माजी मंत्री प्राजक्त तनपुरे मुंबईत दाखल
यह भगवा रंग | शिवाजी घाडगे
राहुरी विधानसभा पोटनिवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा राजकीय सस्पेन्स अधिकच वाढत चालला आहे. दरम्यान, राहुरी नगरपालिकेचे नियोजित कार्यक्रम रद्द करून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अचानक मुंबईकडे धाव घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून यह भगवा रंग ची जोरदार चर्चा असून नेमका कोणावर कोणाच्या बाणाने पुन्हा विधानसभेत पोहोचणार
मुंबईतील विधानभवन परिसरात दुपारच्या सुमारास प्राजक्त तनपुरे विविध नेत्यांशी हस्तांदोलन करत आत्मविश्वासाने वावरताना दिसले. मात्र, येणारी निवडणूक नेमकी कोणत्या पक्षाच्या तिकिटावर लढवणार, याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय पावलांबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे. आगामी काळात कोणते राजकीय डावपेच आखले जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी राहुरी दौऱ्यात बोलताना या मतदारसंघासाठी भाजपाच्या वतीने युवा नेतृत्वाला संधी द्यावी, अशी भूमिका मांडली. भाजप युवा आघाडीचे अध्यक्ष आणि युवा नेते अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्याची मागणीही त्यांनी केली. दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निवडणुकीत अक्षय कर्डिले यांनी सक्रिय भूमिका बजावली होती. मतदारसंघातील प्रत्येक भागाची त्यांना चांगली जाण असल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना उमेदवारी देण्याचा आग्रह होत आहे.
याच दरम्यान प्राजक्त तनपुरे यांनी सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीने मुंबई गाठल्याने चर्चांना उधाण आले आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांची भेट घेणार की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची, याबाबतही राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच राहुरी तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. येत्या १५ मार्च रोजी सकाळी १० वाजता राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे त्यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नगर–मनमाड मार्गावरील विद्यापीठ ते राहुरीपर्यंतच्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांना वेग आला असून विद्यापीठ परिसरही चकाचक करण्यात येत आहे.
दरम्यान, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस नेमकी कोणती राजकीय जुळवाजुळव करतात, याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे. काही राजकीय निरीक्षकांच्या मते, या निमित्ताने ‘मामा–भाचा’ राजकारणातून मोठी राजकीय चाल खेळली जाऊ शकते का, याचीही चर्चा रंगली आहे.
एकीकडे भाजपाचे काही नेते ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असा दावा करत असताना एमआयएम, वंचित बहुजन आघाडी तसेच इतर पक्षांकडूनही सक्षम उमेदवार देण्याचे संकेत दिले जात आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने दिलेल्या दिलास्यानंतर ‘आप’ पक्षाकडूनही उमेदवाराची चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या निवडणुकीत मनी पॉवर, मसल पॉवर आणि मॅन पॉवर यांचा मोठा प्रभाव राहणार असल्याचे राजकीय चित्र दिसत आहे.
राहुरीत यापूर्वीच्या पोटनिवडणुकीत दिवंगत नेते रामदास धुमाळ यांच्या आमदारकीच्या स्वप्नांना धक्का बसल्यानंतर या मतदारसंघात ‘कमळ’ फुलले होते. प्राजक्त तनपुरे यांचा अपवाद वगळता आजही या मतदारसंघात भाजपाचा प्रभाव कायम असल्याचे मानले जाते. मात्र, केंद्र व राज्यात सत्ता असतानाही स्थानिक पातळीवर अपेक्षित संधी न मिळाल्याची खंत काही कार्यकर्त्यांत असल्याची चर्चा आहे.
एकंदरीत, राहुरी विधानसभा पोटनिवडणूक अद्याप अधिकृतरीत्या जाहीर नसली तरी राजकीय हालचालींनी वातावरण तापले आहे. वरकरणी शांत दिसणाऱ्या या राजकारणाच्या पृष्ठभागाखाली मात्र राजकीय समीकरणांची धग कायम असल्याचे चित्र दिसत आहे.
Comments
Post a Comment