देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या विरोधात काॅगेस करणार भिक मागो आंदोलन-नगरसेवक दासू पठारे

देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या विरोधात काँग्रेसचा 'भिक मागो' आंदोलनाचा इशारा-नगसेवक दासू पठारे 
देवळाली प्रवरा| प्रतिनिधी
देवळाली प्रवरा शहरातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था, नागरी सुविधांचा अभाव आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे नगरपालिकेकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ १८ जुलै रोजी 'भिक मागो' आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा काँग्रेसचे नगरसेवक दासू पठारे यांनी दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना पठारे म्हणाले की, शहरातील बहुतांश अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः वाट लागली असून नागरिकांना रोज खड्ड्यांतून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर बनली असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचत असल्याने नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
नगरपालिका प्रशासन नागरी समस्या सोडविण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांवरही टीका केली. "राज्यात लोकप्रतिनिधींचे सरकार असतानाही मुख्याधिकारी अजूनही प्रशासकीय राज असल्याप्रमाणे वागत असून नागरिकांच्या प्रश्नांबाबत साखरझोपेत आहेत," असा आरोप त्यांनी केला.
नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यावरही निशाणा साधताना पठारे म्हणाले की, नगराध्यक्षांना नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वेळ नाही. नगरसेवकांनी वारंवार पाठपुरावा करूनही मुख्याधिकारी त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतात. "मुख्याधिकारी फक्त नगराध्यक्षांनी सांगितलेलीच कामे ऐकतात. विकासकामांसाठी निधी नसल्याचे कारण वारंवार पुढे केले जाते. मात्र नागरिकांच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही नगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नगरसेवकांच्या वतीने १८ जुलै रोजी शहरात 'भिक मागो' आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या आंदोलनातून शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी निधी गोळा करण्याचा प्रतीकात्मक संदेश दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकरी दिंड्यांना नगरपालिका मोफत पिण्याच्या पाण्याची सुविधाही उपलब्ध करून देऊ शकत नाही, ही शहरासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे," अशी टीका त्यांनी केली.
केंद्र आणि राज्यात सत्ताधारी पक्षाची सत्ता असताना विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचे कारण देणे योग्य नसल्याचा टोला लगावत, "सत्तेचा उपयोग नागरिकांच्या हितासाठी होणार नसेल तर त्याचा काय उपयोग?" असा उपरोधिक सवालही त्यांनी उपस्थित केला.
देवळाली प्रवरा शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही नगरसेवक दासू पठारे यांनी दिला.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन