राहुरी विधानसंभा पोटनिवडणूक सात उमेदवार निवडणूक लढवणार

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध नाही; सात उमेदवार नशीब आज मावणार 
घाडगे न्यूज।प्रतिनिधी 
 राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत बिनविरोध होण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. अखेरीस या पोटनिवडणुकीत सात उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे.
या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून गोविंद मोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) समर्थक अपक्ष म्हणून रावसाहेब खेवरे तसेच अपक्ष उमेदवार म्हणून सूर्यभान लांबे, महेश हापसे आणि अथर्व म्हसे हे उमेदवार रिंगणात आहेत.
दरम्यान, काही उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी शेवटपर्यंत राजकीय पातळीवर प्रयत्न सुरू होते. विशेषतः रावसाहेब खेवरे यांच्या उमेदवारी माघारीसाठी जोरदार हालचाली झाल्याची चर्चा होती, मात्र त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम ठेवला.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष चोळके हे पूर्वी देवळाली प्रवरा येथील शिवसेनेचे शहरप्रमुख होते. त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडत देवळाली नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येण्याचा अनुभव घेतला आहे. स्पष्टवक्ते आणि आक्रमक शैलीमुळे त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून थेट उमेदवारी देण्यात आली आहे.
या पोटनिवडणुकीत सुरुवातीला बिनविरोध निवडणुकीची शक्यता वर्तवली जात होती. भाजपाकडून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना निवडणूक लढवण्यापासून परावृत्त करण्यात आल्याचे बोलले जात होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांचे राजकीय प्रतिस्पर्धी गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर बिनविरोध निवडणुकीचा मार्ग बंद झाला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार गोविंद मोकाटे हे पुढील रणनीतीसाठी खासदार शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले असल्याची माहिती समोर येत आहे.
एकूणच, राहुरी पोटनिवडणुकीत आता बहुरंगी लढत होणार असून सात उमेदवारांमुळे मतदारांसमोर विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर