श्रीरापुरच्या गुन्हेगारीला लगाम घालण्याची वेळ

 श्रीरामपूरातील गुन्हेगारीला लगाम घालण्याची वेळ
 स्पेशल रिपोर्ट ।शिवाजी घाडगे 
श्रीरामपूर शहरात तरुण हॉटेल व्यावसायिक आकाश शेखर दुबया (वय ३०) यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण शहर हादरले आहे. या घटनेमुळे केवळ एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला नाही, तर शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नही उपस्थित झाले आहेत. शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गुंडांची दहशत नेमकी सामान्य नागरिकांवर आहे की कायदा अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेवर, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
श्रीरामपूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून खून, मारहाण, खंडणी, दहशत आणि टोळीबाजीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. अनेकदा वर्चस्वाच्या संघर्षातून, तर कधी जुन्या वैमनस्यातून रक्तरंजित घटना घडत आहेत. अशा घटनांमुळे शहराची शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे.
शनिवारी घडलेल्या घटनेत एका हॉटेलमध्ये जेवण देण्यास उशीर झाल्याच्या किरकोळ कारणावरून वेटरला मारहाण करण्यात आली. हा वाद सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या हॉटेल मालक आकाश दुबया यांच्यावर आरोपींनी टिपॉयने डोक्यावर वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. क्षुल्लक कारणावरून एका तरुणाचा जीव घेण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ रविवारी श्रीरामपूर शहर कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी आकाश दुबया यांचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून निषेध व्यक्त केला आणि पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील गुंडगिरी कायमची मोडून काढावी, सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांवर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, अशी मागणी करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस प्रशासनाने ६१ हून अधिक सराईत गुन्हेगारांना तडीपार केल्याची माहिती दिली होती. मात्र, त्यानंतरही अशा प्रकारची निर्घृण हत्या घडल्याने त्या कारवाईच्या प्रभावाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कायद्याचा धाक गुन्हेगारांवर राहिला पाहिजे, अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन हे नुकतेच जिल्ह्यात रुजू झाले असून ते कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. मात्र, जिल्ह्यातील गुन्हेगारीचे स्वरूप, सक्रिय टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांची साखळी यांचा सखोल अभ्यास करून त्यांच्यावर निर्णायक कारवाई करणे ही काळाची गरज आहे. केवळ गुन्हा घडल्यानंतर आरोपींना अटक करण्यापेक्षा गुन्हे घडूच नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावी ठरतील.
श्रीरामपूरसारख्या व्यापारी शहरात सक्षम आणि धाडसी पोलीस नेतृत्वाची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. शहरात अधिक गस्त, टोळीविरोधी विशेष मोहीम, सीसीटीव्ही यंत्रणेचे प्रभावी जाळे, सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई आणि कायद्याची कठोर अंमलबजावणी यावर भर दिला गेला पाहिजे.
आकाश दुबया यांच्या हत्येनंतर श्रीरामपूरातील नागरिकांचा संयम संपत चालल्याचे चित्र दिसत आहे. वाढत्या गुन्हेगारीला वेळीच आळा घालण्यात अपयश आल्यास जनतेचा संताप अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देण्याबरोबरच शहरातील गुंडगिरीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस, प्रभावी आणि दीर्घकालीन पावले उचलणे हीच काळाची गरज आहे.
 कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवरही गंभीर प्रश्न उपस्थित करते. क्षुल्लक कारणांवरून जीव घेण्याची प्रवृत्ती वाढत असेल, तर समाज धोकादायक वळणावर पोहोचत आहे.
गेल्या काही काळात खून, हल्ले, टोळीबाजी आणि दहशतीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कधी वर्चस्वाच्या लढाईत, कधी जुन्या वैमनस्यातून, तर कधी क्षुल्लक कारणांवरून रक्त सांडत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. व्यापारी वर्गही आता सुरक्षित नसल्याची भावना व्यक्त करू लागला आहे.
आकाश दुबया यांच्या हत्येनंतर व्यापाऱ्यांनी बंद पाळला, मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून निषेध नोंदविला आणि गुंडगिरीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. ही केवळ भावनिक प्रतिक्रिया नव्हती; तर प्रशासनाला दिलेला स्पष्ट इशारा होता. नागरिकांचा संयम किती दिवस टिकणार, हा खरा प्रश्न आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस प्रशासनाने  सराईत गुन्हेगारांना तडीपार केल्याचा दावा केला होता. मग असे असताना शहरात अशा प्रकारची निर्घृण हत्या कशी घडते? तडीपार, प्रतिबंधात्मक कारवाई आणि पोलीस मोहिमा या केवळ आकडेवारीपुरत्याच राहिल्या आहेत का, असा प्रश्न विचारला जात आहे. गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण झाली नाही, तर अशा कारवायांचा उपयोग काय?
श्रीरामपूरला आज एका धाडसी, निर्णयक्षम आणि जनतेचा विश्वास जिंकणाऱ्या पोलीस नेतृत्वाची गरज आहे. रात्रीची गस्त वाढविणे, सराईत गुन्हेगारांवर सातत्याने लक्ष ठेवणे, सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करणे, खंडणीखोर व टोळीबाजांविरोधात विशेष मोहीम राबविणे आणि कायद्याचा धाक प्रत्यक्षात दिसेल अशा कारवाया करणे आवश्यक आहे.
गुन्हेगारांची जात, धर्म, पक्ष किंवा आर्थिक ताकद पाहून नव्हे, तर त्यांच्या गुन्ह्यांच्या आधारे कठोर कारवाई झाली पाहिजे. कायद्यापुढे सर्व समान आहेत, हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला गेला पाहिजे. अन्यथा प्रामाणिक नागरिकांचा कायद्यावरील विश्वास डळमळीत होईल.
आकाश दुबया यांना न्याय मिळणे ही केवळ एका कुटुंबाची अपेक्षा नाही; ती संपूर्ण श्रीरामपूरची अपेक्षा आहे. आरोपींना कठोर शिक्षा मिळणे आवश्यकच आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, अशी व्यवस्था उभी राहिली पाहिजे.
शहराचा विकास केवळ नवीन रस्ते, इमारती किंवा उद्योगांनी होत नाही; तर नागरिक सुरक्षितपणे जगू शकतात का, यावर त्याचे मोजमाप होते. आज श्रीरामपूरसमोरचा सर्वात मोठा प्रश्न विकासाचा नाही, तर सुरक्षिततेचा आहे.
आता वेळ आली आहे ती फक्त गुन्ह्यांची नोंद घेण्याची नाही, तर गुन्हेगारीची मुळे उपटून टाकण्याची. अन्यथा श्रीरामपूर पुन्हा पेटेल, आणि त्याची किंमत संपूर्ण समाजाला मोजावी लागेल.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन