पत्रकारांच्या सौभाग्यवतींचा गौरव
पत्रकारांच्या सौभाग्यवतींचा साई प्रतिष्ठानकडून स्नेह सत्कार
समाजातील विविध घटकांचे योगदान अधोरेखित करत त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्याची परंपरा जपणाऱ्या साई प्रतिष्ठान, देवळाली प्रवरा यांच्या वतीने महिला दिन औचित्य साधून गुरुवारी पत्रकारांच्या सौभाग्यवतींचा भावपूर्ण सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. समाजातील पडद्यामागे राहून कुटुंबाचा आधार बनणाऱ्या या महिलांच्या त्यागाची दखल घेत हा उपक्रम राबविण्यात आला.
साई मंदिरात सायंकाळी आरती झाल्यानंतर मंदिरासमोरील प्रांगणात हा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पत्रकार समाजासाठी दिवस-रात्र कार्य करत असताना त्यांच्या कुटुंबीयांना अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. विशेषतः त्यांच्या पत्नी कुटुंबाची धुरा सांभाळत त्यांना सामाजिक कार्यासाठी प्रेरणा देत असतात. या निस्वार्थ योगदानाची कदर म्हणून पत्रकारांच्या सौभाग्यवतींचा सन्मान करण्यात आला.
या उपक्रमाची परंपरा साई प्रतिष्ठानने काही वर्षांपासून जपली आहे. पहिल्या वर्षी देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांच्या पत्नींचा सन्मान करण्यात आला होता. दुसऱ्या वर्षी समाजरक्षणासाठी दिवस-रात्र सेवा देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या तसेच शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पत्नींचा गौरव करण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून यंदा पत्रकारांच्या सौभाग्यवतींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी नगरसेवक शैलेश कदम यांनी साई प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वाचे असून त्यांच्या कुटुंबीयांच्या त्यागामुळेच हे कार्य शक्य होते, असे त्यांनी सांगितले. साईबाबांच्या सेवाभावाच्या विचारातून प्रेरणा घेऊन समाजात सकारात्मक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानतर्फे सातत्याने केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. स्वाती कदम यांनी मनोगत व्यक्त केले
या सत्कार समारंभामुळे उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले होते. समाजातील विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचा सन्मान करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला.
Comments
Post a Comment