झोडपले तरी शान कायम ?

झोडपले तरी शान कायम…?
घाडगे न्यूज।प्रतिनिधी 
राहुरी शहरात अलीकडे घडलेल्या घटनेने कायदा, पोलीस यंत्रणा आणि लोकशाहीतील मर्यादा याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून तिघांना अटक करण्यात आली. आरोपींना शहरातून पायी फिरवत त्यांच्या तोंडावर काळे फडके बांधून धिंड काढण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर झळकला आणि त्यानंतर शहरात चर्चेचे वादळ उठले.
पोलीसांवर हल्ला करणे हे नक्कीच गंभीर आणि निंदनीय कृत्य आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्या यंत्रणेवरच जर हात उगारला जात असेल, तर त्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र, कारवाई करताना कायद्याच्या चौकटीत राहणे हीसुद्धा तितकीच महत्त्वाची बाब आहे. आरोपींची धिंड काढणे, त्यांना पायी फिरवणे किंवा सार्वजनिकरित्या अपमानास्पद वागणूक देणे हे कायद्याच्या अंमलबजावणीपेक्षा “दाखवण्याचा” प्रकार ठरतो, अशी टीका होत आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे, आरोपींना न्यायालयात नेत असताना जर कोणत्याही नागरिकाने त्यांच्यावर हल्ला केला असता, तर त्या अनर्थाची जबाबदारी कोणाची राहिली असती? पोलिसांकडे वाहने असताना आरोपींना पायी फिरवण्याची गरज काय, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी असे प्रदर्शन आवश्यक आहे का, की त्यामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते, याचा विचार होणे गरजेचे आहे.
या घटनेमुळे राहुरीकरांना दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांची आठवण झाली. पूर्वी अशाच प्रकारे आरोपींची धिंड काढल्यावर त्यांनी तत्कालीन अधिकाऱ्यांना जाब विचारत स्पष्ट शब्दांत सांगितले होते—तालुक्यातील अवैध व्यवसाय बंद करण्याची हिंमत दाखवा, पण कायदा हातात घेऊ नका. त्या शब्दांमागे लोकशाहीतील मूलभूत तत्त्वांचा आग्रह होता.
याचबरोबर, पोलीस कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पत्रकारांना अधिकृत माहिती न देणेही चिंताजनक आहे. माहिती फक्त व्हॉट्सअ‍ॅप गटावर टाकण्याचा नवा पायंडा पडत असल्याची चर्चा आहे. पत्रकारांशी प्रत्यक्ष संवाद टाळला जात असेल, तर पारदर्शकतेचा अभाव निर्माण होतो.
कायद्याचा धाक निर्माण करणे आवश्यकच आहे, पण तो धाक कायद्याच्या चौकटीतूनच निर्माण झाला पाहिजे. अन्यथा “झोडपले तरी शान कायम” अशा प्रकारच्या घटना क्षणिक टाळ्यांचा विषय ठरतील; परंतु लोकशाही व्यवस्थेच्या प्रतिष्ठेला तडा जाऊ शकतो. त्यामुळे कायद्याचे रक्षण करताना कायद्याचाच सन्मान राखणे हीच खरी शान ठरली पाहिजे. 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन