला माणुसकीचा धडा आहे.
श्रीकृष्णाने सुदाम्याच्या पोह्यांचे मोल त्यांच्या किंमतीत नाही, तर भावनेत पाहिले. त्याचप्रमाणे तृतीयपंथीय समाजाने केलेल्या फळे, बिस्किटे आणि पाण्याच्या वाटपाचे मूल्य त्याच्या खर्चात नाही, तर त्यामागील प्रेमात आहे. सेवा मोठी की लहान यापेक्षा सेवा करण्याची भावना किती मोठी आहे, हे अधिक महत्त्वाचे असते.
आज समाजात प्रसिद्धीसाठी मदतीचे फोटो काढले जातात, व्हिडिओ बनवले जातात, समाजमाध्यमांवर पोस्ट केल्या जातात. पण खरी सेवा तीच असते, जिथे प्रसिद्धीपेक्षा समाधान मोठे असते. श्रीरामपूरमधील या तृतीयपंथीय समाजाने कोणत्याही अपेक्षेशिवाय केलेली सेवा ही अशाच निस्वार्थ वृत्तीचे उदाहरण आहे.
"जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले; तोचि साधू ओळखावा, देव तेथेंच जाणावा." या अभंगातील संदेश आजही तितकाच जिवंत आहे. देव मंदिरातच नसतो; तो सेवाभावी हातांत असतो. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणाऱ्या प्रत्येक कृतीत विठ्ठलाचे दर्शन घडते.
आज आपण विकास, आधुनिकता आणि तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत. पण माणुसकीचा पाया कमकुवत होत चालल्याची खंत अनेकदा व्यक्त केली जाते. अशा काळात समाजाने ज्यांना उपेक्षित ठरवले, त्याच समाजघटकाने माणुसकीची मशाल उंच धरावी, हा विरोधाभास विचार करायला लावणारा आहे. आपण स्वतःला सुशिक्षित म्हणवतो; पण दुसऱ्याच्या दुःखात धावून जाण्याची तयारी किती आहे? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे.
वारी म्हणजे चालणे नव्हे; वारी म्हणजे बदलणे. स्वतःमध्ये परिवर्तन घडवणे, अहंकार झटकणे, दुसऱ्याच्या वेदना समजून घेणे आणि सेवा हेच जीवनाचे सार मानणे, हीच खरी वारी आहे. श्रीरामपूरातील या घटनेने वारीचा हाच संदेश जिवंत केला.
तृतीयपंथीय समाजाबाबत सहानुभूती नव्हे, तर समानतेची भावना निर्माण होणे ही काळाची गरज आहे. त्यांना दयेची नव्हे, तर सन्मानाची गरज आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात स्थान मिळाले, तर त्यांच्यातील संवेदनशीलता आणि सेवाभाव समाजाला अधिक समृद्ध करेल.
"देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत घेत देण्याचेही शिकावे" हा विचार केवळ कवितेत राहू नये. प्रत्येकाने आपल्या उत्पन्नातील, वेळेतील किंवा क्षमतेतील एक छोटासा भाग समाजासाठी दिला, तर अनेकांचे आयुष्य उजळू शकते. मदत ही पैशांनीच होत नाही; प्रेम, सहकार्य, आदर आणि माणुसकी हीसुद्धा मोठी देणगी असते.
वारीत चालणारे वारकरी विठ्ठलाला भेटण्यासाठी निघालेले असतात. पण मार्गात त्यांना भेटणारे असे सेवाभावी हातच प्रत्यक्षात विठ्ठलाचे रूप असतात. कारण देव दगडात नसतो; तो माणसाच्या चांगुलपणात असतो. तृतीयपंथीय समाजाने हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले.
समाजाने आता टाळ्या वाजवणाऱ्या हातांकडे केवळ उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पाहू नये. त्या हातांतही माया आहे, करुणा आहे, दानशूरपणा आहे आणि समाजाला दिशा देण्याची ताकद आहे. या घटनेने हे स्पष्ट केले की, माणसाची ओळख त्याच्या लिंगाने, व्यवसायाने किंवा परिस्थितीने होत नाही; ती त्याच्या कर्माने होते.
श्रीरामपूरातील हा प्रसंग कदाचित उद्या विसरला जाईल. पण त्याने दिलेला संदेश कायम स्मरणात राहायला हवा—सेवा करणारा प्रत्येक हात पवित्र असतो. माणुसकीपेक्षा मोठा धर्म नाही आणि समतेपेक्षा मोठी भक्ती नाही.
यंदाच्या वारीत टाळ वाजवणाऱ्या वारकऱ्यांसोबत टाळ्या वाजवणाऱ्या हातांनीही विठ्ठलभक्तीचा नवा अध्याय लिहिला आहे. म्हणूनच आज अभिमानाने म्हणावेसे वाटते—
"भाग्यवंत तेच नाहीत जे पंढरीला पोहोचले; भाग्यवंत तेही आहेत ज्यांनी आपल्या कष्टाच्या घासातून दुसऱ्याच्या ताटात प्रेमाने अन्न वाढले."
"दिशा शेख म्हणतात की आम्हाला ही सेवा केल्थाने आध्यात्मिक समाधान मिळते आपल्या हातांनी वारकऱ्यांची सेवा केल्याचा आनंद मिळतो गेले अनेक वर्ष ही सेवा आम्ही करतो"
"दरम्यान श्रीरामपुरात वादातून वार वाढत चालले असून वादाची नाही वारी ची गरज आहे हे ही लक्षात घेतले पाहीजे
राम कृष्ण हरी!
Comments
Post a Comment